Stock Split : स्टॉक स्प्लिट’ म्हणजे काय ?

आजकाल शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. असे असले तरी बहुतेकांना शेअरमध्ये होणाऱ्या बदलांविषयी फारशी माहिती नसते. यांपैकी ‘शेअर बायबॅक’बाबत आपण याआधी माहिती घेतली आहे.
what is stock split know how it works share market study
what is stock split know how it works share market studyसकाळ
Updated on

- सुधाकर कुलकर्णी

आजकाल शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. असे असले तरी बहुतेकांना शेअरमध्ये होणाऱ्या बदलांविषयी फारशी माहिती नसते. यांपैकी ‘शेअर बायबॅक’बाबत आपण याआधी माहिती घेतली आहे. आज आपण ‘स्टॉक स्प्लिट’ (शेअर विभाजन) म्हणजे काय व ते का केले जाते? याची माहिती घेऊ.

जेव्हा एखादी कंपनी आपल्या शेअरच्या सध्या असलेल्या दर्शनी किमतीचे (फेस व्हॅल्यू) विभाजन करते, त्याला ‘स्टॉक स्प्लिट’ (शेअर विभाजन) असे म्हणतात. यामुळे त्या शेअरची दर्शनी किंमत कमी होते. मात्र, कंपनीच्या एकूण शेअरची संख्या वाढते.

उदा. एखाद्या कंपनीचे आज रु. १० दर्शनी किंमत असणारे १ कोटी शेअर आहेत व त्याची आजची बाजारातील किंमत रु. १०० व कंपनीने १:१ असे विभाजन केले, तर कंपनीचे दोन कोटी शेअर होतील. त्यामुळे एका शेअरची दर्शनी किंमत रु. ५ इतकी होईल.

यामुळे कंपनीच्या भागभांडवलात काहीही फरक होणार नाही (१ कोटी*१० = रु. १० कोटी व २ कोटी*५ = रु. १० कोटी), त्याचप्रमाणे भागधारकासही काहीही फरक पडणार नाही. उदा. भागधारकाकडे ‘स्टॉक स्प्लिट’पूर्वी ५०० शेअर असतील, तर त्यांचे बाजारमूल्य रु. ५०,००० असेल (५००*१०० = ५०,०००).

आता ‘स्टॉक स्प्लिट’नंतर त्याच्याकडे १००० शेअर असतील; पण एका शेअरची किंमत आता रु. ५० असेल व यामुळे बाजारमूल्य रु. ५०,००० (१०००*५० = ५०,०००) इतकेच असेल. शेअर विभाजन १:१, १:२, १:५ व १:१० या प्रमाणात होऊ शकते. विभाजनाचे प्रमाण कंपनी व्यवस्थापन ठरवते. उदा. एचडीएफसी बँकेने आतापर्यंत दोन वेळा आपल्या शेअरचे विभाजन केले आहे.

‘स्टॉक स्प्लिट’मुळे काय होते?

‘स्टॉक स्प्लिट’ करण्याचा प्रमुख उद्देश कंपनीच्या शेअरची बाजारातील तरलता (लिक्विडिटी) वाढविणे हा असतो. समजा, एचडीएफसी बँकेने आपला शेअर ‘स्प्लिट’ केलाच नसता, तर आज त्यांच्या रु. १० दर्शनी किमतीच्या शेअरची बाजारातील किंमत सुमारे रु. ८५०० इतकी असती, जी आता सुमारे रु. ४३०० इतकी होऊ शकेल.

सर्वसामान्य गुंतवणूकदारास रु. ४३०० चा शेअर विकत घेणे शक्य होऊ शकेल, जे सध्याच्या किमतीत काहीसे कठीण होते. थोडक्यात, शेअरची किंमत कमी झाल्याने, ‘लिक्विडिटी’ वाढत जाऊन शेअरच्या खरेदी-विक्रीचे प्रमाण वाढते.

‘पर्सिस्टंट सिस्टीम्स’चे ‘स्टॉक स्प्लिट’

नुकतेच म्हणजे २० जानेवारी २०२४ रोजी पुण्यातील एक प्रसिद्ध कंपनी ‘पर्सिस्टंट सिस्टीम्स’ने आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये ‘स्टॉक स्प्लिट’चा ठराव मंजूर करून तसे ‘सेबी’ला कळविले आहे. यानुसार कंपनी आपल्या शेअरचे विभाजन १:२ यानुसार करणार आहे.

यासाठीची रेकॉर्ड डेट ३०/०१/२०२४ असून, या तारखेनंतर शेअरधारकांच्या डी-मॅट खात्यात कंपनीच्या शेअरची संख्या दुप्पट झाल्याचे दिसून येईल. (उदा. आपल्याकडे ३०/०१/२०२४ रोजी डी-मॅट खात्यात ‘पर्सिस्टंट सिस्टीम्स’चे ५०० शेअर असतील, तर त्यापुढील ४-५ दिवसांत ते १००० होतील.)

सध्या कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य रु. १० असून, २०/०१/२०२४ रोजीचा शेअरचा बंद भाव रु. ७९२१.५५ होता. नंतर २५/०१/२०२४ रोजी शेअर बाजार बंद होतानाचा भाव रु. ८३७८.७५ झाला होता. गेल्या आठवड्यात बाजारात पडझड होऊनसुद्धा या कंपनीच्या शेअरमध्ये केवळ चार दिवसांत रु. ४५७.२० इतकी घसघशीत वाढ झाली.

फरक ‘बोनस शेअर’ ‘स्टॉक स्प्लिट’मधील

काहींचा ‘बोनस शेअर’ व ‘स्टॉक स्प्लिट’ यांमध्ये गोंधळ होतो. बोनस शेअर इश्यूमध्ये १:१, २:१, ५:१ व १०:१ या प्रमाणात बोनस शेअर मिळत असले, तरी तिथे शेअरची दर्शनी किंमत बदलत नाही व शेअर राखीव निधीतून दिले जात असल्याने कंपनीच्या एकूण भांडवलातसुद्धा वाढ होत नाही.

फक्त राखीव निधी जेवढा कमी होतो, तेवढेच वसूल भागभांडवल वाढते. ज्या प्रमाणात बोनस शेअर मिळतात, त्याच प्रमाणात त्या शेअरचा बाजारातील भाव कमी होत असल्याने भागधारकाकडे बोनस मिळण्यापूर्वी असलेले बाजारमूल्य व बोनस शेअर मिळाल्यानंतरच्या वाढीव शेअरचे बाजारमूल्य जवळजवळ सारखेच असते.

‘स्टॉक स्प्लिट’मध्येही एकूण भागभांडवल वाढत नाही; शिवाय वसूल भागभांडवल व राखीव निधी यांतही काही बदल होत नाही. फक्त शेअरची दर्शनी किंमत ज्या प्रमाणात कमी होते, त्या प्रमाणात शेअरची संख्या वाढत असल्याने वसूल भागभांडवल आहे तेवढेच राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com