टोकदार झालेले जागतिक ध्रुवीकरण

रशियाच्या निवडणुकीतील पुतीन यांच्या विजयानंतर जगाची पुन्हा एकदा दोन भागांत विभागणी होण्यास सुरवात झाली आहे. ही बाब अधिक गंभीर आहे. पुतीन यांच्या विजयावर जगभरातील महत्त्वाच्या देशांनी ज्याप्रकारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, त्यावरून याचा अंदाज येतो.
after russia election putin Dictatorship itself
after russia election putin Dictatorship itselfSakal

रशियाच्या निवडणुकीतील पुतीन यांच्या विजयानंतर जगाची पुन्हा एकदा दोन भागांत विभागणी होण्यास सुरवात झाली आहे. ही बाब अधिक गंभीर आहे. पुतीन यांच्या विजयावर जगभरातील महत्त्वाच्या देशांनी ज्याप्रकारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, त्यावरून याचा अंदाज येतो.

- धनंजय बिजले

रशियाच्या अध्यक्षपदी ब्लादिमीर पुतीन पुन्हा दणदणीत मतांनी विजयी झाले. ‘केजीबी’ या रशियन गुप्तहेर संस्थेत लेफ्टनंट कर्नल म्हणून काम केलेले पुतीन १९९९ मध्ये सर्वप्रथम रशियाचे अध्यक्ष झाले. तेव्हापासून त्यांनी रशियावर पकड मजबूत करण्यास सुरुवात केली.

आजही पोलादी पकड कायम असल्याचे त्यांनी पुन्हा एकवार सिद्ध केले आहे. या निवडणुकीत पुतीन यांनी तब्बल ८७ टक्के इतकी विक्रमी मते मिळवून सोव्हिएत रशियाचे माजी अध्यक्ष जोसेफ स्टॅलिन यांचा सर्वाधिक काळ अध्यक्षपदी राहण्याचा तब्बल २०० वर्षांचा विक्रम मोडला. यावरून ७१ वर्षीय पुतीन यांच्या यावेळच्या निवडीचे महत्त्व लक्षात येते.

रशियात पुतीन यांची एकप्रकारे हुकूमशाहीच आहे. गेल्या वीस वर्षांत त्यांनी आपल्या सर्व विरोधकांचा पद्धतशीर काटा काढल्याने त्यांना या निवडणुकीत प्रबळ विरोधकच नव्हता. त्यामुळे पुतीन यांचा विजय अनपेक्षित नव्हता. पण विजयानंतर लाखोंच्या जनसमुदायापुढे पुतीन यांनी जे वक्तव्य केले ते खूपच अनपेक्षित होते.

‘‘जगात तिसरे महायुद्ध एक पाऊल दूर आहे’’, असे वक्तव्य करून पुतीन यांनी खळबळ उडवून दिली. त्यांच्या या इशाऱ्यामुळे जगभरातील शांतताप्रेमी नागरिकांच्या मनात नक्कीच धास्ती निर्माण झाली असेल. त्यामुळे पुतीन यांच्या विजयानंतर जगापुढे काय वाढून ठेवले आहे, हे पाहणे गरजेचे आहे.

भांडवलशाही, परस्परव्यापार यामुळे जगात आता फारशी युद्धे होणार नाहीत, असे मानले जात होते. कोरोनानंतर कधी नव्हे ते जगातील सर्व देशांना परस्परसहकार्याचे महत्त्व समजले होते. मात्र अचानक पुतीन यांनी युक्रेनवर क्षेपणास्त्रे डागत युद्धाचा भडका उडवून दिला.

युक्रेनवर महिनाभरात विजय मिळवून अमेरिका व युरोपीय देशांना धडा शिकवण्याचा पुतीन यांचा होरा होता. मात्र युक्रेनच्या चिवट प्रतिकारामुळे पुतीन यांचा दावा फोल ठरला. या फेब्रुवारीत दोन वर्षे पूर्ण झाली.

अजूनही हे युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. युद्धाने जागतिक अर्थव्यवस्थेची अपरिमित हानी झाली आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे जगाची पुन्हा एकदा दोन भागांत विभागणी होण्याची सुरवात झाली आहे. ती थांबण्याची चिन्हे नाहीत. ही बाब अधिक गंभीर आहे. पुतीन यांच्या विजयावर मोठ्या देशांनी ज्याप्रकारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, त्यावरून याचा अंदाज येतो.

पाश्चात्त्य देशांची टीका

‘‘रशियातील निवडणुका म्हणजे लोकशाहीची चेष्टा आहे. गेली अनेक वर्ष पुतीन यांनी विरोधकांचा आवाज दडपून टाकला आहे. ज्या निवडणुकांत समोर सक्षम विरोधकच नाही, तर मग तेथील मतदानप्रक्रियेला अर्थ काय?’’

अशा शब्दांत अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी तसेच बहुतांश युरोपीय देशांच्या नेत्यांनी पुतीन यांच्या निवडीची निर्भर्त्सना केली. पुतीन यांना ८७ टक्के लोकांचा पाठिंबा असल्याचा युक्तिवाद फसवा असल्याचा दावा या देशांनी केला.

अर्थात पुतीन यांनी हे आरोप धुडकावून लावले. विशेषतः त्यांनी अमेरिकेला थेट लक्ष्य केले आहे. अमेरिकेत गेल्या वेळी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर खुद्द तेथील नागरिकांनीही विश्वास ठेवला नव्हता. त्यामुळे अमेरिकेने आम्हाला शिकवू नये, असा उलटवार पुतीन यांनी केला. तसेच पाश्चात्त्य देशांची लोकशाही म्हणजेच खरी लोकशाही पद्धत नाही, याचे भान त्यांनी ठेवायला हवे, असे बजावायलाही ते विसरले नाहीत.

चीनचा खंबीर पाठिंबा

पुतीन यांनी विजयानंतर तत्काळ तैवान हा चीनचा अविभाज्य भाग असल्याचे सांगत चीनची बाजू उचलून धरली. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनीही पुतीन यांचे अभिनंदन करीत हा विजय जगातील सत्तासमतोलासाठी निर्णायक ठरेल, असे मत व्यक्त केले.

जगात केवळ अमेरिकाच महासत्ता नसल्याचे चीन गेली काही वर्षे सातत्याने बिंबवण्याचा प्रयत्न करीत आहे. पुतीन यांना बिनशर्त पाठिंबा हा त्याच व्यूहरचनेचा भाग आहे. पश्चिमी देशांनी तैवानवरून चीनविरुद्ध तर युक्रेनवरून रशियाविरुद्ध निर्बंध लादले आहेत. त्यामुळे त्याविरोधात या दोन्ही बलाढ्य देशांनी आघाडी उघडली आहे.

चीन व रशियाने आर्थिक सहकार्यासाठी ‘ब्रिक्स’ गटाची स्थापना केली. त्यात भारत, ब्राझील व दक्षिण आफ्रिका या उगवत्या आर्थिक महासत्तांना स्थान दिले आहे. चीन, उत्तर कोरियाप्रमाणेच क्यूबा, व्हेनेझ्युएलासह लॅटिन अमेरिका, आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक देशांनी पुतीन यांचे अभिनंदन करून आपण अमेरिकेला झुगारत नसल्याचे दाखवून दिले आहे.

माली, नायजेर, बुर्कीना फासो, झिंम्बाब्वे, सोमालिया अशा अनेक गरीब देशांना पुतीन यांनी गेल्या वर्षी अन्नधान्याची प्रचंड मदत केली. या देशांना आधी युक्रेनमधून धान्य जात असे. युद्धात ही साखळी थांबल्यानंतर पुतीन या देशांच्या मदतीला धावून आले. त्यामुळे पुतीन यांच्या पाठीशी हे देश आज ठापमणे उभे राहिले आहेत. त्यामुळे जगाची विचित्र विभागणी झाल्याचे दिसत आहे.

मॅक्रॉन यांची धमकी

येत्या काळात गरज पडल्यास युक्रेनमध्ये प्रत्यक्ष युद्धभूमीवर ‘नाटो’चे सैन्य उतरवावे लागेल, असा इशारा फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी नुकताच दिला होता. त्यामुळे पुतीन यांनी तिसरे महायुद्ध एक पाऊल दूर असल्याचे वक्तव्य करून विरोधी देशांना इशारा दिला आहे.

येत्या काळात पुतीन युक्रेनबाबतच्या धोरणात काहीही बदल न करता लष्करी कारवाया वाढवण्याची शक्यता वर्तविली जाते. त्यातच रशियात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पुतीन आणखी आक्रमक धोरण स्वीकारतील अशी चिन्हे दिसत आहेत.

अशा परिस्थितीत आता वरवर शांत भासणारी जागतिक परिस्थिती क्षणात स्फोटक होऊ शकते. अशा काळात सर्वच जागतिक महासत्तांनी सबुरीने पावले टाकण्याची गरज आहे. अन्यथा साऱ्या जगाची वाटचाल अस्थैर्याकडे जाण्यास वेळ लागणार नाही. हाच पुतीन यांच्या विजयाचा सांगावा आहे.

भारताचा संदेश

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पुतीन यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच मोदी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशीही बोलले. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचा संदेश पुतीन यांच्यासाठी मोलाचा मानला जातो.

रशियाच्या तेलाचा सध्या भारत सर्वांत मोठा खरेदीदार आहे. युरोपिय देशांनी रशियावर निर्बंध घातल्यानंतर तेलाच्या किंमती गडगडल्या. या काळात भारताला रशियातून तेल घेणे फायद्याचे ठरले. यामुळे भारताचा मोठा फायदा झाला. तसेच रशियावरही या निबंर्धांचा फारसा परिणाम झाला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com