‘पृथ्वी’चे विजयगीत

कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने मुंबईच्या विशाल बनकरवर पराभवाच्या छायेला दूर सारत मिळवलेला विजय कुस्तीशौकीनांना निश्‍चितच सुखावणारा आहे
Kolhapur Wrestler Prithviraj Patil Maharashtra Kesari
Kolhapur Wrestler Prithviraj Patil Maharashtra KesariSakal
Summary

यश हे अंतिम नसते, तसेच अपयश हेही घातक नसते. धैर्याने त्याची गोळाबेरीज करीत वाटचाल करायची असते.

उन्हाच्या तडाख्याला न जुमानता साताऱ्याच्या मातीत कुस्तीचे मैदान रंगलेले असताना आलेल्या अवकाळीने सुखद गारवा दिला. आपत्तीवर मात करून पार पडलेल्या महाराष्ट्र केसरीच्या गदेवर तब्बल दोन दशकांनंतर कुस्ती-पंढरी कोल्हापूरचे नाव कोरले गेले. कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने मुंबईच्या विशाल बनकरवर पराभवाच्या छायेला दूर सारत मिळवलेला विजय कुस्तीशौकीनांना निश्‍चितच सुखावणारा आहे. अर्थात, विशालच्या कडवी झुंजीचीही दखल घेतली पाहिजे. महाराष्ट्राच्या मातीतील या रांगड्याला खेळाला कोरोनाच्या महासाथीने ब्रेक लागला होता. खरेतर महाराष्ट्राच्या लौकीकाला साजेसे मल्ल देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत नाहीत, हीच वर्षानुवर्षांची खंत आहे. दरवेळी महाराष्ट्र केसरीच्या लढतीने आशेचे नवे धुमारे फुटतात. तथापि, समस्या नामक अडथळ्यांची शर्यत आणि सातत्यपूर्ण कामगिरीत मल्लांचे कमी पडणे यामुळे ते धुमारे तसेच गळून जातात. मात्र, पृथ्वीराज ज्या पार्श्‍वभूमीतून पुढे आला आणि त्याने चमकदार कामगिरी दाखवली, त्यामुळे आशा पल्लवित झाली आहे. सातारच्या भूमीतील या विजयाने पुन्हा एकदा ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या कर्तृत्वापासून प्रेरणा घेऊन तो कामगिरी बजावेल, अशी आशा धरायला हरकत नसावी.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे ६४वे अधिवेशन अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी साताऱ्यात पार पडले. पृथ्वीराज पाटीलने २१ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर कोल्हापुरात मानाची गदा आणली. पृथ्वीराज मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये हवालदार आहे. जवान असल्याने अंगी बाणलेल्या जिद्द आणि शिस्तीच्या बळावर त्याने यशाला गवसणी घातली, हे त्याच्या कामगिरीचे रहस्य ठरले. त्याच्या लढतीतील चालीतून आणि खेळीतूनही ते जाणवत होते. पृथ्वीराजने कोल्हापुरात जालिंदर आबा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू कुस्ती केंद्रात कुस्तीचा श्रीगणेशा केला. त्याच्या गुणवत्तेला पुण्यातील आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्ये पैलू पडले. त्यामुळे त्याची कामगिरी केवळ उठावदारच झाली असे नव्हे तर त्याच्या बळावर त्याला विजयश्री खेचून आणता आली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कोल्हापूरने जसे ‘हिंद केसरी’ घडविले तसेच मुंबईने क्रिकेटपटू, तमिळनाडूने बुद्धिबळाचे ग्रँडमास्टर, ओडिशाने हॉकीपटू, तर बंगालने फुटबॉलपटू घडविले. इतर ठिकाणची परंपरा शिखराकडे झेपावत असताना कोल्हापूरची कुस्तीतील कामगिरी फिकी पडत होती. ज्या करवीरनगरीच्या भूमीत कुस्ती राजाश्रय आणि लोकाश्रयामुळे रुजली, बहरली आणि फुलली तेथील परंपरा गेल्या दोन दशकांत काळाशी सुसंगत वेग राखू शकली नव्हती. मात्र, त्याला उर्जितावस्था येण्यासाठी या विजयाने नवी उभारी मिळू शकते, असा आशावाद धरायला हरकत नसावी. पृथ्वीराजच्या पराक्रमापासून प्रेरित होत कोल्हापूरच्या कुस्तीने कात टाकण्याचा संकल्प सोडावा आणि तो तडीस नेण्यासाठी दमदार प्रयत्न करावेत. वस्ताद, मल्ल, मल्लांचे पालक, तालिम संघ यांच्या नावाने मल्लांचा गौरवाचे फ्लेक्स झळकावणाऱ्यांनी कुस्तीच्या पुनर्वैभवासाठी कंबर कसावी लागेल. कुस्तीत कर्तबगारी दाखवणाऱ्यांचे कसब उंचावण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यात शास्त्रशुद्धपणा, आधुनिक साधनांच्या वापरातून त्यांची तंदुरूस्ती याकडे जाणीवपूर्वक लक्ष पुरवावे.

मराठमोळा खेळ अशी ओळख असलेल्या कुस्तीचा आणि शिस्तीचा जणू काही छत्तीसचा आकडा आहे, हेही कठोर परीक्षण करताना नमूद करावेच लागेल. महाराष्ट्र केसरी बनल्यानंतर पाऊल वाकडे पडलेल्यांची यादी करणे म्हणजे या आनंदाच्या तसेच अभिमानाच्या क्षणी दुधात मिठाचा खडा टाकण्यासारखे वाटू शकेल. मात्र वास्तवाचे भान आल्याशिवाय उणिवांवर मात करून पुढे जाता येत नाही, हेही लक्षात घ्यावे. महाराष्ट्र केसरी किताब विजेत्याने ऑलिंपिक पदक जिंकावे, अशी अपेक्षा रास्त आहे. मात्र त्या दिशेने मार्गक्रमणासाठी सक्षम यंत्रणा आणि व्यवस्था आपल्याकडे आहे का? राज्य पातळीवरील या स्पर्धेत मुख्य किंवा वजनी गटातील यशानंतरच मराठी मल्लांची खरी कसोटी असते. त्यांना राष्ट्रीय पातळीवर उत्तरेकडील मल्लांच्या आव्हानाला पुरून उरण्यासाठी कठोर, काटेकोर प्रयत्न आणि मेहनत गरजेची असते. या आघाडीवर राहुल आवारे हा एकांड्या शिलेदारासारखा लढतो आहे. खरेतर महाराष्ट्र केसरीतील विजेत्यांना देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश कसे मिळवता येईल, यासाठीचा रोडमॅप विजेत्यांनी आणि त्यांच्या वस्तादांनी आखावा. अधिवेशनात विजेत्याची कामगिरी उंचावण्यासाठी उपाययोजना ठरवून कार्यवाहीची स्थायी यंत्रणा निर्माण करावा. अनेकदा संसद, विधिमंडळाचे अधिवेशन पार पडते तेव्हा ‘सूप वाजले’ असा उल्लेख केला जातो. दुर्दैवाने महाराष्ट्र केसरी कुस्ती अधिवेशनाची अवस्था काहीशी अशीच होत आहे. माजी विजेत्यांच्या मानधनात वाढ, आजी विजेत्यांच्या खुराकाचा खर्च, महाराष्ट्र केसरी विजेत्याला सरकारी नोकरी असे विविध मुद्दे चर्चेत येतात. मात्र चर्चेपलीकडे त्यावर भरीव काहीच होत नसल्याने आखाड्यातच कुस्तीच्या वाट्याला उपेक्षा येत आहे. पृथ्वीराजच्या विजयाच्या निमित्ताने कुस्तीगीर परिषदेने चिकित्सक परीक्षण करून मल्लांना प्रोत्साहन आणि विजेत्यांच्या कामगिरीतील सुधारणांसाठी भरीव आणि दमदार पावले टाकली तर लोकाश्रयाने लाल मातीची मैदाने पुन्हा घुमू आणि गाजू लागतील. आपल्याकडे कुस्तीशौकिनांची कमी नाही, तर त्याला प्रोत्साहन देणाऱ्यांची उणीव भासत आहे. ती दूर होणे म्हणजेच कुस्तीच्या मैदानावरील यशाचा दुष्काळ हटवणे आहे.

यश हे अंतिम नसते, तसेच अपयश हेही घातक नसते. धैर्याने त्याची गोळाबेरीज करीत वाटचाल करायची असते.

- विन्सटन चर्चिल, ब्रिटनचे माजी पंतप्रधान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com