पालींच्या अंतरंगाचा शोध

tejashri kumbhar
tejashri kumbhar

"अपशकुनी' प्राणी असा पालींचा उल्लेख सर्रास होतो. मात्र पालींचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करण्याजोगे आहे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या त्रासदायक किटकांना पाली खातात. पाली नष्ट झाल्या तर किटकांची संख्या वाढेल आणि ते पर्यावरणीय आणि मानवी दृष्टीनेही घातक आहे. पर्यावरणीय अन्नसाखळीतील पालींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. इशान अग्रवाल, अक्षय खांडेकर, वरदगिरी, उमा रामकृष्णन आणि प्रवीण कारंथ या युवकांनी पालींच्या अकरा नव्या प्रजातींचा शोध लावला आहे.

निसर्ग न उलगडलेले कोडे आहे, असे कोणीतरी म्हटले आहे ते खरेच आहे. जगात लाखो निसर्गप्रेमी वैज्ञानिक प्रजातींवर काम करीत असून हा आकडा वाढताच आहे. सुदैवाने भारताला जैवविविधतेचा मोलाचा वारसा लाभला आहे. पश्‍चिम घाटासह देशातील सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास करणाऱ्या इशान अग्रवाल, अक्षय खांडेकर, वरदगिरी, उमा रामकृष्णन आणि प्रवीण कारंथ यांनी पालीच्या अकरा नवीन जातींचा शोध लावून यातील तीन जातींचे स्वतः नामकरणही केले आहे. हेमिफायलोडॅक्‍टिलस ज्ञाना, हेमिफायलोडॅक्‍टिलस कोलिएन्सीस आणि हेमिफायलोडॅक्‍टिलस अरकुएन्सीन ही नावे या तीन पालींना देण्यात आली आहेत. याबाबतचा त्यांचा शोधनिबंध "ऑर्ग्यानिजम डायव्हरसिटी अँड इव्हॅल्युशन' या नामांकित आंतरराष्ट्रीय जर्नलमधून प्रकाशित झाला आहे.

देशाच्या पर्यावरणातील अत्यंत महत्त्वाची माहिती शोधून काढण्याचे श्रेय त्यांना जाते. कारण "हेमिफायलोडॅक्‍टिलस' हे पालींच्या दुर्मिळ कुळाचे नाव आहे. या कुळातून आतापर्यंत भारतातून फक्‍त एकाच प्रजातीची नोंद झाली होती. ""पालींच्या बाबतीत आजवर अनेकांनी केलेले संशोधन तपासले असता आणि ब्रिटिशांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लिहिलेल्या नोंदीचा अभ्यास करता या कुळात अनेक जाती असल्याची माहिती आम्हाला मिळाली. या प्रजाती कोठे सापडू शकतात या गोष्टीचे अंदाजासह तर्कवितर्क काढीत आम्ही शोध सुरू केला. हा शोध गेल्या चार वर्षांपासून सुरू होता. या शोधासाठी आम्ही पूर्व आणि पश्‍चिम घाटाचा कोपरान्‌कोपरा शोधत जवळजवळ संपूर्ण भारतातील जंगले पालथी घातली आहेत. या चार वर्षांत आमच्या हाती एकूण अकरा जाती लागल्या. त्यातील तीन जातींचे नामकरण केले असून उर्वरित नवीन जातींना नाव देण्याचे काम सुरू आहे,'' अशी माहिती अक्षय खांडेकर यांनी दिली.
"हेमिफायलोडॅक्‍टिलस ज्ञाना' ही प्रजाती बंगळूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या कॅम्पसमध्ये आणि नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस या दोन रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आढळली. ही दोन्ही ठिकाणे ज्ञानार्जनाची असल्याने या पालीचे नाव "हेमिफायलोडॅक्‍टिलस ज्ञाना', ठेवण्यात आले. हेमिफायलोडॅक्‍टिलस कोलिएन्सीन ही प्रजात तामिळनाडूतील कोली नावाच्या डोंगरावर सापडल्याने या पालीचे नाव हेमिफायलोडॅक्‍टिलस कोलिएन्सीस असे पडले. हेमिफायलोडॅक्‍टिलस अरकुएन्सीन या प्रजातीचा शोध आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्‌टणम येथील अरकु डोंगरावरून लागला आणि ही पाल फक्‍त या डोंगर परिसरातच सापडते. त्यामुळे या पालीचे नाव अरकुरान्सीन असे ठेवण्यात आले. आकाराने लहान असणाऱ्या या पालींची सरासरी लांबी सरासरी 35 मिलीमीटर इतकी असून, तिच्या शेपटीचा पृष्ठभाग गडद भगव्या रंगाचा असतो. या तिन्ही पाली प्रामुख्याने झाडांवर आढळतात.

चार वर्षांपासून सुरू असणारा हा प्रवास साधासोप्पा नक्‍कीच नव्हता. जंगलातील पाली रात्री दिसतात, त्यामुळे आम्हाला रात्ररात्रभर जंगलांची भटकंती करावी लागे. पालींवर टॉर्च फेकला की त्यांचे डोळे चमकतात. या प्रक्रियेला आम्ही "आयशायनिंग मेथड' म्हणतो. या मेथडचा वापर करीतच आम्ही या पालींचा शोध लावला आहे. आंध्र प्रदेशातील ज्या भागांमध्ये पालींचा शोध लागला, त्या भागात जंगली श्‍वापदांचा आणि विषारी सापांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने आम्हाला कायम सावध राहावे लागले. आम्ही सर्वजण सापांवरही काम करीत असल्याने सापांना घाबरत नव्हतो. मात्र, जंगली प्राण्यांची भीती मनात होती. यासाठी आम्ही त्या जंगलात दिवसा जाऊन येत असू आणि मग रात्री जाताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सोबतीने काम करीत असल्याची माहिती वरद गिरी यांनी दिली.

संशोधनाला चालना हवी
आपल्या देशात आजवर एकाही विषारी पालीच्या शोधाची नोंद झालेली नाही. पाल अन्नात पडली की त्याचे विष होते, अथवा अंगावर पडली की अपशकुन घडतो या अंधश्रद्धा आहेत. पाली घाणेरड्या असतात, असा समज आपल्याकडे आहे. मात्र अत्यंत सुंदर आणि स्वच्छ राहणारी ही जात आहे. आपल्याकडे पालींच्याबाबतीत गैरसमज असल्याने त्या कोणी खात नाहीत, त्यामुळे त्यांच्या संख्येच्या बाबतीत प्रश्‍न निर्माण होत नाही. थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम यासारख्या देशांनी पालींचे महत्त्व जाणून त्यांच्याबाबतच्या संशोधनाला अधिक चालना दिली आहे. आपल्या देशात आजवर किमान शंभर पालींची नोंद झालेली असून अद्यापही नवीन जातींचा शोध लागणे सुरू असल्याचे अक्षय खांडेकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com