esakal | या जगण्यावर... दर्शन माणसांतल्या देवाचे

बोलून बातमी शोधा

sakal
या जगण्यावर... दर्शन माणसांतल्या देवाचे
sakal_logo
By
डॉ. अनुराधा पंडितराव

खरंतर माझे बाबा नास्तिक कधीच नव्हतेच पण श्रद्धेचं स्तोमदेखील त्यांनी कधी माजवलं नाही. ‘देव जगात आहे की नाही’, यावर तर्कवितर्क करण्यापेक्षा त्यांनी आम्हा मुलांच्या मनावर बिंबवलं होतं, ‘सज्जन माणूस म्हणजे देव आणि दुर्जन माणूस म्हणजे दानव''. हे वाक्‍य मनात इतकं खोलवर रुजलं होतं, की रोजच्या जीवनातदेखील माणसातील देवाचं दर्शन घडू लागलं.

तसं पाहिलं तर माणसातील देवत्वाबद्दल खूप आधीपासूनच ऐकत आले होते. बाबांच्या लहानपणची गोष्ट. माझ्या बाबांचे वडील, बाबा लहान असतानाच आजीला सोडून निघून गेले होते. माझी स्वाभिमानी आजी, लोकांच्या टोमण्यांना कंटाळून, छोटं बाळ आणि कपड्यांचं गाठोडं घेऊन, खेडं सोडून पुण्यात आली. रस्त्यावर कापड विकायचा धंदा सुरू करून पोटाची खळगी भरू लागली. हळुहळू जम बसायला लागला, तसं तिनं एक छोटंसं दुकान विकत घेतलं. १९३५-३६ चा काळ तो. बाबा पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होते. दुपारी शाळा आणि सकाळ-संध्याकाळ दुकान सांभाळणं, अशी त्यांची दुहेरी कसरत चालली होती. एके दिवशी दुकानात खूप काम असल्यानं गृहपाठ झाला नाही. शाळेत शिक्षक खूप रागावले. झालं, बाबा हिरमुसले. त्यांनी निर्णय घेतला, "बस्स. आता शाळा सोडायचीच''. आजीला हे सांगताच, ती म्हणाली, "ठीक आहे, दुकान सांभाळायला आणखी मदत होईल मला''. तीन- चार दिवस झाले. बाबा शाळेत दिसेनात, म्हणून शिक्षकांनी इतर मुलांकडे चौकशी केली. बाबांनी शाळा सोडली हे कळताच ते हबकले. पत्ता शोधत ते आजीच्या दुकानापर्यंत पोहोचले. डोळ्यांत पाणी आणून आजीला म्हणाले, "बाई, तुमचा मुलगा खूप हुशार आहे. त्याची शाळा बंद करू नका. एक दिवस तो खूप मोठा होईल''. हेच माझे बाबा पुढे सगळ्या स्कॉलरशिप मिळवत मिळवत चीफ इंजिनियरच्या पदापर्यंत पोहोचले. योग्य वेळी शिक्षकाच्या रूपातील तो देव भेटला नसता तर? सारीच गणितं बदलली असती. आयुष्याला टर्निंग पॉइंट देणाऱ्या त्या देवमाणसाचं ऋण मला या जन्मी तरी नक्कीच फेडता येणार नाही.

हेही वाचा: विशेष संपादकीय: स्थगितीचा स्वल्पविराम

परदुःख कमी करण्याची, मदतीची आतून उर्मी असलेली देवमाणसं जागोजागी भेटत असतात. रस्त्यावर अपघात झाल्यावर बघ्याची भूमिका घेण्यापेक्षा, पोलिसांच्या प्रश्नांची भीती न ठेवता, जे तुम्हाला मदत करतात, ती खरी देवमाणसं! कितीही घाई असली तरी अपंग व्यक्तींना रस्ता ओलांडायला मदत करणं, परीक्षेला निघालेल्या विद्यार्थ्याची गाडी अचानक बिघडली तर आपलं काम बाजूला सारून त्याला वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचवणं, नैराश्‍याच्या गर्तेत अडकलेल्याला धीर देऊन समुपदेशन करणं, परदेशस्थित मुलांच्या आई-वडिलांची अधूनमधून चौकशी करून त्यांच्या नीरस जीवनात चैतन्य पेरणं... अशी एक ना अनेक कामं ही देवमाणसं करत असतात.

हेही वाचा: विशेष संपादकीय : अस्थैर्य संपविण्यासाठी स्वागतार्ह पाऊल 

परोपकार हा आपला धर्म समजणाऱ्या देवमाणसांचं लॉकडाउनमध्ये पुन्हा एकदा दर्शन घडलं. हातावर पोट असणाऱ्यांना शिधा पुरवणं, गावाकडून शहरात येऊन अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणं, कामवाल्या बायांना सुटी देऊनही त्यांना नियमित पगार देणं, भाडेकरूंकडून त्यांच्या विस्कळित झालेल्या व्यवसायामुळे भाड्यात सवलत देणं, शिवाय कोरोना रुग्णांवर स्वतःचा जीव धोक्‍यात घालून उपचार करणं...असा मदतीचा हात पुढे करणारी देवमाणसं तुमच्या आमच्यासारखी आहेत ना! हा माणसातला देव, कधी, कुठे अन्‌ कोणत्या रूपात आपल्या मदतीला धावून येईल, सांगता येत नाही. त्याला ओळखा, त्याचा आदर करा, त्याची जाणीव ठेवा. जमल्यास त्याचा छोटासा अंश आपल्यात शोषून घ्या. आपल्यातील देवत्वाची प्रचिती इतरांना येऊ द्या आणि ही देवत्वाची साखळी अशीच अव्याहतपणे चालू ठेवा. माणुसकीचा आणि संवेदनांचा झरा जिवंत ठेवण्यासाठी!