
सुनील टाकळकर , विमा सल्लागार
takalkars४९@gmail.com
प्रवासासाठी तर आपण आनंदाने निघतो. पण गंतव्य स्थानी सुखरुप पोहोचेपर्यंत खरंतर तो पूर्ण होत नाही, वाटेत कधीही काही होऊ शकतं याचा प्रत्यय अहमदाबादच्या विमान दुर्घटनेतून आलेला आहेच. याचा अर्थ प्रवासच करू नये, असा मुळीच नाही पण प्रवास करताना थोडी काळजी घेऊन तो केल्यास अधिक उत्तम.
‘हे विश्वची माझे घर’ हे ज्ञानेश्वरांचे सोळाव्या शतकातील बोल आज एकविसाव्या शतकातही जगभरातल्या प्रवासासाठी लागू आहेत. हा प्रवास आपल्या देशातील कोकण, गोवा, हिमालय, कुलू-मनालीतील असो वा अमेरिका, ऑस्ट्रेलिया आदी परदेशांतील असो. प्रत्येक प्रवासात विमा असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रवासातील जोखमींपासून रक्षण करणारा हा विमा सुरक्षित प्रवासाची गुरुकिल्ली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.