अमेरिकी गुप्तचर संचालकांची ‘कृष्णनीती’

अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड या जन्माने हिंदू नाहीत.
tulsi gabbard and s jaishankar
tulsi gabbard and s jaishankarsakal
Updated on

- सुनील चावके

अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड या जन्माने हिंदू नाहीत. पण पाच दशकांपूर्वी त्यांच्या कॅथलिक ख्रिश्चन मातापित्यांनी हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर जन्मलेल्या त्रेचाळीसवर्षीय तुलसी गबार्ड यांची हिंदू धर्मावरील आस्था कुठल्याही सनातन धर्मीयापेक्षा वादातीत आहे.

आपल्या दोन दशकांच्या राजकीय वाटचालीदरम्यान भगवान श्रीकृष्ण, भगवतद्‍गीता आणि गीतेतील कृष्ण-अर्जुन संवादातून सदैव प्रेरणा घेणाऱ्या तुलसी गबार्ड यांचा भारताच्या समृद्ध संस्कृतीवर गाढ विश्वास आहे. बारा वर्षांपूर्वी, अमेरिकेच्या सभागृहाच्या प्रतिनिधी बनल्या तेव्हा त्यांनी गीतेवर हात ठेवून शपथ घेतली होती.

आध्यात्मिक साधना आणि ईश्वराशी संबंध आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी आहे, असे सांगणाऱ्या तुलसी गबार्ड ‘अलोहा, नमस्ते, जय श्रीकृष्ण’ अशा संबोधनांनी अभिवादन करतात. या शब्दांचे अर्थ गहन, शक्तिशाली आणि आध्यात्मिक आहेत, असे त्या सांगतात.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर तुलसी गबार्ड यांनी अडीच दिवसांचा दिल्ली दौरा केला. व्हाईट हाऊसच्या अव्वल अधिकाऱ्याचा हा पहिलाच भारतदौरा. पंतप्रधान मोदी यांनी भारतात दाखल झालेल्या गबार्ड यांचे प्रयागराजच्या महाकुंभाच्या संगमातील गंगाजलाने भरलेला कलश भेट देऊन स्वागत केले, तर तुलसी गबार्ड यांनीही मोदींना तुळशीची माळ भेट दिली.

अशा या तुलसी गबार्ड यांचे महत्त्व अनन्यसाधारण यासाठी की, अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक असण्याच्या नात्याने जगातील प्रत्येक देशाची इत्थंभूत गोपनीय माहिती आज त्यांच्यापाशी आहे. श्रीकृष्ण भक्तीपोटी भारताशी आध्यात्मिक नाळ जोडली गेल्यामुळे एकप्रकारे त्यांना ट्रम्प प्रशासनातील भारताच्या दृष्टीने एक हक्काच्या प्रतिनिधी मानता येईल.

त्या धार्मिक प्रवृत्तीच्या हिंदू आहेत. पण आपण सर्वच ईश्वराची मुले आहोत आणि कोणत्याही जात, धर्म, राजकीय, सामाजिक पार्श्वभूमीच्या व्यक्तीच्या ह्रदयात शाश्वत दिव्य आत्मा आहे, असेही त्या म्हणतात. पण अमेरिकेचा आजवरचा अनुभव लक्षात घेता त्या निखळ भारतहितच पाहतील का, हे पाहावे लागेल.

‘अमेरिका सर्वप्रथम’ म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा सत्तेची सूत्रे स्वीकारली. ट्रम्प आत्मकेंद्रित नाहीत, असा गबार्ड यांचा दावा आहे. देशाची धोरणे निश्चित करताना ट्रम्प अमेरिकी नागरिकांच्या सुरक्षा आणि स्वातंत्र्याला प्राधान्य देत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आपल्या देशवासीयांविषयी अशीच भूमिका अपेक्षित आहे, असे त्या स्पष्ट करतात.

ट्रम्प यांना अभिप्रेत असलेली जागतिक शांतता, स्वातंत्र्य आणि भरभराटीसाठी संवादाचे मार्ग खुले करुन विविध देशांशी संबंध मजबूत करण्याची मोहीम हाती घेणाऱ्या तुलसी गबार्ड आयातशुल्क धोरणामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये उलथापालथ घडवू पाहणाऱ्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रतिमासंवर्धनाचाही प्रयत्न करतात.

त्यांच्या मते ट्रम्प आणि मोदी महान नेते आणि महान मित्र आहेत. दहशतवाद जगासाठी सर्वात मोठा धोका असून त्याविषयी ट्रम्प अतिशय गंभीर आहेत आणि पंतप्रधान मोदी यांनीही या संकटाची अतिशय गंभीरपणे दखल घेतली आहे.

ट्रम्प यांचे राजकारण काहीही असो; पण अमेरिकी नेते भारतात आल्यानंतर भारतीयांच्या कानाला सुखावेल, अशी भाषा करतात. गबार्डही त्याला अपवाद असण्याची शक्यता नाही. ‘‘भारत आणि अमेरिका मिळून इस्लामिक दहशतवादाचा निःपात करतील’’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे, हे या संदर्भात महत्त्वाचे आहे.

भारत भेटीदरम्यान गबार्ड यांनी उच्चपदस्थांकडून भारताच्या सुरक्षाविषयक चिंता ऐकून घेतल्या. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तसेच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत भारताच्या सुरक्षाविषयक मुद्यांवर त्यांनी विस्ताराने चर्चा केली. बांगला देशात अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांविषयी त्यांनी उघड रोष व्यक्त केला.

केवळ इस्लामिक दहशतवादीच नव्हे तर अमेरिकेतील खलिस्तानी अतिरेक्यांच्या हिंदूंविरोधी वाढत्या कारवायांना लगाम घालण्याच्या राजनाथ सिंह यांच्या मागणीचेही त्यांनी समर्थन केले. तसेच चीन आणि पाकिस्तानसोबतच्या भारताच्या संबंधांवरही चर्चा केली.

अजित डोवाल आणि गबार्ड यांच्या बैठकीत कॅनडाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तसेच ब्रिटिश एमआय-६ प्रमुखांसह सामील झालेल्या वीस देशांच्या गुप्तचर प्रमुखांनी त्यांच्या भूमीचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी होऊ देणार नसल्याची ग्वाही दिली.

जीवनातील चांगल्या आणि वाईट क्षणी श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल्या प्रेरक उपदेशांमधून शक्ती आणि शांतीचे धडे घेणाऱ्या तुलसी गबार्ड यांची ‘कृष्णनीती’ दहशतवादाचा सामना करताना भारतासाठी उपयुक्त व मार्गदर्शक ठरणार का, हे काळच सांगेल. पण अमेरिकेकडून भारताच्या ज्या अपेक्षा आहेत, त्यात ‘दहशतवादविरोधी लढा’ तेवढ्याच जोमाने चालू ठेवणे हा मुद्दा अग्रक्रमाचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com