भाष्य : स्मरण पानिपतावरील पराक्रमाचे

डॉ. वसंतराव मोरे
Thursday, 14 January 2021

पानिपतच्या लढाईला २६० वर्षे पूर्ण झाली, हा इतिहास प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जागा आहे. मात्र इतिहासातून काही ना काही शिकायचे असते. देशाच्या रक्षणासाठी मराठ्यांनी पानिपतच्या रणसंग्रामात प्राणांची आहुती दिली.

पानिपतच्या संग्रामास यंदा (१४ जानेवारी) २६० वर्षे पूर्ण होत आहेत. इतिहासातून शिकण्याची दृष्टी ठेवली तर या घटनेच्या अभ्यासातून कितीतरी गोष्टींचा बोध घेता येतो. त्यासाठी रणांगणावर झालेल्या पराभवाची  परखड चिकित्सा व्हावी, त्याचबरोबर मराठी सैन्याच्या पराक्रमाची नोंदही घेतली पाहिजे.

पानिपतच्या लढाईला २६० वर्षे पूर्ण झाली, हा इतिहास प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जागा आहे. मात्र इतिहासातून काही ना काही शिकायचे असते. देशाच्या रक्षणासाठी मराठ्यांनी पानिपतच्या रणसंग्रामात प्राणांची आहुती दिली. यातून बोध घेत आजच्या तरुणाईने राष्ट्रप्रेम मनामध्ये रुजवावे. देशाच्या रक्षणासाठी प्रसंगी परकी सत्तांसोबत दोन हात करण्याची आणि जिवाची बाजी लावण्याची तयारी नेहमी ठेवलीच पाहिजे. मात्र त्यासाठी कल्पनारम्य किंवा मनोरंजनात्मक अंगाने इतिहासाचे लेखन करणे हिताचे नाही. उलट हा पराभव का झाला, याचीही कठोर मीमांसा व्हायला हवी.

छत्रपती शिवाजी महाराजांनी युग परिवर्तन केले. ‘तंजावर ते पेशावर अवघा मुलूख आमचा,’ हा त्यांचा विचार महत्त्वपूर्ण आहे. ते भारतीय राष्ट्रवादाचे जनक आहेत. अठरापगड जाती समूहांना एकत्र करून त्यांनी स्वराज्याची घडी उत्तम पद्धतीने बसवली. छत्रपती शाहू महाराज यांचा मृत्यू १७४९ला झाल्यानंतर मराठी सत्तेची सूत्रे पेशव्यांकडे आली. पेशवे बाजीराव यांनी उत्तरेत दबदबा निर्माण केला होता. मात्र, पानिपतच्या युद्धाच्या वेळी पेशव्यांची रणनीती यशस्वी ठरली नाही. त्यांच्या घरातील भांडणे हे पराभवाचे एक कारण आहे. आनंदीबाईंनी ‘ध’ चा ‘मा’ कसा केला, हे सर्वश्रुत आहे. या बरोबरच पेशवाईमध्ये जबरदस्तीने कर वसूल होत असल्यामुळे जनतेमध्येही नाराजी होती. या उलट छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण मोहिमेमुळे जनतेला आधार दिला होता. त्यामुळेच पाळेगार नाईक यांनी पुढील काळात राजाराम महाराजांना मदत केली. पेशव्यांच्या कारभारात शिवाजी महाराजांप्रमाणे दृष्टी नव्हती. सरदार शिंदे, होळकर, पवार, गायकवाड यांनी आपली स्वतंत्र राज्ये निर्माण केली. पेशवाई एक संघराज्य झाले असले तरी केंद्रीय सत्ता कमजोर झाल्यामुळे राजसत्तेवरील अविश्वास वाढत गेला. पानिपतच्या युद्धाचा खलनायक नजीब खान याला जिवंत ठेवावे, असे होळकरांचे शिंदेंना पत्र होते. त्यामध्ये ‘आपल्या अस्तित्वासाठी नजिबास जिवंत ठेवावे. हे न करता तुम्ही नजीबास माराल तर तुम्हास पेशवे धोत्रे बडवावयास लावतील,’ असे म्हटले होते. तत्कालिन परिस्थितीवर प्रकाश टाकणारे हे पत्र आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पानिपतच्या तिसऱ्या लढाईची पार्श्‍वभूमी समजून घेताना अहमदशहा अब्दालीबाबत माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तो १७३९ला नादिरशहाबरोबर भारताची लूट करण्यासाठी भारतात आला. त्याने मयूर सिंहासन व कोहिनूरची लूट केली. नादिरशहाच्या मृत्यूनंतर त्याने अफगाणिस्तान राष्ट्र निर्माण केले. १७६१मध्ये तो भारतावर चाल करून आला, ही त्याची भारतावरील पाचवी स्वारी होती. (अफगाण म्हणजे महाभारतामधील गांधारीचा गांधार देश. शकुनीमामा गांधारचा राजा होता.) अब्दालीने पानिपतचे युद्ध जिंकले. मात्र, या युद्धाचे पुरेसे संशोधन न झाल्याने मराठी भाषेमध्ये काही वाक्‍प्रचार अस्तित्वात आले. ‘पानिपत होणे’ म्हणजे ‘सर्वनाश होणे’, असा अर्थ रूढ झाला. जो साफ चुकीचा आहे. ‘विश्वास’ पानिपतवर गेला हे ‘सैन्यातील अविश्वासा’चे, तर ‘पाचावर धारण बसणे’ म्हणजे ‘महागाई होणे, घाबरणे’ असे अर्थ प्रचलित झाले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या युद्धामध्ये अब्दालीचेही प्रचंड नुकसान झाले. पानिपतच्या युद्धानंतर खैबर व बोलन खिंडीतून होणारी आक्रमणे कायमची बंद झाली, हे लक्षात घ्यायला हवे. पानिपतच्या पराभवाची कारणमीमांसा करताना काही ठळक मुद्दे लक्षात घेणे आवश्‍यक आहे. पेशव्यांची घरगुती भांडणे. सदाशिवराव भाऊ उत्तम कारभारी होते; पण अनुभवी सेनापती नव्हते. लूट करून मोहीम चालवणे चुकीचे होते. बायका, मुले, यात्रेकरू यांना सोबत घेणे चुकीचे होते. कुंजपुरा जिंकल्यानंतर दिल्लीस परत न येता कुरुक्षेत्रास जाणे चुकीचे ठरले.

पानिपत म्हणजे सर्वनाश नव्हे 
 रणभूमी अब्दालीने निवडली होती,  हाही मुद्दा महत्त्वाचा. त्याने मराठ्यांची रसद, पाणी, टपाल बंद केले. गनिमी काव्याची लढाई न करता तेथे गोलाटी लढाई झाली. ज्याचा अनुभव पेशव्यांच्या सैनिकांकडे नव्हता. पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे पानिपत म्हणजे सर्वनाश नव्हे. या रणभूमीवर मराठ्यांनी जो पराक्रम केला, जे शौर्य दाखवले, त्याची नोंद घ्यायला हवी. १७७८ ते १८०३ दरम्यान दिल्लीच्या लाल किल्ल्यावर मराठ्यांचा भगवा फडकत होता. पानिपतच्या युद्धात मराठ्यांच्या एका तुकडीला जंगलात आश्रय मिळाला त्यामुळे ते वाचले. रोड समाज म्हणून ते अडीचशे वर्षे जगले. आता त्यांना ‘मराठा’ म्हणून ओळख मिळाली आहे. त्यांचे आता चांगल्या पद्धतीने संघटन झालेले आहे. प्रतिवर्षी १४ जानेवारी रोजी पानिपत येथे ते सर्व एकत्र येतात. आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा अभिमान आठवून त्यांना आदरांजली वाहतात. या कार्यक्रमाचे भव्यपणे आयोजन केले जाते. पराभवाचा नव्हे तर शौर्याचा दिवस म्हणून ते साजरा करतात. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पानिपत येथे होणारा कार्यक्रम हा साध्या पद्धतीने होणार आहे.

मराठ्यांचे शौर्यतीर्थ
पानिपत हे मराठ्यांचे शौर्यतीर्थ आहे. पानिपत येथील रणसंग्राम आणि तेथील पराक्रम हे राष्ट्रप्रेमाचे आंतरराष्ट्रीय प्रतीक आहे. त्या अनुषंगानेच तेथे शौर्य स्मारक बांधायचे आहे. कुरुक्षेत्रावर कौरव-पांडवांचे युद्ध झाले. श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्वगीता कुरुक्षेत्रावरच सांगितली. याच कुरुक्षेत्राजवळ पानिपतची रणभूमी आहे. या रणभूमीजवळूनच यमुना नदी वाहते. शौर्य स्मारक बांधताना यमुनेच्या कालव्याद्वारे सरोवर तयार केले जाणार आहे. या सरोवराच्या मध्यभागी मंदिर बांधण्यात येणार आहे. तेथे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई व छत्रपती शाहू महाराज, तर सरोवराच्या दुसऱ्या बाजूला पृथ्वीराज चौहान, राणा प्रताप, लासित बरफुकन यांचे पुतळे बसवण्यात येणार आहेत. तेथे अत्याधुनिक सैनिक स्कूल चालवण्यात येणार आहे, ग्रंथालयाची उभारणी केली जाणार आहे. युद्धशास्त्राच्या ग्रंथांचे संकलन वस्तुसंग्रहालय साकारण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कुरुक्षेत्रावर ज्याप्रमाणे महाभारताच्या युद्धाचे चित्रण केले आहे. तसे मालोजीराजे, शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराराणी, शाहू महाराज, पहिले बाजीराव, राघोबादादा, नानासाहेब, माधवराव पेशवे, सदाशिवराव भाऊ, दत्ताजी  शिंदे, महादजी शिंदे, लाडोजीराव शितोळे, मल्हारराव होळकर, यशवंतराव पवार, इब्राहिमखान, संताजी वाघ, समशेरबहाद्दर या वीरांच्या शौर्याचे व देशभक्तीचे चित्रण करण्यात येणार आहे. दृकश्राव्य माध्यमातून वीरांची शौर्याला सलाम करतानाच प्रेरणादायी स्मारक उभारण्याचा उद्देश आहे.

शब्दांकन : संदीप खांडेकर

(लेखक शिवचरित्रकार आणि इतिहासाचे अभ्यासक आहेत.) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about battle of Panipat

Tags
टॉपिकस
Topic Tags: