
A Visionary Scientist Passes Away : डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे गणित विषयातील तज्ज्ञ होते, तर मातुःश्री सुमती संस्कृत भाषेतील विदुषी होत्या. वडील आणि आई अशा दोघांकडून शिक्षणाचे आणि ओघाने विज्ञानदृष्टीचे बाळकडू त्यांना मिळाले. डॉ. विष्णू नारळीकर बनारस हिंदू विद्यापीठात गणित विभागाचे प्रमुख झाल्याने हे सर्व कुटुंब बनारस येथे झाले. तेथे डॉ. नारळीकरांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी ते केंब्रिज विद्यापीठात गेले. या विद्यापीठातून त्यांनी बीए, पीएचडी, एमए आणि एस्सी. डी. या पदव्या संपादन केल्या. ट्रायपॉस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना ‘रँग्लर’ने सन्मानित करण्यात आले होते. ‘पीएचडी’साठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ फ्रेड हॉयल यांचे डॉ. जयंत नारळीकर यांना मार्गदर्शन लाभले. खगोलशास्त्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना प्रतिष्ठेचे टायसन पदक आणि स्मिथ पारितोषिक मिळाले. त्यानंतर केंब्रिज विद्यापीठात अध्यापनाचे कार्यही त्यांनी केले. पीएचडीचे मार्गदर्शक फ्रेड हॉयल आणि नारळीकर यांनी एकत्र केलेले संशोधन जगभर चर्चेचा विषय ठरले. विश्वाची निर्मिती एका महास्फोटातून झाली असे मानणारा शास्त्रज्ञांचा मोठा वर्ग होता. मात्र, हॉयल आणि नारळीकर यांनी १९६४ मध्ये याला छेद देणारा सिद्धांत मांडला. त्यानंतर डॉ. जयंत नारळीकर हे नाव प्रकाशझोतात आले.