

वसंत कुलकर्णी
डॉलरच्या तुलनेत रुपयाचे झालेले अवमूल्यन आणि कंपन्यांच्या कमाईत पुरेशी वाढ नसल्याने देशातील शेअर बाजारात टोकाची अस्थिरता दिसत आहे. ट्रम्प प्रशासनाची व्यापार धोरणे जागतिक व्यापारास पूरक नसल्याने गेल्या काही आठवड्यांमध्ये या अस्थिरतेत वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात करकपातीद्वारे उपभोग वाढविण्यावर भर देण्यात येऊनही आणि रिझर्व्ह बँकेने रेपोदरात पाव टक्क्याने कपात करूनही बाजारातील घसरण थांबलेली नाही. या घसरणीमुळे अनेक कंपन्यांच्या शेअरचे मूल्यांकन वाजवी पातळीवर आले आहे. अशा परिस्थितीत, पोर्टफोलिओला स्थैर्य देणारे लार्ज कॅप शेअर आणि वाढीची चांगली क्षमता असलेले मिड-कॅप शेअर यांचे योग्य संतुलन असणारे लार्ज अँड मिड कॅप म्युच्युअल उत्तम गुंतवणूक पर्याय ठरतात.