

Unclaimed Investments in India
esakal
प्राची गावस्कर - prachigawaskar@gmail.com
सरकारने विनादावा रकमेसाठी गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाची (आयईपीएफए) सुविधा निर्माण केल्याने अनेकांना आपल्या संपत्तीचा शोध घेणे शक्य झाले आहे. मात्र, अशी विनादावा रक्कम परत मिळविण्यासाठीची प्रक्रिया क्लिष्ट असते. सर्वसामान्य लोकांना ही प्रक्रिया विनासायास पूर्ण करता यावी, यासाठी पुण्यातील श्रीकांत पंडोरे आपल्या क्लिअर क्लेम कंपनीच्या माध्यमातून काम करत आहेत. ‘सकाळ मनी’साठी घेतलेली ही मुलाखत...
पंडोरे ः मी मुळात इंजिनिअर असल्याने सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करत होतो. मात्र, काम करताना अनेकदा आजूबाजूच्या लोकांचे, नातेवाइकांमध्ये आर्थिकदृष्ट्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे दिसत होते. काहीवेळा आजोबा, वडील यांनी कागदोपत्री स्वरुपात घेतलेले शेअर डी-मॅट केलेले नसल्याने त्याचा लाभांश मिळत नसे किंवा असे शेअर आहेत हेच अनेक मुलांना माहित नसल्याचे दिसत असे. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर कधीतरी असे शेअर असल्याचा शोध लागत असे किंवा पीएफसाठी नॉमिनेशन केले नसल्याने पैसे मिळण्यात अडचणी येत असल्याचे दिसत असे. अशी अनेक उदाहरणे बघितल्यावर आपण या क्षेत्रात उतरून काहीतरी काम केले पाहिजे असे वाटू लागले. सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचा वापर करून आपण काहीतरी व्यवस्था तयार करून लोकांना मदत करू शकतो, असे मला वाटत होते, त्यामुळे मी नोकरी सोडून या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. माझा मित्र हार्दिक माणेक आणि अश्विनी अडसरे यांनी मला साथ दिली आणि आम्ही जानेवारी २०२२ मध्ये क्लिअर क्लेम ही कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून आम्ही कागदी स्वरुपातील शेअर डी-मॅट करून देणे, कंपनीकडून जुने शेअर आणि न मिळालेला लाभांश परत मिळवून देणे, गुंतवणूकदाराच्या निधनानंतर मालकी हस्तांतर, हरवलेल्या प्रमाणपत्रांच्या डुप्लिकेट प्रती मिळवून देणे, कोणीही अनेक वर्षे दावा न केल्यामुळे अनेकांचे शेअर गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणात अर्थात ‘आयईपीएफए’मध्ये (IEPFA) जमा होतात, ते परत मिळवण्यासाठी दावे दाखल करणे, नॉमिनेशन नसल्याने बँक खात्यात अडकलेले पैसे वारसांना मिळवून देणे, वारसांना पीएफ, पीपीएफचे पैसे मिळवून देणे अशी कामे करण्यास सुरुवात केली. कागदी स्वरूपातील गुंतवणुकीपासून डिजिटल युगाकडे झालेल्या संक्रमणात मागे राहिलेल्या गुंतवणुकींचा शोध घेऊन त्या पुन्हा गुंतवणूकदारांच्या नावावर आणण्यावर कंपनीचा भर आहे. आमचे उद्दिष्ट गुंतवणूकदारांसाठी अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया सोपी करणे आहे. अनेक कुटुंबांना जुन्या गुंतवणुकीत दडलेली संपत्ती असल्याची कल्पनाच नसते. योग्य कागदपत्रे आणि नियामक प्रक्रियेद्वारे त्यांना त्यांचा हक्काचा मालमत्ता वेगाने आणि अचूकपणे परत मिळवून देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.