मुत्सद्देगिरी की तडजोड?

ladakh
ladakh

लडाखमधील पॅन्गाँग सरोवराच्या परिसरातून भारत व चीन यांच्या सैन्याची माघारी आणि त्यासाठी करण्यात आलेली तडजोड हा व्यावहारिक लवचिकतेचा भाग मानला तरी भारताने त्यातच समाधान मानून चालणार नाही. एक संघर्षबिंदू शांत (?) केलेला असला तरी इतर संघर्षबिंदूंबाबतही तातडीने प्रयत्न करावे लागतील.

आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये देवाणघेवाण अपरिहार्य असते. त्यात दोन शेजारी देशांमधील संबंध कायमस्वरूपी वैशिष्ट्यपूर्ण राहतात, कारण शेजारी बदलता येत नाहीत. त्यामुळेच त्या संबंधांमध्ये लवचिकतेला नेहमीच वाव ठेवावा लागतो आणि ते विशुद्ध वस्तुनिष्ठ व वास्तववादी ठेवावे लागतात. त्यामध्ये उगाचच कोणा राज्यकर्त्यांनी देशभक्तीचे प्रदर्शन किंवा राष्ट्रवादाचे दावे करण्याचे टाळणे उपकारक ठरते. 

लडाखमधील पॅन्गाँग त्सो (त्सो म्हणजे सरोवर) सरोवर व परिसर हा भारत व चीन दरम्यान नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. उभय देशांदरम्यानची सीमारेषा या सरोवराच्या मध्य भागातून जाण्याचे मूलभूत तत्त्व मान्य केले तरी त्याचा आधार काय? लांबी की रुंदी? सरोवराची लांबी १३४ किलोमीटर, तर रुंदी सरासरी अडीच ते पाच किलोमीटर आहे. रोहित पक्ष्याची चिंचोळी मान असते तसे हे सरोवर आहे. चीनने नेहमीच लांबीचा आग्रह धरला आहे, कारण त्यामुळे त्यांना भारताच्या बाजूच्या भूभागात प्रवेश मिळतो, तर भारताने सातत्याने रुंदी हा आधार मानण्याची भूमिका घेतली आहे. या सरोवराच्या चीनला लागून असलेल्या किनाऱ्यावर विविध ठिकाणी डोंगरांच्या उतरणीचे काही भूभाग पुढेपर्यंत येऊन सरोवरात विलीन झालेले असल्याने हाताच्या बोटांसारखा हा भूभाग दिसतो. त्यामुळे त्या पुढे येऊन सरोवराला मिळणाऱ्या भूभागांचे वर्णन ‘फिंगर’ म्हणजे ‘बोट’ असे केले जाते. या सरोवराच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर असलेला ‘फिंगर-३’ हा बिंदू भारताच्या कायमस्वरूपी ठाण्याचे स्थान आहे, तर उत्तरेकडील ‘फिंगर-८’ हा चीनच्या कायमस्वरूपी ठाण्याचा बिंदू मानला गेला आहे. अर्थात ही १९६२च्या युद्धानंतरची उभयमान्य स्थिती आहे. याच्या पलीकडे असलेल्या अक्‍साई चीनसह एकंदर ४३ हजार चौरस किलोमीटर भूभागावरील हक्क भारताने तत्त्वतः सोडलेला नाही. १९६२ पासून हा प्रदेश चीनच्या ताब्यात आहे. ‘फिंगर-३’ ते ‘फिंगर-८’पर्यंतच्या भूभागात भारताकडून नियमित गस्त घातली जात होती. गेल्या वर्षीच्या मार्च-एप्रिल महिन्यात चीनने ‘फिंगर-८’पासून पुढे येऊन ‘फिंगर-४’पर्यंतच्या भूभागात घुसखोरी केली होती. या चिनी सैनिकांना परतवून लावताना झालेल्या झटापटीत भारताचे वीस जवान हुतात्मा झाले. चीनने अद्याप त्यांच्या प्राणहानीचा आकडा अधिकृतपणे जाहीर केलेला नसला, तरी ती संख्या ४३ असल्याचे सांगितले जाते. या झटापटीनंतर वाढलेल्या प्रचंड तणावामुळे उभय देशांनी या परिसरात सैन्य आणि लष्करी साधनसामग्रीची मोठी जमवाजमव केली. चीनने कारकोरम खिंडीच्या तळाला असलेल्या भारताच्या दौलतबेग ओल्डी धावपट्टी भागातील देपसांग, गोग्रा, हॉटस्प्रिंग या परिसरात जमवाजमव केली आणि या भागातील सैन्य-माघारीच्या प्रक्रियेबाबत बोलणी व्हावयाची आहेत. संरक्षणमंत्र्यांनी केलेल्या निवेदनानुसार वर्तमान माघार पूर्ण झाल्यानंतर ही बोलणी सुरू होतील.

पुन्हा गस्तीची मुभा चर्चेनंतरच
पॅन्गाँग सरोवर परिसरातून सैन्याची माघार होत आहे. या संदर्भात उभय देशांच्या लष्करी आणि राजनैतिक पातळीवरील उच्चाधिकाऱ्यांच्या चर्चेच्या नऊ फेऱ्यांनंतर हा तोडगा काढण्यात आला. त्यानुसार पॅन्गाँग सरोवराच्या परिसरातील सैन्य व लष्करी साधनसामग्री (रणगाडे, चिलखती वाहने, तोफा इ.) माघारी घेताना चीनने पुन्हा त्यांच्या मूळ ठिकाणी म्हणजे ‘फिंगर-८’पर्यंत सैन्य मागे नेणे आणि भारताने ‘फिंगर-३’पर्यंत माघार घ्यावयाची आहे. पण यात काही अनुत्तरित प्रश्‍न आहेत. ते संरक्षणमंत्र्यांनी संसदेत केलेल्या निवेदनातूनच निर्माण झालेले आहेत. मार्च २०२०पर्यंत भारतीय सैन्य ‘फिंगर-३’ ते ‘फिंगर-८’पर्यंतच्या परिसरात नियमित गस्त घालत असे. परंतु नव्याने काढण्यात आलेल्या तोडग्यानुसार यापुढील काळात या परिसरातील गस्त ही उभय देशांच्या राजनैतिक व लष्करी पातळीवरील परस्परसंमतीनंतर करण्याचे तत्त्व मान्य करण्यात आले आहे. याचा अर्थ काय ? ‘फिंगर-८’ ते ‘फिंगर-३’पर्यंतच्या सुमारे दहा किलोमीटर भागाचा हा परिसर ‘बफर झोन’ म्हणून नव्याने तयार करण्यात आला आहे. भारत सरकार ही बाब उघडपणे मान्य करीत नसले, तरी त्यांच्या निवेदनातून तोच अर्थ निघतो. कारण भारतीय सैन्याला आता पूर्वीसारखे (मार्च २०२० पूर्वीचे) गस्तीचे स्वातंत्र्य राहिलेले नाही. हे कितपत उचित झाले हे आता सूज्ञांनी ठरवावे !

हा परिसर कैलास पर्वतराजी किंवा पर्वतमालिकेत समाविष्ट आहे. चीनने गेल्या वर्षी आगळीक केल्यानंतर भारतीय सैन्याने ‘फिंगर-३’ परिसरातील उंचावरील सर्व भाग ताब्यात घेऊन तेथे आपली ठाणी प्रस्थापित केली. तेथे चीनचे सैनिक तुलनेने कमी उंचीवर होते. या उंचीमुळे भारताला या परिसरात सामरिक वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळाले होते. त्यामुळे वाटाघाटींमध्ये प्रथम भारतीय सैन्याने उंचीवरील ठाण्यांवरून माघार घ्यावी याबाबत चीन आग्रही होता. ती बाबही भारताने मान्य केल्याचे आता स्पष्ट होताना दिसते. काही लष्करी अधिकाऱ्यांच्या मते ज्याप्रमाणे उंचावरील या ठाण्यांवरून माघार घेण्याच्या बदल्यात चीनला पुन्हा ‘फिंगर-८’पर्यंत मागे जाण्यास भाग पाडण्यात आले, तसेच देपसांग आणि हॉटस्प्रिंग व गोग्रा येथूनही त्यांनी लगेचच माघार घेण्याचे त्यांच्याकडून कबूल करवून घ्यायला हवे होते. परंतु संरक्षणमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार ती बोलणी नंतर होतील. याचे कारण असे की देपसांग, गोग्रा व हॉटस्प्रिंग भागात चीनची ठाणी भारतापेक्षा अधिक उंचीवर आहेत व तेथे त्यांचा सामरिक वरचष्मा आहे आणि त्यामुळे त्याबाबत ते चालढकल करू शकतात असे लष्करी अधिकाऱ्यांचे मानणे आहे. कारण हे तीन संघर्षबिंदूही तेवढेच महत्त्वाचे आहेत. तसेच याच भागातून भारताने अलीकडेच तयार केलेला दारबुक-श्‍योक-दौलतबेग ओल्डी रस्ता जातो. त्या रस्त्याच्या वरच्या बाजूला उंचीवर चीनची ठाणी आहेत व तेथून ते या रस्त्याला लक्ष्य करू शकतात. त्यामुळे भारताने केवळ पॅन्गाँग नव्हे, तर सर्वच भागातील सैन्य-माघारीबाबत तोडगा काढणे आवश्‍यक होते, असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते.

उच्चरवाने एखादी गोष्ट सांगितल्याने ती खरी ठरत नाही. वास्तवाची जाणीव प्रगल्भपणे जनतेला करून देण्याऐवजी आक्रस्ताळेपणा केल्याने आणि सत्ताधाऱ्यांच्या तेवढ्याच पोरकट आचरणाचे अनुकरण करणाऱ्या नेत्यांमुळे विषयाचे गांभीर्य नष्ट झाले. पॅन्गाँग सरोवराच्या परिसरातून सैन्य-माघारी व त्यासाठी करण्यात आलेली तडजोड हा लवचिकतेचा भाग मानला तरी त्यात समाधान मानून चालणार नाही. एक संघर्षबिंदू शांत (?) केलेला असला तरी इतर संघर्षबिंदूंबाबतही तातडीने हालचाली कराव्या लागतील. पॅन्गाँग परिसरात सध्या तापमान उणे चाळीसच्या खाली आहे. ही बाबही माघारीसाठी निर्णायक ठरली. परंतु आणखी दोन महिन्यांत बर्फ वितळू लागल्यानंतर परिस्थिती कशी वळण घेते हेही पाहावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com