
वि. दा. पिंगळे
लोकशाहीर, साहित्यिक, नाटककार, विचारवंत व वक्ते म्हणून समाज मनात लोकप्रिय असलेले अण्णा भाऊ साठे एक महान साहित्यिक होते. अण्णांच्या साहित्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी मराठी साहित्याचा केंद्रबिंदू हलविला. साहित्य हे समाज परिवर्तनाचे मोठे शस्त्र आहे. या भूमिकेतून त्यांनी लेखन केले. दलित व कामगार माणसांची, स्त्रियांची जगण्यासाठी चाललेली झुंज अण्णाभाऊंनी पहिल्यांदा साहित्यात मांडले. पोवाडे, लावण्या ,किसान गीते ,मजूर गीते, छक्कड, गन, लोकनाट्य, कथा व कांदबरी असे विपुल लेखन त्यांनी केले. ‘‘माझ्या साहित्यातला नायक हा काल्पनिक नाही तर तो माझा अवतीभोवतीचा आहे, त्याचे जीवन मी पाहिलेले आहे आणि त्या दुःखदैन्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी मी लिहितो’’, असे ते सांगत.