Sundayspecial: ऍमेझॉनची 'झळ' तुम्हालाही भोगावी लागणार!

Sundayspecial: ऍमेझॉनची 'झळ' तुम्हालाही भोगावी लागणार!

ऍमेझॉनच्या जंगलात लागलेला वणवा ही फक्त घटना नसून, मानवजातीच्या सुनिश्‍चित होणाऱ्या भविष्याचा आरसा आहे. ते नक्कीच भयावह आहे. जे जंगल पृथ्वीवरील एकूण ऑक्‍सिजनच्या 22 टक्के ऑक्‍सिजन निर्माण करते, ते विकासाच्या नावाखाली जाळणे ही बौद्धिक दिवाळखोरीच आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनी सुरवातीला पर्यावरणवादी संस्थांवर आगपाखड केली. शेवटी त्यांचे खरे हेतू कळल्यावर जागतिक स्तरावर त्यांची नाचक्की झाली. नाइलाजाने का होईना, त्यांना आग विझवण्यासाठी सैन्याला बोलवावे लागले. वणव्यामध्ये किती झाडं खाक झाली असतील, किती वन्यजीव मेले असतील आणि किती आदिवासींचे विस्थापन झाले असेल, याची गणतीच नाही. एकट्या ऍमेझॉनमध्ये भारतातील एकूण पक्ष्यांच्या जातींपेक्षा जास्त पक्षी आढळतात, यावरून तिथल्या जैविक विविधतेची कल्पना येते. अशा माथेफिरू विकासाची ओढ फक्त ब्राझीलच्या अध्यक्षांनाच नाही तर जवळ जवळ सर्व देशाच्या पुढाऱ्यांना आहे. दुर्दैवाने ते राष्ट्रीयत्वाचा मुखवटा लावून कार्य सिद्धीस नेत आहेत. पृथ्वीवरील मानवी अस्तित्व संपवण्याकडे नेणारे कोणतेही धोरण राष्ट्रप्रेमी कसे काय असू शकते, याचा विचार जनतेने केला पाहिजे.

दूरगामी परिणा होणार
ऍमेझॉनमधील वणव्याचे दूरगामी परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील, यात शंका नाही. पृथ्वीची यंत्रणा इतकी एकसंध आहे की, एका देशातील नैसर्गिक हानीचा परिणाम त्या देशापुरता मर्यादित राहूच शकत नाही. असे वणवे आपल्याकडेसुद्धा लागतात-लावले जातात. गवताळ रानं आणि पानगळीची जंगलं वणव्यांच्या सहज भक्ष्यस्थानी पडतात. बव्हंशी आगी जाणूनबुजून लावल्या जातात, शेतीचे क्षेत्र वाढवण्यासाठी किंवा औद्योगिक प्रकल्पाकरिता वनजमीन लाटण्यासाठी. असे वणवे त्या-त्या ठिकाणची जैविक विविधता झपाट्याने नष्ट करताहेत. ते थांबवण्यासाठी वनविभागसुद्धा अद्ययावत नाही. हे वणवे जंगलच नष्ट करत नाही तर दोन जंगलांमधील दुवा असलेले हरित पट्टेही खाक करतात. सह्याद्रीतील जंगलं आधीच विखुरलीत. यात पुन्हा गावं आणि लोकांचा जंगलातील वाढता वावर यामुळे वन्यजीवांना जगणे अशक्‍य होते. वणव्यांमुळे शिल्लक जंगलांची बेटं होतात. वन्य प्राणांच्या वावरण्यावर बंधनं येतात. यातून अशा बेटांसारख्या तुकड्यात अडकून राहिलेल्या वन्यजीवांचे अंतःप्रजनन होऊन एकेक करून त्या जाती नष्ट होत जातील. निरनिराळ्या खनिज उत्खननासाठी, असे वणवे लावले जातात. जोपर्यंत ती खनिजं खरवडून संपवली जात नाहीत तोपर्यंत हे तांडव चालूच राहील, असे दिसते.

जंगलं विकासाच्या नावाखाली पेटवली जातात
एकीकडे ग्रेटा थुनबर्ग नावाचे वादळ नव्या पिढीला सोबत घेऊन हवामानबदलाच्या परिणामांचे पाढे जगभर वाचत आहे आणि दुसरीकडे याच हवामान बदलाचा परिणाम कमी करू शकणारी जंगलं विकासाच्या नावाखाली पेटवली जाताहेत. अशा पद्धतीने जंगलं संपवताना आणि राक्षसी प्रकल्पांद्वारे पर्यावरणात विष सोडताना आपण आगामी पिढीच्या जगण्याची शक्‍यता कमी करत आहोत, याचे राज्यकर्त्यांना अजिबात भान नाही हा मोठा दैवदुर्विलास.

(लेख वन्यजीव संशोधक आणि जीवितनदीचे संचालक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com