‘अवनी’चा धोका टाळण्यासाठी...

anuj khare
anuj khare

विपरीत परिस्थितीमुळे नरभक्षक झालेल्या ‘अवनी’ या वाघिणीला धरावे किंवा ठार मारावे, या आदेशावरून निर्माण झालेला वाद ‘अवनी’ ताब्यात आल्यावर मिटेल. मात्र, यांतून पुढे आलेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्‍नावर चर्चा होत नाही आणि तो म्हणजे यापुढे नवी ‘अवनी’ होऊ नये, यासाठी काय केले पाहिजे...

य वतमाळ जिल्ह्याचे राजकीय, सामाजिक आणि नैसर्गिक स्वास्थ्य पांढरकवडा शहराजवळच्या ‘अवनी’ म्हणजे ‘टी-१’ नावाच्या वाघिणीमुळे हरवले आहे. एरवी माणसांकडेच नव्हे, तर मानवी वस्तीतील पाळीव प्राण्यांकडेही ढुंकूनही न पाहणारे वाघ गाई-गुरे नेत आहेत आणि त्यातूनच कधीतरी ‘अवनी’सारखे नरभक्षकही होत आहेत. नष्ट होणारा नैसर्गिक अधिवास वाढवणे, दोन जंगले जोडणारे मार्ग (कॉरिडॉर) सुरक्षित राखणे आदी उपायांची गरज यांतून अधोरेखित होते. आईपासून अनेक गोष्टी शिकून बछडे अडीच वर्षांपासून तिच्यापासून बाजूला होतात. असे तरुण वाघ पांगले की त्यांना स्वतःची हद्द निर्माण करण्याची गरज असते. हे वाघ जंगलाच्या शोधार्थ काहीशे किलोमीटरचा प्रवासही करतात. ‘अवनी’ही सुमारे पन्नास किलोमीटरचा प्रवास करून टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यातून पांढरकवडा येथे आली. वाघाला दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी सुरक्षित मार्गाची गरज असते. हे मार्ग संपत चालले आहेत. डॉ. राजेश गोपाल यांच्या ‘Dynamics of Tiger Management’ या पुस्तकातील आकडेवारीनुसार विविध कारणांस्तव २०१३ पर्यंत ११ हजार ५५९ चौरस किलोमीटरची जमीन जंगलांपासून आपण हिरावून घेतली आहे. विकासाचा दृष्टिकोन असणे हा गुन्हा नव्हे; पण निसर्गाला धक्का न लावता केलेला विकास हाच शाश्वत विकास आहे. जंगलाची क्षमता संपली, की जास्तीचे वाघ नवीन जंगलाकडेच वळणार. त्यांना सुरक्षित मार्ग आणि नवीन जंगलच शिल्लक राहिले नाही, तर ‘वाघ वाचवा’ मोहिमेला तरी काय अर्थ आहे? या साऱ्यांमध्येच पांढरकवडा समस्येची कारणे आहेत.
 पांढरकवडामध्ये सुमारे ८४ चौरस किलोमीटरचे जंगल आहे. तेथे ‘अवनी’बरोबरच आणखी एक नर वाघ आहे. फक्त ८४ चौरस किलोमीटरचेच जंगल असले, तरी ‘अवनी’ १७१ चौरस किलोमीटर भागात फिरते. तिला दहा महिन्यांचे दोन बछडे आहेत. पिल्लांच्या वाढीसाठी वाघिणीने गुरांना लक्ष्य केले. त्यापाठोपाठ तिने जानेवारी २०१६ मध्ये पहिला मनुष्यबळी घेतला तो शेतात काम करणाऱ्या महिलेचा. पण तो तिने खाण्यासाठी घेतला नाही. त्यानंतर ३ व ४ सप्टेंबर २०१६ ला मारलेल्या दोन माणसांना तिने थोडेफार खाल्ले आणि त्यानंतर ३० ऑक्‍टोबरला मारलेल्या माणसालाही. ऑगस्ट २०१८ पर्यंत तिने १३ बळी घेतले आहेत. साहजिकच ‘अवनी’ला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू झाले. जागरूकतेसाठी वन विभागाने निरनिराळ्या योजना राबवल्या. विविध उपायांमुळे वाघिणीने ऑगस्टपर्यंत एकही मनुष्यबळी घेतलेला नाही. मात्र, तिने ऑगस्टमध्ये सलग तीन माणसांना ठार केल्यावर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी ‘वाघिणीला बेशुद्ध करा अथवा ठार करा’ असा आदेश दिला. त्याला वन्यप्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. वन विभागाचे प्रयत्न आणि वाघिणीची मानसिक स्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने वन विभागाचा आदेश योग्य ठरवला. मग वन्यप्रेमी संघटनांनी ‘अवनी’ला वाचवण्यासाठी समाजमाध्यमांवर मोहीम उघडली.

 संघटनांची भूमिका विसंगत आहे. वन विभागाने ‘बेशुद्ध करा अथवा ठार करा’ असा स्पष्ट आदेश दिलेला असतानाही या संघटनांनी आपल्या मनाशी हे नक्की केले आहे, की वन विभाग वाघिणीला ठारच करणार. ज्या वन विभागाच्या अथक प्रयत्नांमुळेच वाघांची संख्या वाढली आहे, तोच वन विभाग वाघिणीला मारण्यास आसुसलेला कसा असू शकेल? वाघाच्या मेन्यू कार्डामध्ये ‘मानव’ प्राण्याचा समावेश नाही; पण ‘अवनी’चे माणसाबद्दलचे भय संपलेले आहे, हे खरेच. नुकताच संपलेला पावसाळा, वाढलेले गवत, पसरलेले जंगल, पसरलेला लॅंटाना आणि बछड्यांसोबत असणारी नरभक्षक वाघीण, त्यामुळे वन विभागाची मोहीम कठीण बनली आहे. हत्ती- कर्मचारी- जवान- अधिकारी असा जामानिमा असूनही मोहीम लांबण्याची हीच कारणे आहेत. निशाचर वाघिणीला शोधणे खूपच कठीण आहे. लोकांची समजूत काढणे हे वन विभागाचे काम आहे, असेही काही लोक म्हणतील; पण आपण या कामात ढवळाढवळ केली नाही, तर वन विभागाला त्यांचे काम करणे शक्‍य होईल, ही गोष्ट या संघटना सोयीस्कररीत्या विसरत आहेत.

वाघ वाचवण्यात आपण काहीच भाग घ्यायचा नाही काय? सरकारवर दबाव आणला तरच आपण उरलेसुरले वाघ वाचवू शकू. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७३ मध्ये सुरू केलेला ‘प्रोजेक्‍ट टायगर’ आणि ‘वन्यजीव संरक्षण कायदा’ यामुळे वाघांच्या शिकारीवर बंदी आली, परिणामी २००२ पर्यंत वाघांची संख्या ३६४२ पर्यंत पोचली, मात्र चोरट्या शिकारींमुळे ती पुन्हा घसरली.२०१५च्या गणनेनुसार देशात फक्त २२२६ वाघ आहेत. वाघ नरभक्षक झाला असेल तर सर्वप्रथम माणसाच्या सुरक्षेला प्राधान्य द्यायला हवे. त्यामुळे ‘अवनी’ला जिवंत पकडण्याचा प्रयत्न जरूर झाला पाहिजे. तथापि, ते प्रयत्न अपयशी ठरले तर नाइलाजाने अखेरचा उपाय योजावा लागेल. ‘अवनी’ जिवंत सापडली तरी ती आयुष्यभर पिंजऱ्यातच राहणार आहे, त्यामुळे आता यापुढे आणखी ‘अवनी’ निर्माण व्हायला नकोत. त्यादृष्टीने आत्ताच काही पावले उचलणे गरजेचे आहे.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चोरट्या शिकारीला आळा घालणे. व्याघ्र प्रकल्पांतील ‘स्पेशल टायगर प्रोटेक्‍शन फोर्स’बाबत आपण वन विभागाच्या पाठीशी खंबीरपणे राहायला हवे. संशयास्पद आढळले तर वन विभागाला त्याची माहिती देणे आणि तरीही वन विभागाने पावले उचलली नाहीत, तर दबाव आणणे गरजेचे आहे. व्याघ्र प्रकल्पातील गावांना जंगलाबाहेर हलवण्याच्या प्रयत्नांना यशही आले आहे. वाघांसाठी ही गोष्ट आवश्‍यक आहे. वाघ वाचवण्यासाठी त्यांचा नैसर्गिक अधिवास राखून ठेवणे, वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. हे फक्त सरकारचे- वनविभागाचे काम नव्हे. अधिवासाबरोबर कॉरिडॉर वाचवणेही आवश्‍यक आहे.

लोकांचे जंगलावरील अवलंबित्व कमी व्हावे यासाठीही प्रयत्न आवश्‍यक आहेत. जंगल हाच त्यांच्या उदरनिर्वाहाचा पर्याय आहे. जंगलात नेलेली गुरे वाघाने मारली तर लोक सूड म्हणून त्यांच्या मृतदेहावर विषप्रयोग करतात आणि असे विषारी मांस खाऊन वाघ मरतो. हे थांबण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम करता येईल. वन विभागानेही अशा गुरांच्या मृत्यूंचा योग्य मोबदला तत्काळ द्यायला हवा. ‘सरकारी काम आणि दहा महिने थांब’ वृत्तीने पीडितांचे मतपरिवर्तन होणार नाही. विविध प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी शेतीला विद्युत कुंपण लावले जाते, त्यामुळे वाघही मृत्यू पावतात. अशा कुंपणावर शासकीय बंदी आहे. सौर कुंपणाला मात्र परवानगी आहे. अशा योजना त्यांच्यापर्यंत पोचवणे आणि त्यांची माहिती करून देणे हेही करता येईल. एखादा मनुष्य बळी गेल्यावर काय परिणाम होतात, त्या ठिकाणची नक्की परिस्थिती काय असते, वनविभागाच्या लोकांना रोषाला कसं तोंड द्यावं लागतं, याचा विचार न करता आणि वस्तुस्थिती लक्षात न घेता घरी आपल्याच कोषात बसून ‘वाघिणीला वाचवा’ म्हणणं सोपं आहे. पण अशा समस्यांच्या मुळाशी जाऊन विचार केला नाही, तर अशा मोहिमा फोलच ठरतील. वाघ वाचवणे हे फक्त सरकार- वनविभागाचे काम नाही. जिप्सीत बसून जंगलात जाऊन वाघ बघणे, त्यांची छायाचित्रे व्हायरल करणे, यांमुळे वाघ वाचणार नाहीत. हा प्राणी नष्ट झाला तर समृद्ध संस्कृतीचा आत्माच हरवेल. वाघांना संरक्षण, अधिवास, पोषक वातावरण दिले, तर तो वाचवण्याचे काम निसर्गच करेल. क्षणभंगुर विकासाकरिता निसर्गाला ओरबाडत राहिलो, तर रोज अशा ‘अवनी’ तयार होतील आणि त्यांना ठार करण्यावाचून आपल्या हातात काहीच नसेल. असे झाले तर आपली पुढची पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com