
विजय आणि अतुल टापरे यांच्या‘ट्रू थ्रेड गेजेस अँड टूल्स’ची यशोगाथा
ई सकाळ
प्रसाद घारे
prasad.ghare@gmail.com
ट्रू गेजेस अँड टूल्स प्रा. लि.’ ही ‘बी टू बी’ क्षेत्रातील एक छोटीशी कंपनी भोसरीच्या औद्योगिक वसाहतीत १९८२ पासून शांतपणे काम करत आहे. विजय टापरे यांनी स्थापन केलेली आणि जगातील पन्नासहून अधिक देशांत नाव मिळवलेली ही कंपनी भविष्यात जागतिक बाजारपेठेत उंच भरारी मारण्याच्या तयारीत आहे. गेल्या ४३ वर्षांत या कंपनीने ‘गेजिंग सोल्युशन’ या क्षेत्रात केलेले काम उल्लेखनीय असून, त्यांचा प्रवास नक्कीच प्रेरणादायक आहे.
पुण्याच्या जवळपास असणाऱ्या औद्योगिक वसाहतीत असंख्य लहान-मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. यातील अनेक कंपन्यांमध्ये उत्कृष्ट दर्जाची जागतिक उत्पादने तयार होतात आणि ही उत्पादने जगभरात पाठवली जातात. या कंपन्यांची नावे आपण कधी ऐकलेलीदेखील नसतात; मात्र गुणवत्ता आणि दर्जेदार उत्पादनाच्या जोरावर त्यांनी जागतिक बाजारपेठेत आपली वेगळी ओळख निर्माण केलेली असते. अशीच एक कंपनी भोसरीच्या औद्योगिक वसाहतीत १९८२ पासून अतिशय शांतपणे आपले काम करीत आहे. ‘ट्रू थ्रेड गेजेस अँड टूल्स प्रा. लि.’ हे या कंपनीचे नाव.