पुस्तकांचा प्रवास भेदांच्या भिंतींपलीकडचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashwin Sanghi and Vishwas Patil

मराठीतील नामवंत लेखक विश्वास पाटील यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘महासम्राट’ कादंबरीच्या इंग्रजी व कन्नड अनुवादाचे प्रकाशन नुकतेच झाले. त्यानिमित्ताने पाटील यांच्याशी साधलेला संवाद.

पुस्तकांचा प्रवास भेदांच्या भिंतींपलीकडचा

मराठीतील नामवंत लेखक विश्वास पाटील यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘महासम्राट’ कादंबरीच्या इंग्रजी व कन्नड अनुवादाचे प्रकाशन नुकतेच झाले. त्यानिमित्ताने पाटील यांच्याशी साधलेला संवाद.

प्रश्न - इतिहासातील व्यक्तिरेखांना तुम्ही नायक केले, त्यांच्यावर ग्रंथ लिहिले. यामागची भूमिका काय होती?

विश्वास पाटील - त्या-त्या काळातील ज्या व्यक्तींमुळे मोठे सामाजिक परिवर्तन घडून आले, त्यांच्या कर्तृत्वाचा धागा मी पकडत गेलो. त्या नजरेतूनच मी त्या काळी ‘पानिपत’ (१९८८) लिहिले. ‘भारतीय ज्ञानपीठ’चे तत्कालिन अध्यक्ष नरसिंह राव यांच्या पाहण्यात ते आले. त्यांनी त्याच्या भाषांतराला प्रोत्साहन दिले. ‘पानिपत’ लिहिताना मी भाऊसाहेबांची समाधी शोधण्यासाठी ऊसाच्या शेतात तीन दिवस शोध घेतला. तिथं आता दर १४ जानेवारीला दीड लाख मराठे गोळा होतात. हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी. मराठी लेखणीचा हा प्रभाव आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर लिहिण्यासाठी ‘आझाद हिंद’च्या उभारणीपलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मी जर्मनी, जपान, म्यानमार यांना भेटी दिल्या. म्यानमारमध्ये लष्करी राजवट होती. तरी धोका पत्करून काही संबंधित लोकांना भेटलो. त्यावेळी पकडलो गेलो असतो तर चार वर्षांचा तुरुंगवास झाला असता. नोकरी जाण्याचा धोका होता. मुलं लहान होती. पण त्याचीही तयारी ठेवावी लागते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ‘महासम्राट’ कादंबरी लिहिलीत. महाराजांवर तुम्हांला लिहावेसे का वाटले?

- गेली २५ वर्षे छत्रपती शिवाजी महाराज या विषयाचा ध्यास घेतला होता. २४० किल्ल्यांना भेटी दिल्या. आज शिवाजी महाराजांचे कर्तृत्व चित्रपटांद्वारे तुकड्या तुकड्यांनी दाखवलं जातंय. मतासाठी, धर्मासाठी, जातीसाठी त्यांचा वापर केला जात आहे. अशावेळी मला त्यांचे विशाल रुप सांगायचे होते. शहाजी महाराज त्यांचे पिताजी. मेकर ऑफ शिवाजी महाराज म्हणजे शहाजी महाराज. शहाजी महाराज लाखा-लाखाच्या फौजा घेऊन मोगल बादशाह जहांगीर, शहाजहान यांच्याशी लढले आहेत. ते आम्हांला इतिहासाने नाही सांगितले, शाळेत नाही सांगितले. त्याबाबत नव्याने कागदपत्रे मिळाल्यानंतर त्या आधारे कहाणी सांगायला सुरवात केली. त्यांचा शिवाजी महाराजांवर मोठा प्रभाव होता. शहाजी महाराजांच्या शिकवणीतून त्यांचे व्यक्तिमत्त्व आकाराला आले होते. संकुचित चौकटीबाहेर पडून महाराजांचे जात-पात, धर्म याच्यापलीकडे असलेले विशाल रूप दाखवण्यासाठी ‘महासम्राट’ लिहिली. त्यासाठी तत्कालीन भूगोल, प्रथा, परंपरा, लोकजीवन, परिस्थिती यांचा अभ्यास केला. वास्तवाची नाळ कायम राहील, असा कटाक्ष ठेवला.

तुमचे लेखन वेगवेगळ्या भाषांद्वारे लोकांपर्यंत पोहोचले आहे. त्यांना प्रतिसाद कसा मिळत गेला?

- पानिपत ‘ज्ञानपीठ’द्वारे मराठीबाहेर गेले. मग त्यांनी महानायक, संभाजी, चंद्रमुखी इतर भाषांत प्रसिद्ध केली. ‘नॉट गॉन विथ विंड’ छापले. भारतीय ज्ञानपीठमुळे सहा-सात पुस्तके हिंदीत आली. नुकतंच ‘राजकमल प्रकाशना’ने ‘महासम्राट’ हिंदीमध्ये आणलंय. नवीन ‘दुडिया’ कादंबरीही त्यांनीच प्रसिद्ध केली. हिंदी व कन्नडमध्ये चांगला वाचकवर्ग मिळाला. ‘महानायक’च्या पाच आवृत्या कन्नडमध्ये निघाल्या. त्याचे अनुवादक चंद्रकांत पोकळे यांना अनुवादाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ‘महासम्राट’ आणि ‘दुडिया’ यांची कन्नड भाषांतरे दहा डिसेंबरला प्रकाशित केली. ‘वेस्टलँड’ प्रकाशन संस्था भारतात आली तेव्हा त्यांनी स्वतःहून मार्केटमध्ये, वाचनालयात सर्वेक्षण केले. त्यांना आढळले, की, माझी पुस्तके जास्त वाचली जातात. त्यांनी दोन वर्षांत ‘महानायक’, ‘पानिपत’, ‘संभाजी’ इंग्रजीतून काढले. ‘महासम्राट’विषयी समजले तेव्हा त्यांनी त्याची मराठीतील प्रत लगेच भाषांतरासाठी मागून घेतली. नदीम खान यांनी त्याचे चांगले भाषांतर केले आहे.

हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, मल्याळम, बंगाली, राजस्थानी, उडिया, आसामी अशा चौदा भाषांत ‘महानायक’ अनुवादित झाली आहे. ‘महानायक’सह ‘झाडाझडती’ आसामीमध्ये आली आहे. ‘झाडाझडती’च्या आसामी पुस्तकाचे नाव आहे ‘बिदीर्ण बाघजाई’. त्याला आसामी वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला.‘झाडाझ़डती’ आणि ‘नागकेशर’ या दोघांना मिळून आसाम सरकारचे ‘इंदिरा गोस्वामी नॅशनल अवॉर्ड’ मिळाले आहे.

मराठीतील साहित्यकृतीला मराठी मातीचा स्पर्श असतो. अन्य भाषकांना त्या भावतात कशा काय?

- संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांच्यापासून ते अगदी खांडेकर, तेंडुलकर, शरणकुमार लिंबाळे यांच्यापर्यंत अनेकांच्या साहित्यकृती अन्य भाषक वाचकांच्या पसंतीला उतरल्या आहेत. हे साहित्य वैश्विक झाले. यामागे त्यांचे जिकीरीचे प्रयत्न, अनेक वर्षांची आराधना, चिकाटी, लेखनाची गुणवत्ता अशा कितीतरी बाबी कारणीभूत असतात. लेखन सकस असेल तर त्याचे भाषांतर होते. खांडेकरांची ‘ययाती’, शिवाजी सावंत यांचे साहित्य अन्य भाषकांनी स्वीकारले आहे. तेंडुलकरांची नाटकं जेवढी हिंदीत उपलब्ध आहेत तेवढी मराठीत मिळत नाहीत. मला, शिवाजी सावंतांना हिंदीतील लेखकच समजलं जातं. पुस्तकाला आत्मा असतो.

लेखकाच्या जात, प्रांत, धर्म अशा कितीतरी भेदांपलीकडे त्याच्या पुस्तकांचा प्रवास होत असतो. चार-दोन पानातच लेखक वाचकावर गारूड करत असतो. लेखक त्यात किती प्राण फुंकतो, हे महत्त्वाचे. वाचक त्यातील वाचनीयता पाहतो, त्याच्याशी तादात्म्य पावतो. एकरूप होतो. माझ्या लेखनातील सुभाषबाबू, बनूआक्का, खैरमोडे गुरूजी, लस्ट फॉर लालबागमधील इंदाराम असो, या सामाजिक आणि ऐतिहासिक व्यक्तिरेखा मराठीबाहेरील वाचकांनाही भावल्या. त्यांच्याशी त्यांचे नाते जुळले गेले.

इंग्रजीमधील ‘महानायक’ वाचल्यावर ख्यातनाम बंगाली लेखक सुनील गंगोपाध्याय यांनी सुभाषबाबूंवर वेगळे लिहायचे राहिले नाही, असे सांगितले. एवढेच नव्हे तर ‘देश’मध्ये त्यांनी माझ्यावर आणि ‘महानायक’ कादंबरीवर स्वतंत्र लेख लिहिला. अशा मोठ्या लेखकांचा आशीर्वाद मिळतो, तेव्हा समाधान वाटते.