भाष्य : पडद्यासमोरचा निद्रानाशी ठिय्या

Bizz Waching
Bizz Waching

तारवटलेले डोळे, जांभया नि सुस्त हालचाली अशा स्थितीतली विशी-पंचविशीची मुले आजकाल आजूबाजूला दिसू लागली आहेत. हा वाढत्या जागरणाचा परिणाम, हे तर स्पष्टच आहे; पण या त्यामागचे एक नवे कारण कदाचित अनेकांना माहिती नसेल. ते आहे 'बिंज वॉचिंग'. सोप्या मराठीत सांगायचे तर ठिय्या देऊन किंवा ठाण मांडून तासन्‌ तास बघssत बसणे. हे बघणे म्हणजे अर्थातच टीव्ही, लॅपटॉप किंवा मोबाइल अशा कुठल्या तरी पडद्यावर कार्यक्रम बघत बसणे.

आता त्यात नवीन ते काय, असे वाटू शकते. कारण रात्री उशिरापर्यंत टीव्हीसमोर ठाण मांडून येतील ते कार्यक्रम बघणारे अनेक आजी- आजोबाही दिसतात. अगदी मिनिटभरासाठी देखील लॅपटॉप किंवा स्मार्टफोन नजरेपासून दूर जाऊ न देणारे बरेच आई-बाबाही आपल्याला माहीत आहेत. अनेकदा तर आपणही त्यांच्यातच मोडतो. मग हे देखील 'बिंज वॉचिंग' नाही का, असा प्रश्न पडू शकतो. इतकंच कशाला, 'दोनेकशे पानांचे अख्खे पुस्तक एका बैठकीत वाचून संपविणे' किंवा 'जत्रेतल्या टुरिंग टॉकिजमध्ये एका पाठोपाठ तीन सिनेमे पाहणे' हादेखील बिंजचाच प्रकार नव्हे का, असेही वाटू शकते. 

त्यात तत्त्वतः काही चूक नाही. एखादी कृती बराच वेळ आणि सलगपणे करणे या अर्थाने ते बरोबर आहे. पण गेल्या सहा-सात वर्षांत लोकप्रिय होत गेलेल्या 'बिंज वॉचिंग' या कृतीला अधिक नेमका अर्थ आहे. भरपूर वेळ ठिय्या मारून कार्यक्रम पहाणे, हे तर त्यात आहेच. पण तेवढेच नाही. स्वेच्छेने केलेली कार्यक्रमाची आणि वेळेची निवड हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य. आणि क्रमशः पद्धतीने अर्थात मालिका पद्धतीने येणारे कार्यक्रम (शक्‍यतो) विनाथांबा एका बैठकीत पाहून संपविणे ही त्याची पूर्वअट. म्हणूनच तासन्‌ तास नुसते टीव्ही पाहणे किंवा यू-ट्यूब व्हिडिओवरून घरंगळत राहणे, हे या नव्या संकल्पनेत फारसे बसत नाही. कारण टीव्हीवरील कार्यक्रमाच्या वेळा वाहिन्यांनी ठरविलेल्या असतात आणि 'यू-ट्यूब'वर आपण क्वचितच एकाच मालिकेतील सगळे एपिसोड सलग पाहून संपवितो.

थोडक्‍यात, म्हणजे एका मालिकेचे (शक्‍यतो) सर्व भाग आपल्या वेळेनुसार आणि आपल्या निवडीच्या पडद्यावर एका बैठकीत पाहून संपविणारा प्रेक्षक म्हणजे हा 'ठिय्या प्रेक्षक'. अर्थात 'बिंज व्ह्यूअर'. टीव्हीच्या व्यवस्थेत अशा अर्थाचा प्रेक्षक पूर्वी शक्‍य नव्हता. पण टीव्हीच्या प्रसारण (ब्रॉडकास्ट) व्यवस्थेला टाळून, इंटरनेटद्वारे हव्या त्या पडद्यावर एखादा कार्यक्रम थेट प्रवाहासारखी पोचविणारी 'ओटीटी' अर्थात 'ओव्हर दी टॉप' नावाची एक नवी व्यवस्था गेल्या सात-आठ वर्षांमध्ये वेगाने लोकप्रिय झाली आहे. 

नेटफ्लिक्‍स, अमेझॉन प्राइम, झी, हॉटस्टार, व्हूट, अल्टबालाजी या भारतात लोकप्रिय असलेल्या काही ओटीटी कंपन्या. त्यातल्या काहींचा जन्म टीव्ही कंपन्यांच्या पोटी झाला आहे, तर काही केवळ 'ओटीटी' म्हणून अस्तित्वात आहेत. यातल्या बहुतेकांकडे टीव्हीवर पूर्वी प्रसारित झालेले कार्यक्रम जसे पाहायला उपलब्ध असतात, तसे या कंपन्यांनी स्वतंत्रपणे निर्माण केलेले कार्यक्रमही असतात आणि हे स्वतंत्रपणे केलेले कार्यक्रम बहुधा मालिका स्वरूपात असतात आणि ठिय्या प्रेक्षकांना आकर्षित करून घेण्याच्या उद्देशाने बनविलेले असतात. नेटफ्लिक्‍सवरील सेक्रेड गेम्स किंवा नार्कोस किंवा अमेझॉन प्राइमवरील 'हॅंड ऑफ गॉड' यांसारखे कार्यक्रम खूप गाजले. आधी त्यांची हवा करण्यात आली. मग आपल्या गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडची वाट पाहावी तशी या तरुण मंडळींनी त्याची वाट पाहिली आणि मग एकदा ते उपलब्ध झाले की रात्र रात्र जागून वट्ट एका बैठकीत पाहून ते संपवून टाकले. मग त्यांच्यावर सोशल मीडियावर चर्चा आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडला. 

'आयएमडीबी'सारख्या महाकाय वेबसाइटसवर त्यांचे रेटिंग होत गेले. अशा वातावरणातून नवे ठिय्या प्रेक्षक मिळत गेले आणि त्यांचे आता नवे कार्यक्रम किंवा जुन्यांचे नवे सीझन कधी येत आहेत, याची वाट पाहणं सुरू आहे. एका अर्थाने गेल्या केवळ सहा सात वर्षांमध्येच 'ओटीटी' कार्यक्रमांची एक इकोसिस्टीम किंवा एक "जितजागतं' भवताल तयार झालंय. तासन्‌ तास ठिय्या मारून मालिका संपेपर्यंत पाहणारे प्रेक्षक हा या भवतालामधील एक महत्त्वाचा घटक. त्यात रात्ररात्र जागविणारे जसे आहेत, तसे कामधाम बाजूला ठेवून दिवसाउजेडी घरीदारी किंवा लांबच्या प्रवासात पडद्यावर डोळे खिळवून बसणारेही आहेत. 

'बिंज वॉचिंग' हा त्या अर्थाने एक वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक बदल आहे. टीव्हीच्या तुलनेत इथे प्रेक्षकांना वेळ आणि कार्यक्रम यावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळते. लाखो प्रेक्षकांना एकाच वेळी एका कार्यक्रमामध्ये खेचून आणण्याचे टीव्ही या माध्यमाचे जे मूलभूत सामर्थ्य होते, त्याला या बदलाने आव्हान दिले आहे. 'गेम ऑफ थ्रोन'सारख्या मालिकेचा किंवा 'केबीसी' वा 'सारेगामा'सारख्या कार्यक्रमाचा एखादा भाग लाखो लोकांनी टीव्ही वाहिनीवर एकाच वेळी पाहण्याचे दिवस आता कमी होत जाणार. एका अर्थाने समूहाने एकत्रितपणे आणि जिवंतपणे काही दृक्‌श्राव्य अनुभव घेण्याचे, त्यावर चर्चा करण्याचे, पुढच्या भागासाठी आसुसलेले असण्याचे प्रसंगही कमी होत जाणार. टीव्हीमुळे मिळणारा बघण्याचा सामाजिक आणि एकत्रित अनुभव आता अधिकाधिक वैयक्तिक आणि शतखंडित होत जाणार.

थोडं गमतीने सांगायचे तर 'बिंज वॉचिंग' दीक्षित डाएटसारखे आहे. जो काही कार्यक्रम पाहायचा तो एका बैठकीत संपवायचा. मग भले वेळ लागला तरी चालेल. तर टीव्हीवरच्या मालिका या दिवेकर डाएटसारख्या असतात. दीर्घकाळ पण तुकड्या तुकड्यात आणि थांबून थांबून पाहायच्या. बिंज वॉचिंग हा उत्कट, भावनाप्रधान आणि बऱ्याच मानसिक-शारिरिक गुंतवणुकीची मागणी करणारा वैयक्तिक अनुभव आहे, तर नेहमीचा टीव्ही हा शांत, दैनंदिन उपचारासारखा, मानसिक-भावनिक उसंत देणारा कौटुंबिक- सामाजिक अनुभव आहे. ठिय्या देऊन पाहण्यामध्ये अधीरतेला उत्तेजन आहे, तर टीव्ही पाहण्यामध्ये प्रतीक्षेचे आवाहन आहे. 

पण 'बिंज वॉचिंग'चे आणि 'ओटीटी ' माध्यमांचे सर्वांत मोठे आव्हान आहे मनोकायिक आहे. त्याचा जसा आपल्या पाहण्याच्या संस्कृतीशी संबंध आहे तसाच संबंध आपल्या मानसिकतेशी आणि शारीरिकतेशी आहे. बिंज वॉचिंग प्रेक्षकांकडून खूप अपेक्षा करते. त्याने त्या पूर्ण कराव्या म्हणून अनेक प्रलोभने ठेवते. प्रेक्षकाने किमान चार पाच तास सलग बाजूला काढावे, निवडलेल्या कार्यक्रमाव्यतिरिक्त इतरत्र लक्ष विचलित होऊ देऊ नये वगैरे अपेक्षा वाटतात तितक्‍या सोप्या नाहीत. 'ठिय्या प्रेक्षकां'ना त्यासाठी दैनंदिन आयुष्यात बऱ्याच तडजोडी कराव्या लागतात. त्या जशा अभ्यासात, कामात, सामाजिक संवादामध्ये कराव्या लागतात, तशाच झोपेमध्येही कराव्या लागतात.

'नेटफ्लिक्‍स'चा संस्थापक रीड हेस्टिंग्सचे विधान तर प्रसिद्धच आहे- 'नेटफ्लिक्‍सचा सर्वांत मोठा स्पर्धक अमेझॉन किंवा यू-ट्यूब नव्हे तर माणसाची झोपेची गरज हा आहे. आमची स्पर्धा झोपेशी आहे. कारण झोप म्हणजे खूप मोठा मोकळा वेळ. आम्ही झोपेसारख्या बलाढ्य स्पर्धकाशी लढतोय.' आमची खरी स्पर्धा इतर पेयांशी नाही तर पाण्याशी आहे, असे शीतपेय कंपन्या म्हणतात त्यासारखेच हे आहे.' एका अर्थाने "बिंज वॉचिंग' किंवा 'बघत राहू दे पडद्याकडे' हा एकूणच वाढत चाललेल्या 'निद्रा ऱ्हासाच्या संस्कृती'चा एक नवा आणि बऱ्यापैकी गंभीर आविष्कार आहे. आपल्या आजूबाजूला अलीकडे दिसू लागलेली तारवटलेल्या डोळ्यांची, जांभया देणारी, सुस्त हालचालींची मंडळी कदाचित या संस्कृतीचे 'पाईक' असू शकतील. या कार्यक्रमांसाठी 'जागते रहो' करण्यापेक्षा त्यांच्या या मनोकायिक परिणामांविषयी 'जागते रहो' असण्याची आता जास्त गरज आहे.  
 

(लेखक माध्यम, तंत्रज्ञान व संस्कृती या विषयाचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com