अलेप्पोतील युद्धाची जागतिक धग

Aleppo in its global war
Aleppo in its global war

गेल्या महिनाअखेरपासून सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांनी रशिया, इराण आणि हेजबोल्लाह यांच्या मदतीने सीरियातील अलेप्पो या सर्वात मोठ्या शहराचा ताबा असलेल्या विरोधकांशी निकराची लढाई सुरू केली. अमेरिका, तुर्कस्तान, सौदी अरेबिया आणि इतर सुन्नीबहुल आखाती देशांनी या विरोधकांना रसद पुरवली आहे. याच रसदीच्या जिवावर हे विरोधक असद सरकारशी गेले चार वर्षे अलेप्पोत लढत आहेत. मात्र, रशियाच्या जोरदार हवाई हल्ल्यामुळे आणि अमेरिकेने एकूण सीरिया प्रकरणात केलेल्या दुर्लक्षामुळे असद सरकारने या विरोधकांना जेरीस आणले. कमी होणारे संख्याबळ आणि दबावापोटी या विरोधकांनी रशियाशी बोलणी करून शस्त्रसंधी मान्य केली. इतके दिवस सामान्य नागरिकांच्या आडून लढाई करणाऱ्या विरोधकांचे असद सरकारने कंबरडे मोडले आहे. वेढा घातलेल्या अलेप्पोत सामान्य नागरिक अडकले होते. रुग्णालयांची, अन्न-पाण्याची वाताहात झाली होती. या शस्त्रसंधीमुळे जखमी नागरिक आणि हत्यारे टाकलेल्या विरोधकांना मोकळी वाट करून एका रक्तरंजित अध्यायाची समाप्ती झाली आहे. अलेप्पो हे तुर्कस्तान आणि सीरियाला जोडणारे, बाजारपेठा असणारे महत्त्वाचे शहर आहे. त्याचा ताबा मिळवणारा गट सीरियाप्रश्नात वरचढ ठरेल. इतके दिवस विरोधक अलेप्पोच्या जोरावर असद यांना खुर्चीवरून खाली खेचू पाहत होते. त्यांच्या या प्रयत्नांना असद यांनी सुरुंग लावला आहे. 

अलेप्पोचा विजय हा सीरिया प्रकरणाचा कल बदलवू शकतो. आनंद साजरा करणाऱ्या असद, रशिया, इराण आणि लेबेनॉनच्या हेजबोल्लाह यांच्या आत्मविश्वासाला आता अधिक धार चढेल. अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या गटाचा पराजय तसेच, संपूर्ण सीरियातील लढ्यात आता असद यांचे पारडे जड असा हा दुहेरी आनंद आहे. असद हे ’अलावाईत’ गटाचे असून ते शियापंथात मोडतात. त्यांचा विरोधक सुन्नी गटाला अमेरिकेने केलेली मदत त्यांना रूचली नाही. म्हणूनच ‘आयसिस’च्या ताब्यात असलेले रक्का आणि अल-कायदाच्या ताब्यातील इदलिब ही शहर सोडून त्यांनी अमेरिकेचे थेट समर्थन असणाऱ्या विरोधकांच्या ताब्यातील अलेप्पोला हात घातला. आता त्यांचा रोख रक्का आणि इदलिब शहरांवर असेल. या लढाईत त्यांनी नागरिक आणि समोर येईल त्याला जमीनदोस्त करत अमेरिकेचा वचपा काढला. या एका डावामुळे त्यांनी आपली खुर्ची शाबूत राखली आहे. रशियाने मध्यस्थीची बोलणी करून आपणच शांतिदूत असल्याचे संकेत दिले आहेत. सीरिया हा पश्‍चिम आशियातील रशियाचा सख्खा मित्र. त्याला मदत करतानाच आपण शांतता प्रस्थापित करू इच्छितो, हे चाणाक्ष पुतीन यांनी दाखवून दिले आहे. तसेच दहशतवाद्यांना ठेचून युरोपकडे जाणाऱ्या निर्वासितांचा रेटा आपण थांबवू पाहत आहोत, हे त्यांनी आधीच ग्रासलेल्या युरोपीय समुदायाला निर्देर्शित केले आहे. पुतीन यांच्या या चालीमुळे अमेरिकेच्या पश्‍चिम आशियातील धोरणांना जबर फटका बसला आहे. २०१३ मध्ये असद यांच्याविरोधात रासायनिक शस्त्रास्त्रांचे पुरावे असतानादेखील ओबामांनी बोटचेपे धोरण स्वीकारले. त्याचे थेट परिणाम म्हणून अमेरिका आज या प्रदेशात पिछाडीवर फेकली गेली आहे. ओबामांचा कार्यकाळ जवळपास संपत असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीआधी असद आणि त्यांचे सहकारी हालचालींमध्ये वेग आणतील. परराष्ट्रीय धोरणाबाबत आपली ठोस भूमिका जाहीर न केलेले ट्रम्प रशियाशी हातमिळवणी करण्याची वाच्यता करीत आहेत. रेक्‍स टिलरसन या पुतीन यांच्या निकटवर्ती उद्योगपतीला परराष्ट्रमंत्रिपद देऊन त्यांनी ती दिशा स्पष्ट केली.तसे केल्यास सौदी आणि आखातातील अमेरिकेचे इतर सहकारी काय भूमिका घेतात, यावर या पट्ट्याचे स्थैर्य अवलंबून आहे. इराण आणि हेजबोल्लाहने असद यांना केलेली मदत शिया गटाचे वजन वाढवत आहेत. सुन्नी गटाचा कैवारी असणारी सौदी शिया गटाची होणारी ही सरशी किती खपवून घेतो, यावर आंतरराष्ट्रीय राजकारण हेलकावे घेईल. मात्र, अलेप्पोत शाश्वत विजय मिळवलेला इराण आता शांत बसेल असे दिसत नाही. याच पद्धतीची शिया-सुन्नी लढाई इराण व सौदी येमेनमध्ये खेळत आहेत. अगदी परवा अमेरिकेने आपला हात किंचित आखडता घेत सौदीला शस्त्र मिळत राहतील असे जाहीर केले आहे. या गोंधळात संपूर्ण पश्‍चिम आशियात कैक कोटी डॉलरची शस्त्रे रिचवली जात आहेत. या प्रदेशामधून निर्वासित म्हणून युरोपमध्ये दहशतवादी गेल्याचे गुप्तचर यंत्रणा सांगत आहेत. त्यामुळे पश्‍चिम आशिया व युरोपमध्ये धोक्‍याच्या घंटा वाजू लागल्या आहेत. अलेप्पो पडल्यानंतरदेखील सीरियातील वणवा शमणार नाही तो यामुळेच.

सुसंस्कृत आणि एकात्मिक प्रदेशाची डोळ्यांदेखत राख कशी होऊ शकते, याचे अलेप्पो त्यामुळेच एक ज्वलंत उदाहरण आहे. अलेप्पोच्या पूर्वेला पडलेल्या वेढ्यातून जरी हा जनप्रवाह आता बाहेर आला असला, तरी त्यांची ही सुटका सहजासहजी झालेली नाही. तब्बल चार वर्षांहून अधिक वेळ या शहरासाठी युद्ध सुरू होते. या काळात त्यांनी उपासमार, रोजचा बॉम्बवर्षाव, कुपोषण, रोगराई आणि मरणाच्या छायेत घालवली आहेत. हजारोंचे उघड शिरकाण झाले आहे. शेकडो लोक इमारतींच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. बेचिराख झालेल्या अलेप्पोचे पुनर्वसन, शिक्षण व वैद्यकीय व्यवस्था, संस्कृती आणि समाजमन पूर्णपणे उभारी घेईपर्यंत अनेक वर्षे जातील.  सांप्रत काळातील या कत्तलीला जबाबदार असणाऱ्या संबंधित राष्ट्रांचा, मुत्सद्देगिरीचा, तुमच्या-आमच्या माणुसकीचा हा पराभव आहे, हे मात्र विसरून चालणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com