esakal | Sundayspecial : कसं आहे ब्राझीलमधील ऍमेझॉनचं जंगल?
sakal

बोलून बातमी शोधा

Sundayspecial : कसं आहे ब्राझीलमधील ऍमेझॉनचं जंगल?

खनिज तेल आणि खाणींसाठी जंगलाला ओरबाडणे, औद्योगिक स्तरावरील व्यापक पशुपालन, शेतीचा झपाट्याने विस्तार आणि चिंताजनकरीत्या वाढणाऱ्या आगींनी पृथ्वीतलावरील ही विविधतासंपन्न आणि विस्तीर्ण जंगलसंपदा धोक्‍यात आली आहे.

Sundayspecial : कसं आहे ब्राझीलमधील ऍमेझॉनचं जंगल?

sakal_logo
By
आशिष कोठारी

ऍमेझॉनच्या जंगलाची सफर करण्यासाठी आमच्या विमानाने जंगलातील नाकू कॅंपकडे कूच केली, तेव्हा खाली पसरलेले विस्तीर्ण डोंगराळ हिरवाई नजरेत भरत होती. सुमारे अर्धा तास आम्ही अत्यंत घनदाट अशा जंगलावरून जात होतो तेव्हा हिरव्याजर्द दुलईतून बाहेर डोकावणारे उंच घनदाट, निबिड जंगलातून डोकावणारी झाडं गवसणी घालायला झेपावताना दिसत होती. खरोखर पहिल्यांदाच ऍमेझॉनचे अविश्‍वसनीय जंगल मला कौतुकाचं वाटत होतं.

खनिज तेल आणि विविध प्रकारच्या खाणींचा वाढता शिरकाव रोखण्यासाठी ऍमेझॉनमधील पेरूमधील मूलवासींच्या विरोधाला सहकार्य करण्यासाठी कार्यरत गटाने मला इक्वेडरला आमंत्रित केले होते. लाचमाकोचा खेड्यात आम्ही उतरलो आणि तेथून व्हलवायच्या छोट्या होडग्यातून स्थानिक, मूलवासी सापारा जमातीच्या लोकांनी तळ टाकलेल्या तंबूत विसावलो. तिथं वैविध्यपूर्ण जगण्याचा अनोखा अनुभव प्रत्ययाला आला. पृथ्वीतलावरील वनसंपदेची विपुलता, वैविध्यता प्रत्ययाला आली. छोट्याशा लिकेन, बुरशीपासून ते झाडासारख्या दिसणाऱ्या उंच नेच्यांपर्यंत आणि आपल्यापेक्षा सुमारे 70-80 मीटरच्या वर सहज विस्तारलेल्या झाडांपर्यंत सर्व एकाच ठिकाणी नजरेला पडत होतं. नंतरचे चार दिवस मी सूर्य उगवल्यापासून चकीत करणारे कीटक, पक्षी यांची विविध रूपं आणि जीवनचक्र पाहात होतो. (यातील उर्वरित बहुतांश वेळ वातावरण ढगाळ होतं, मधूनच पावासाच्या सरी कोसळायच्या, खऱ्या अर्थानं वर्षाच्छादित जंगल वाटायचं). जिकडं पाहावं तिकडं वैविध्यपूर्ण फुलपाखरं, गवती किडे, टोळ, भुंगेच नजरेला पडायचे. एवढंच नव्हे त्यांचे आकार, रंग एकापेक्षा एक सरस आणि चित्ताकर्षक वाटायचे. डोक्‍यावर गंमतीशीर दिसणारे, विनोदी वाटणाऱ्या टुकाना पक्ष्यांसह असंख्य कर्कश्‍य आवाज करणारे पक्षी आसमंत दणाणून सोडायचे, गात असायचे. काही वेळा विविध आवाज कानी पडायचे, पण तो कोठून येतोहेत तेच समजायचं नाही. काही फुलांवर मोठ्या मधमाशीच्या आकाराचे हमिंगबर्ड नजरेला पडायचे अन्‌ बेपत्ता व्हायचे.

इथल्या मूलवासी लोकांचं पारंपरिक ज्ञानही खूपच चांगलं वाटलं. स्थानिक भगताला (आपल्याकडच्या भगतासारखंच इथला भगत बऱ्यावाईट शक्तींबरोबर संवाद साधू शकतो, असा समज आहे) भेटलो. तो आम्हाला जंगलात घेऊन गेला, तिथल्या विविध प्रजातींचे उपयोग सांगितले. इथल्या यच्चयावत प्रत्येकामध्ये जीवन सामावलंय, ते चैतन्यानं भारलेलं आहे, असं तो सातत्यानं सांगत होता. तो इथल्या जंगलाशी असलेलं नातं सांगत होता, हेच इथल्या जगण्याचा गाभा आहे, ही भावना तो सातत्याने बिंबवत होता. आपले मुख्य प्रवाहातले अर्थतज्ज्ञ, राजकारणी जंगलातील लाकूडफाटा, औषधे, कार्बन आणि त्याचं अर्थकारण बिंबवतात त्याच्याशी विरोधाभासी वाटावे, असं तत्वज्ञान तो सांगत होता.

खनिज तेल आणि खाणींसाठी जंगलाला ओरबाडणे, औद्योगिक स्तरावरील व्यापक पशुपालन, शेतीचा झपाट्याने विस्तार आणि चिंताजनकरीत्या वाढणाऱ्या आगींनी पृथ्वीतलावरील ही विविधतासंपन्न आणि विस्तीर्ण जंगलसंपदा धोक्‍यात आली आहे. एवढेच नव्हे तर जी भूसंपदा मूलवासींसाठी आणि वन्यजिवांसाठी राखून ठेवलेली आहे, तीदेखील सरकार खनिज तेल आणि खाणींच्या उत्खननासाठी देत आहे. त्याला स्थानिक सापारा आणि इतर जमाती विरोध करत आहेत. वनसंपदेचे नवे पर्याय शोधत, वनसंपदेच्या सहवासात सन्मानजनक जीवन जगता येते, असं ते सांगत आहेत. त्यांच्याकडून आपण शिकले पाहिजे, त्यांना पाठिंबासुद्धा दिला पाहिजे. ऍमेझॉनपासून खूप दूरवरील भारतातील पर्यावरणाचे प्रश्न आणि जंगलाच्या वाळवंटीकरणाला आपली कृती सहाय्यभूत ठरत आहे, त्यामुळे तिचा फेरविचारही केला पाहिजे.

(लेखक भारतातील प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत.)

loading image
go to top