जहाजबांधणीची प्राचीन भारतीय परंपरा

Aniket Yadav writes
Aniket Yadav writes

भारत-पाकिस्तान यांच्यातील १९७१ मधील युद्धातील ‘ऑपरेशन ट्रायडेंट’ अविस्मरणीय आहे. या मोहिमेद्वारे पाकिस्तानी नौदलाचा विध्वंस केला गेला. त्या घटनेची स्मृती म्हणून ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने जहाजबांधणीच्या आपल्या प्राचीन परंपरेविषयी...

- अनिकेत यादव

भा  रत पाकिस्तान यांच्यातील युद्धाचे पडघम १९७१ मध्ये वाजू लागले. स्थल सेनेबरोबरच भारतीय नौदलानेही शत्रूस धडा शिकविण्यासाठी आपली कंबर कसली. ‘ऑपरेशन ट्रायडेंट’ अंतर्गत केलेल्या या धाडसी मोहिमेत ४ डिसेंबर १९७१ रोजीच्या रात्री भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या नौकांचा विध्वंस तर केलाच; पण अत्यंत वेगाने केलेल्या या हल्ल्यामुळे शत्रू पुरता गांगरून गेला होता. नौदलाच्या या विशेष पराक्रमाची चिरंतन स्मृती म्हणून भारत सरकारने ४ डिसेंबर हा दिवस ‘भारतीय नौदल दिन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. याच नौदल दिनाच्या निमित्ताने आपल्या जहाजबांधणी कौशल्याची परंपरा किती प्राचीन आहे, त्याचा मागोवा याप्रसंगी घेणे रास्त ठरेल.

लोथलमधील प्राचीन गोदी

प्राचीन भारतीय संस्कृतीमधील अत्यंत महत्त्वाचे शहर म्हणजे लोथल. इसवी सन पूर्व २४०० इतके जुने असलेले हे शहर गुजरातमधील अहमदाबादपासून जवळ आणि खंबायतच्या आखातापासून नजिक वसलेले आहे. १९५५ ते १९६२ दरम्यान प्रा. एस. आर. राव यांच्या मार्गदर्शनाखाली त्या परिसरात झालेल्या उत्खननामध्ये प्रथमच दोन प्रकारची वसतिस्थाने आढळली. एक होता निवासी भाग तर दुसरा व्यापारी भाग. निवासी क्षेत्रामध्ये समाजातील काही प्रमुख लोकांची प्रामुख्याने व्यापाऱ्यांची घरे (नगर), स्नानगृह, विहीर, ड्रेनेज, स्मशान (शवाघर) इ. तर व्यापारी क्षेत्रामध्ये जहाजबांधणीची गोदी, माल साठवणूक करण्यासाठी गोदाम, कामगारांसाठी घरे इत्यादी होते.

एवढेच नाही तर नदीच्या पुरामुळे येथील घरांना नुकसान पोहोचू नये, म्हणून चबुतरे बांधलेले होते. नागरी वस्तीची व्यवस्थित चौकोनी आखणी केलेली होती. अगदी सरळ रेषेत रस्ते देखील बांधलेले होते. पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी होत्या. तसेच सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाले (ड्रेनेज) होते. नाल्यांमध्ये कचरा साठू नये म्हणून वेगळी सोय केलेली होती. हे सर्व पाहिले की, आपल्याच पूर्वजांचे कौतुक करावेसे वाटते आणि आजच्या आपल्या तथाकथित ‘सुधारलेल्या’ आधुनिक समाजाची कीव करावीशी वाटते.

आजवरच्या ज्ञात उत्खननामध्ये लोकांची घरे (नगर) सर्वत्र सापडलेली होती. मात्र जहाजबांधणीची गोदी आणि गोदाम मात्र कोठेही सापडलेले नव्हते, की जे येथे सर्वप्रथम सापडले. आजपासून ४४०० वर्षांपूर्वीचे अवशेष. जहाजबांधणीची ही गोदी (dockyard) जगातील प्राचीन गोदींपैकी एक आहे. येथून जहाजांद्वारे अनेक मौल्यवान वस्तू आणि साहित्य बाहेरील देशांमध्ये पाठविले जाई. एवढी प्राचीन आपली जहाजबांधणीची परंपरा आहे. आणखी एक अत्यंत महत्त्वाचे, लोथलच्या गोदीचा सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृतीशी संबंध जोडला जातो.

मात्र याला सिंधू संस्कृती म्हणण्याऐवजी ‘सरस्वती संस्कृती’ म्हणायला हवे. प्राचीन काळी येथून सरस्वती नदी वाहत समुद्राला मिळत होती. त्या नदीच्या खाडीजवळ ही जगप्रसिद्ध गोदी उभारली गेली. सरस्वती नदी लुप्त झाली आणि त्या नदीजवळ असलेली प्राचीन गोदी आणि अवशेष देखील काळाच्या पडद्याआड गेले.

मात्र आपली जबाबदारी आहे की, या संस्कृतीची व आपल्या प्राचीन ठेव्याची योग्य जपणूक करून त्याची सर्वदूर माहिती पसरवणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com