सोळा वर्षांनंतरही स्थैर्याचे मृगजळच!

- डॉ. अशोक मोडक
सोमवार, 10 एप्रिल 2017

अफगाणिस्तानात "तालिबान'ला बाजूला सारून "आयएसकेपी' या संघटनेने स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे तेथील दहशतवादाचा बीमोड करण्याचे आव्हान अधिकच जटिल झाले आहे.

सुमारे सोळा वर्षांपूर्वी म्हणजे 21 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकने अफगाणिस्तानकडे आपला मोर्चा वळविला. कारण, त्याच वर्षी 11 सप्टेंबरला न्यूयॉर्कच्या ट्‌विन टॉवरवर हल्ला चढवून दहशतवाद्यांनी थेट अफगाण भूमीवरच आपले बस्तान ठेवले व तेथून जगभर उच्छाद मांडण्यासाठी कटकारस्थाने रचण्यास प्रारंभ केला, अशी माहिती अमेरिकेला मिळाली. या सोळा वर्षांत अमेरिकेत बुश व ओबामा या दोघांच्या अध्यक्षीय कारकिर्दी संपुष्टात आल्या; अफगाणिस्तानात अडीच हजार अमेरिकी सैनिक मारले गेले, तर वीस हजार सैनिक जायबंदी झाले. 2009 पासून सात वर्षांत 70 हजार अफगाण नागरिक मृत्युमुखी पडले; पण अफगाणिस्तानचा प्रश्न काही सुटला नाही. उलटपक्षी "तालिबानी' दहशतवाद्यांना मागे सारून "इस्लामिक स्टेट इन खोरासन प्रॉव्हिन्स' (आयएसकेपी) या संघटनेने केवळ अफगाणिस्तानात नव्हे, तर पाकिस्तान, भारत, बांगलादेश या विस्तीर्ण भूप्रदेशात "खोरासन अमिरात' उभी करण्याचा इरादा व्यक्त केला आहे.

सोळा वर्षांपूर्वी अवघे जग अमेरिकेच्या मागे एकवटले होते; "तालिबान'ला नष्ट करण्याबाबत सर्वांचे मतैक्‍य झाले होते; पण 2003 मध्ये अमेरिकेने इराकमध्ये लष्करी हस्तक्षेप केला; त्यानंतर कैक देशांत असाच हस्तक्षेप करून अमेरिकेने जगभर स्वतःची एकध्रुवीय सत्ता निर्माण करण्यासाठी पावले टाकली. परिणामी, रशिया व चीन यांनी अमेरिकेच्या विरोधात युती केली. "नाटो' गटाच्या सदस्यांनीही "अफगाण प्रश्न जागतिक नसून प्रादेशिक आहे, तेव्हा दक्षिण व पश्‍चिम आशियातील देशांनीच हा प्रश्‍न सोडवावा,' असा पवित्रा घेतला.

अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही अमेरिका इतःपर जगाची उठाठेव करणार नाही, असा मनोदय प्रारंभी व्यक्त करताना अफगाणिस्तानातून अमेरिका माघार घेईल, या धोरणाच्या कार्यवाहीला हिरवा कंदील दाखविला असावा, असे वाटते. अफगाण प्रश्नाचा तिढा अधिक जटिल झाला आहे तो या पार्श्‍वभूमीवर! अर्थात, ढगाला सोनेरी किनार असते, याचीही प्रमाणे उपलब्ध झाली आहेत. "आयएसकेपी' या संघटनेशी "तालिबान'चे वैर आहे. म्हणजे शत्रुपक्षात दुफळी माजली आहे. "आयएसकेपी'कडून रशिया व चीन यांनाही धोका आहे; कारण, रशियातील चेचेन बंडखोर व चीनच्या सिंक्‍यांग प्रांतातील दहशतवादी या संघटनेशी लागेबांधे ठेवून त्या त्या देशांना वेठीस धरत आहेत. सीरियातील अलीकडील घडामोडींमुळे अमेरिकेने जसा आपला पवित्रा बदलला आणि त्याचप्रकारे अफगाणिस्तानातील "खोरासन अमिराती'चे स्वप्न उधळून लावण्यावर लक्ष केंद्रित केले, तर कदाचित रशिया व चीन अमेरिकेशी सख्य करण्यात उत्साह दाखवतील. मात्र, सध्यातरी सीरियाच्या मुद्यावरून अमेरिका व रशियाचे संबंध विकोपाला गेल्याचे दिसते.

अमेरिकेचे मुख्य मिलिटरी कमांडर जनरल जोसेफ वॉटेल व कमांडर जनरल जॉन निकोल्सन यांनी अमेरिकी सरकारकडूनच इस्लामी दहशतवादाचा पूर्ण बीमोड व्हावा, असे पत्रक प्रसिद्ध केले आहे. अमेरिकेचे नवे संरक्षणमंत्री जनरल जेम्स मॅटिस यांच्याही दृष्टीने अमेरिकेने अफगाण भूमीवरील दहशतवादाच्या बीमोडात कुठलीही कसूर करू नये, असे म्हटले आहे. तेव्हा अमेरिकेचे मनोबल टिकविण्यासाठी सोळा वर्षे लांबलेले युद्ध यशात परिवर्तित व्हावे, या हेतूने ट्रम्प उचित व्यूहरचना आखतील, अशी चिन्हे आहेत.

बुश व ओबामा यांनी पाकिस्तानवर भरवसा ठेवला होता. अफगाणिस्तानातील दहशतवाद समाप्त करून तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानकडून साथ मिळेल, असा भरवसा ठेवून या दोन्ही अध्यक्षांनी दहशतवादविरोधी लढाई कमकुवत केली. अमेरिकेच्या नव्या शासकांचा मात्र पाकिस्तानविषयी पुरता भ्रमनिरास झाला आहे. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी, तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क समितीमध्ये अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुरैया दलील यांनीही पाकिस्तानच अफगाणिस्तानातील अशांततेला जबाबदार आहे, हे निःसंदिग्ध शब्दांत जाहीर केले आहे. दक्षिण आशियातील सातही देशांनी पाकिस्तानच्या विरोधात भारताच्या बाजूने कौल दिला आहे.

अलीकडेच अफगाणिस्तानात एका हॉस्पिटलमध्ये बॉंबस्फोट झाला व पाठोपाठ पाकिस्तानातही बॉंबस्फोट झाले. त्यावरून दहशतवादाचे बूमरॅंग पाकिस्तानवरच उलटल्याचे स्पष्ट होते. तेथे पंजाबी सुन्नी हे शिया पंथीयांच्या विरोधात घातपात करीत आहेत, हे जगाला कळून चुकले आहे. परिणामी, इराणसारखा अफगाणिस्तानचा शिया शेजारी देश पाकिस्तानच्या विरोधात उभा ठाकेल व अफगाण भूमीची राखण करील, अशी चिन्हे आहेत. भारताच्या दृष्टीने अफगाण प्रश्नाच्या काळ्या मेघाला अशी सोनेरी किनार आहे. पाकिस्तानात गेली सत्तर वर्षे ना लोकशाही रुजली, ना कायदा- सुव्यवस्था राहिली, ना बहुविश्वता फुलली, ना सर्वसामान्य नागरिक सुखरूप राहिले. सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती, तसेच पश्‍चिम आशियातील पाचही मुस्लिम देश सध्या भारताच्या जवळ आले आहेत. या सर्व घडामोडींचा एकत्रित परिणाम म्हणून पाकिस्तान एकाकी पडला व जगानेच पाकिस्तानवर दबाव आणून तेथील दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्रे उद्‌ध्वस्त करा, असा धोशा लावला तर काय सांगावे, चमत्कार घडेल व अफगाण प्रश्नाचा तिढा सुटण्यास अनुकूलता निर्माण होईल.

गेल्या सोळा वर्षांत ब्रृहत्तर दक्षिण आशिया विकसित झाला आहे; या ब्रृहत्तर दक्षिण आशियाच्या उत्तरेला अफगाणिस्तान व मध्य / आशियाई मुस्लिम देश आहेत; तर दक्षिणेला विषुववृत्त आहे. पश्‍चिमेला इराणचे आखात आणि पूर्वेला मलाक्काची सामुद्रधुनी आहे. गेल्या सोळा वर्षांत आंतरराष्ट्रीय राजकारणाचा लंबक युरो- अटलांटिक क्षेत्राकडून हिंदी- प्रशांत महासागर क्षेत्राकडे वळला आहे. या क्षेत्रात व ब्रृहत्तर दक्षिण आशियात भारताने कळीची भूमिका पार पाडावी, हीच सध्याच्या जगाची अपेक्षा आहे. अफगाण प्रश्नाचा तिढा सुखा-समाधानाने सुटला तर भारताला केवढा दिलासा मिळेल हे वेगळे सांगायला नको. काबूल ही राजधानी चिंतामुक्त झाली, तर नवी दिल्ली दिवाळी साजरी करील, यात शंका नाही.

Web Title: Afghanistan struggling