मस्ती येते कुठून?

शहरीकरणाच्या लाटेत सर्वसामान्यांचा जगण्याचा संघर्षच मुळात खूप कठीण असतो. तरीही आपल्या जगण्याची छोटीशी का होईना ‘स्पेस’ तयार करून त्यात समाधानाने राहण्याचा या माणसांचा प्रयत्न असतो.
मस्ती येते कुठून?
मस्ती येते कुठून?sakal
Updated on

शहरीकरणाच्या लाटेत सर्वसामान्यांचा जगण्याचा संघर्षच मुळात खूप कठीण असतो. तरीही आपल्या जगण्याची छोटीशी का होईना ‘स्पेस’ तयार करून त्यात समाधानाने राहण्याचा या माणसांचा प्रयत्न असतो. त्यावरही जेव्हा क्रूरपणे आक्रमण होते, तेव्हा त्याचे सारे भावविश्वच उद्‍ध्वस्त होते. कायदा, नीतिमूल्ये, संवेदनशीलता सगळ्याशीच फटकून राहणाऱ्या कोणाकडून हे असे आक्रमण झाले की, या प्रश्नाचे गांभीर्य कितीतरी वाढते. मुंबईच्या वरळीतील अपघाताने ही चिंता गडद केली आहे. अलीकडे मुंबई, नागपूर, पुण्यातील आंबेगाव यांसह अनेक ठिकाणी ‘हिट अँड रन’चे प्रकार घडले आहेत. पुण्यामध्ये झालेला पोर्श कार अपघात आणि रविवारी मुंबईत झालेला अपघात या दोन्ही घटना तर ‘जुळ्या’ वाटाव्यात इतके साधर्म्य त्यांत आहे. दोन्ही घटनांमधील आरोपीच्या पिंजऱ्यातील व्यक्ती या उच्चभ्रू कुटुंबातील आहेत. त्यांच्या गाड्यादेखील महागड्या आहेत आणि दोघेही पार्टी करून, म्हणजेच नशा करून गाडी चालवत होते, असा आरोप आहे. सुखवस्तू कुटुंबात जन्म झाल्यामुळे त्यांना इतरांना मिळत नाहीत त्या सर्व सुखसोयी सहज मिळाल्या असतील. सुखसोयीच्या जोडीने महागड्या गाड्याही मिळाल्या. मात्र, त्या गाड्यांसोबतच त्यांना जबाबदारीचे भान द्यायला त्यांचे पालक सपशेल विसरलेले दिसतात.

पुण्यात झालेल्या घटनेत तर अपघातानंतर केलेला प्रपंच त्याहीपेक्षा मोठा होता. आपल्या हातून गुन्हा झाला आहे, कुणाचे तरी प्राण आपल्यामुळे गेले, कुठले तरी कुटुंब उद्‍ध्वस्त झाले, याचे कुठलेही शल्य त्या पालकांच्या कृतीतून जाणवले नाही. मुंबईतील घटनेने या प्रकरणाची पुनरावृत्ती झाली. यात नाहक बळी गेला तो एका कष्टकरी जीवाचा. वरळीत राहणाऱ्या आणि मासेविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या ४५ वर्षांच्या कावेरी नाखवा या अपघातात मृत्युमुखी पडल्या. घाऊक बाजारातून मासळी खरेदी करायची आणि ती किरकोळ बाजारात नेऊन विकायची, यासाठी रात्रीची झोप सोडून नाखवा पती-पत्नी क्रॉफर्ड मार्केटकडे गेले होते. मात्र, जुहूच्या पंचतारांकित वातावरणात जीवाची मुंबई करून आपल्या पैशाची मस्ती उडवत निघालेल्या मिहीर शहा नावाच्या माणसाच्या बेजबाबदार वर्तनाने त्यांचे आयुष्यच किरकोळ ठरवून टाकले. अपघातानंतर पीडित व्यक्तीला मदत करण्याऐवजी थेट घटनास्थळावरून पोबारा करणे हा तर संवेदनशून्यतेचा कहरच म्हणावा लागेल.

ही मस्ती येते तरी कुठून, असा प्रश्न पडतो. यांना नीतिमूल्यांची चाड नाही आणि कायद्याचा धाक नाही. हा शहादेखील तसाच घटनास्थळावरून पसार झाला. त्याला पळून जायला त्याच्या वडिलांनीच मदत केली म्हणे. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. हे महाशय शिवसेनेचे (शिंदे गट) पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक आहेत. आता मुलाला पोलिस शोधत आहेत. त्याची चौकशीही होईल. कदाचित अटक होऊन शिक्षादेखील होईल. अपघातानंतरही चालकाने जखमीला तसेच पुढे फरफटत नेले. तसे झाले नसते आणि वेळीच उपचार मिळाले असते तर कदाचित त्या महिलेचा जीव वाचू शकला असता, असे या अपघातात जखमी झालेल्या प्रदीप नाखवा यांनी माध्यमांना सांगितले. मात्र, नशेचा कैफ चढलेल्या मिहीरला त्याची जाणीव झाली नाही. केवळ दहावीपर्यंत शिक्षण असलेल्या मिहीरकडे महागडी गाडी आली ती अर्थात त्याच्या श्रीमंत वडिलांमुळे. तुमची श्रीमंती आणि तुमचा पैसा तुमच्या आनंदाचे कारण असायला काहीच हरकत नाही; मात्र त्यात दुसऱ्या कुणाचे दुःख सामावलेले तर नाही ना, याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.

तुम्हाला पिण्यात आणि गाड्या उडवण्यात आनंद वाटत असेल तर तो तुमचा वैयक्तिक मामला आहे. मात्र, त्यामुळे इतरांना त्रास होणार असेल तर मात्र खबरदार... तुम्हाला तुमच्या आनंदापायी इतरांचे कुटुंब उद्‍ध्वस्त करण्याचा काहीएक अधिकार नाही. त्यामुळे आपला आनंद आपल्या जबाबदारीवर साजरा करायला हवा. समाजमाध्यमांच्या वाढत्या दबावाच्या वातावरणात प्रत्येकालाच सेलिब्रिटी व्हायचे आहे. त्यातून सवंग ‘सेलिब्रेशन’चे प्रमाण वाढले आहे. पूर्वी नशा करणे चुकीचे समजले जायचे. आज त्यालाच प्रतिष्ठा प्राप्त होताना दिसते. आपण ज्याला समाज म्हणतो तो आपल्यापासूनच तयार होत असतो आणि त्याचे स्वास्थ्यही आपल्याच हातात असते, हे विसरून चालत नाही.

त्यासाठी आपला आनंद साजरा करताना त्यासोबतच जबाबदारीची जाणीवही असायला लागते. बड्या गाडीवाल्यांना ती जाणीव होणार नसेल तर आता सरकारने त्याकडे जबाबदारीने लक्ष द्यावे, अन्यथा तुमच्या आनंदात सर्वसामान्यांची कायम फरफट होत राहील. सर्वसामान्य माणसानेही हा फरक बारकाईने लक्षात घ्यावा. मग तो आनंद विश्वकरंडकाचा का असेना... त्यासाठीची मर्यादा आपण ओळखली पाहिजे. ती नीट ओळखता आली की, मग समाजस्वास्थ्याचा वेगळा विचार करायला लागत नाही. स्वतःचा आनंद इतरांच्या जीवावर उठत असेल, कायद्याची पायमल्ली करणारा असेल तर सामाजिक जबाबदारीचे भान सुटले असेच म्हणावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.