

Indian middle class struggles
esakal
शार्दूल कदम - ccshardul@amuktamuk.com
भारतीय मध्यमवर्ग आज एका अभूतपूर्व कात्रीत सापडला आहे. एका बाजूला कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), जागतिक आर्थिक मंदी आणि अस्थिर रोजगार बाजारामुळे उत्पन्नाची सुरक्षितता कमी होत आहे, तर दुसऱ्या बाजूला घर, शिक्षण, आरोग्यसेवा आणि दैनंदिन गरजांच्या वाढत्या खर्चाने जगणे अधिकाधिक कठीण होत चालले आहे. ही केवळ आर्थिक अडचण नाही, तर सामाजिक प्रतिष्ठा, अस्मिता आणि भविष्याविषयीच्या विश्वासालाही हादरा देणारी परिस्थिती आहे.
एक प्रश्न आहे, जो शहरी भारतात सर्व वयोगटांत, सर्व व्यवसायांत ऐकू येतो. आयटी क्षेत्र असो, सरकारी नोकरी असो किंवा उत्पादन क्षेत्र असो; प्रश्न एकच. वडिलांनी एकाच्या पगारावर घर घेतले, मुलांना शिकवले. आज दोघे कमावतात आणि तरीही महिनाअखेरीस हात रिकामा राहतो. हे वैयक्तिक अपयश नाही. हे व्यवस्थात्मक आहे आणि ज्या वर्गावर याचा सर्वाधिक परिणाम होतो आहे, तो म्हणजे भारतीय मध्यमवर्ग. वरून महागाईचे ओझे, खालून नोकऱ्यांची अनिश्चितता आणि मधोमध अडकलेला, गटांगळ्या खाणारा, पण ‘लोक काय म्हणतील’ या भीतीने ओरडतासुद्धा न येणारा मध्यमवर्ग. गेल्या ३० वर्षांत या वर्गाला जगण्याची चिंता नव्हती; भरभराटीचा विचार होता. मोठी गाडी, मोठे घर, मुलांचे परदेशी शिक्षण अशी स्वप्ने होती. आज चित्र बदलले आहे. नव्या मध्यमवर्गाची लढाई भरभराटीसाठी नाही; तर ताठ मानेने जगण्यासाठी आहे आणि ती लढाई दोन आघाड्यांवर एकाच वेळी लढावी लागते आहे.