मधुमेहाचा बदलता ‘पाठ्यक्रम’

मधुमेहाचा बदलता ‘पाठ्यक्रम’

एकीकडे इतिहासाच्या अभ्यासातून आपण शिकतो; तर दुसरीकडे इतिहासाच्या ओझ्यामुळे प्रगतीच्या मार्गात अडथळेही निर्माण करतो. ही गोष्ट विज्ञानाच्या प्रगतीलाही लागू आहे. नव्या संशोधनामुळे मधुमेह उपचारांचे स्वरूप बदलण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

माणसाच्या प्रगतीत इतिहास हे एक मोठे संसाधन आहे, पण त्याचबरोबर मोठे ओझेही. एकीकडे इतिहासाच्या अभ्यासातून आपण शिकतो, तर दुसरीकडे इतिहासाच्या ओझ्यामुळे प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण करतो. ही गोष्ट विज्ञानाच्या प्रगतीलाही लागू आहे. मधुमेहात साखर वाढते हे सर्वांत आधी माहिती झाले. त्यानंतर १८५५मध्ये क्‍लॉड बर्नार्ड यांनी दाखवले, की मेंदूच्या विशिष्ट भागाला इजा झाली तर साखरेवरचे नियंत्रण जाते. मग सुमारे शंभर वर्षांपूर्वी इन्सुलिनचा शोध लागला. त्या वेळी टाईप-१ हा मधुमेहाचा मुख्य प्रकार माहीत होता. त्यावर इन्सुलिनचा उपाय इतका प्रभावी ठरला की साखर नियंत्रणात मेंदूबिंदू असेही काही महत्त्वाचे असते हे सगळे विसरूनच गेले. त्यानंतर अनेक दशकांनी टाईप-१आणि २ या मधुमेहांमधला फरक स्पष्ट झाला. टाईप-२ मध्येदेखील इन्सुलिनची कमतरता नसते, उलट सुरुवातीच्या काळात तर इन्सुलिन नेहमीपेक्षा जास्तीच असते, हे स्पष्ट झाले. तोपर्यंत ग्लुकोजचे नियंत्रण फक्त इन्सुलिनमुळेच होते आणि इन्सुलिनचे मुख्य कार्य ग्लुकोजचे नियंत्रण असे समीकरण इतके पक्के झाले, की इन्सुलिन वाढलेले असूनही  ग्लुकोज कमी होत नाही, अशा अवस्थेला ‘इन्सुलिन विरोध’ असे नांव देण्यात आले.

सराफी व्यावसायिकाचा पिस्तुलातुन गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

याही गोष्टीला आता पन्नास-साठ वर्ष होऊन गेली. या काळात संशोधन खूपच पुढे गेले आहे. इन्सुलिन हे एक प्रथिनांचे मोठे कुटुंब आहे आणि कृमींपासून माणसापर्यंतच्या उत्क्रांतीत त्यांनी खूप मोठी भूमिका बजावली आहे. त्यात एका पेशीपासून संपूर्ण प्राण्याची घडण, निरनिराळ्या अवयवांची घडण, मूळपेशी (stem cells) चे व्यवस्थापन, मेंदूमध्ये स्मरणशक्ती आणि विचारशक्तीचे व्यवस्थापन, प्रजननक्षमता, आयुर्मान, स्वभावातली आक्रमकता किंवा मवाळपणा, स्नायूंची शक्ती आणि ऊर्जा व्यवस्थापन यांचा समन्वय करणाऱ्या यंत्रणांमध्ये इन्सुलिनची महत्त्वाची भूमिका असते. इन्सुलिनला माणसाच्या शरीरात आणि मेंदूतही अनेक प्रकारची कार्ये आहेत. ऊर्जा व्यवस्थापन हे या अनेक कार्यांपैकी एक आणि या कार्याचा एक भाग म्हणजे ग्लुकोजचे व्यवस्थापन. हा इन्सुलिनच्या एकूण कामाचा एक छोटासा हिस्सा आहे. पण इन्सुलिनचा शोध मधुमेहाच्या संदर्भात प्रथम लागल्यामुळे इन्सुलिन म्हणजे ग्लुकोज आणि ग्लुकोज म्हणजे इन्सुलिन असे इतिहासाचे ओझे आपल्या मनावर आहे. प्रत्यक्षात ग्लुकोज नियंत्रणात इन्सुलिनखेरीज इतर अनेक यंत्रणा कार्यरत आहेत आणि इन्सुलिनलाही इतर अनेक कामे आहेत. त्यामुळे इन्सुलिनखेरीज इतर कारणांमुळे ग्लुकोजची आणि ग्लुकोजखेरीज इतर कारणांमुळे इन्सुलिनची पातळी बदलू शकते. पण मधुमेहाच्या संदर्भात या शक्‍यतांचा कधी विचारच केला जात नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या पार्श्वभूमीवर टाईप-२ मधुमेहाबद्दलच्या पाठ्यपुस्तकी समजुती परत तपासून पाहण्याचे काम सुरु झाले आहे. इन्सुलिनचा स्नायू किंवा इतर पेशींवर परिणाम कसा होतो, तर पेशींच्या पृष्ठभागावर एकनाथ सोळकरसारखे इन्सुलिनचा अचूक झेल घेणारे रेणू बसलेले असतात. हे ‘सोळकर रेणू’ नसतील, तर पेशीवर इन्सुलिनचा परिणाम होऊ शकत नाही. सुमारे वीस वर्षांपूर्वी प्रयोग म्हणून उंदरांमधल्या स्नायूपेशींवरचे ‘सोळकर’ काढून घेतले. आता इन्सुलिनविरोधाची पुढची लक्षणे दिसतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात प्रयोगाने इन्सुलिनविरोध निर्माण केल्यानंतर इन्सुलिनची पातळी वाढली नाही आणि उपाशीपोटी मोजलेल्या ग्लुकोजचीही वाढली नाही. दुसऱ्या एका प्रयोगात इन्सुलिनचे विघटन करण्याची यंत्रणा स्थगित केली. त्यामुळे रक्तातली इन्सुलिनची पातळी खूपच वाढली. याचा परिणाम म्हणून ग्लुकोज कमी व्हायला हवे होते खरंतर. पण तसे ते झाले नाही, उलट काही प्रयोगांमध्ये ते वाढलेच. यासारखे अनेक प्रयोग अनेक प्रयोगशाळांनी स्वतं त्रपणे केले. यातले काही प्रयोग माणसावरही केले गेले आहेत; पण इन्सुलिनचे थिअरीप्रमाणे अपेक्षित परिणाम कुठल्याच प्रयोगांमध्ये दिसले नाहीत.

इन्सुलिन ड्रायव्हरसारखा
२०१२मध्ये Diabetes Care नावाच्या, या क्षेत्रात प्रतिष्ठेच्या आणि विश्वसनीय ठरलेल्या नियतकालिकात दोन वरिष्ठ मधुमेह संशोधकांनी एका पाठोपाठ एक लेख लिहिले. त्याचे सामायिक शीर्षक होते ‘Diabetes: Have we got it all wrong?`.टाईप-२च्या मधुमेहाची प्रचलित असलेली थिअरी चुकीची तर नाही ना? ही शंका त्यांनी थिअरी आणि प्रयोगांमध्ये काही बाबतीत विरोधाभास दिसल्यामुळेच व्यक्त केली होती. त्यानंतर आठ वर्षांनी आज ही शंका खरी असल्याची आणखी लक्षणे दिसत आहेत. ताजी घडामोड अशी, की पुण्यातील ‘आयसर संस्थे’तील मनवा दिवेकर या विद्यार्थिनीने गेल्या वीस वर्षात झालेल्या प्रयोगांना एकत्र करून त्याचा सुसंगत अर्थ एका गणिती प्रारूपाच्या आधारे लावण्याचा प्रयत्न केला. तो गेल्याच आठवड्यात प्रसिद्ध झाला आहे. या शोधनिबंधाच्या म्हणण्याप्रमाणे इन्सुलिनचे ग्लुकोज नियंत्रणातले काम एखाद्या ड्रायव्हरसारखे आहे. ड्रायव्हर तुम्हाला सांगाल तिथे घेऊन जाऊ शकतो. पण कुठे जायचे हे ड्रायव्हर ठरवत नाही. तसे ग्लुकोजची स्थिर पातळी गाठण्यासाठी इन्सुलिनची मदत नक्कीच होते. पण ती स्थिर पातळी काय असावी, हे इन्सुलिन ठरवत नाही. खाल्यानंतर वाढलेली पातळी परत स्थिर होण्याच्या वेगावर इन्सुलिनचा प्रभाव असतो; पण स्थिर पातळी काय असावी याच्यावर इन्सुलिन कमी अथवा जास्त असल्याने, इन्सुलिनविरोध असल्याने अथवा नसल्याने काही फरक पडत नाही. उदाहरणार्थ, मीठ पाण्यात विरघळतं आणि ते ढवळल्यानी जास्त लवकर विरघळते. पण किती मीठ विरघळल्यावर स्थिर संपृक्त द्रावण तयार होते, यावर कमी किंवा जास्ती ढवळल्याने काहीच फरक पडत नाही. इन्सुलिनचे कार्य या ढवळण्याच्या क्रियेसारखे आहे. आजवर इन्सुलिन-ग्लुकोज संबंधांचे जे अर्थ लावले गेले, ते चुकीच्या मार्गावर गेले, याचे कारण निष्कर्ष काढण्याच्या पद्धतीत एक खोट होती. ती खोटही या शोधनिबंधाने दाखवून विज्ञानाच्या निष्कर्षपद्धतीत काही सुधारणा सुचवल्या आहेत. ग्लुकोजची स्थिर पातळी इन्सुलिन ठरवत नाही तर कोण ठरवतं? अनेक स्वतंत्रपणे केलेले प्रयोग एकत्रितपणे सांगत आहेत, की हे मेंदू ठरवतो. पण यातले सगळे बारकावे अजून स्पष्ट व्हायचे आहेत. याखेरीज साखरेची पातळी मर्यादेत ठेवली तर मधुमेहाचे दुष्परिणाम टाळता येतात, असे दाखवण्यासाठी ज्या मोठ्या वैद्यकीय चाचण्या गेल्या तीस वर्षात केल्या गेल्या त्यापैकी काही सपशेल अपयशी ठरल्या आणि काहींना अत्यल्प आणि संदिग्ध यश मिळालं. त्यामुळे साखर नियंत्रित ठेवणे हीच मधुमेहावरच्या उपचाराची योग्य दिशा आहे, यालाही पुरेसा पुरावा नाही. दुसरीकडे आता हेही स्पष्ट झाले आहे की मधुमेहात फक्त इन्सुलिन आणि साखरेच्या पातळ्या बदलत नाहीत तर सुमारे ७०-८० निरनिराळ्या जीवरसायनांच्या पातळ्या बदलतात. ग्लुकोज वाढल्यामुळे त्या बदलतात असे मानायालाही काही पुरावा नाही. मधुमेहात ग्लुकोज आणि इन्सुलिन हे मध्यवर्ती आहेत, असा समज हे इतिहासाचे ओझे आहे. ते बाजूला ठेवून मधुमेहात घडणाऱ्या सर्व जीवरासायनिक घडामोडींचा नव्याने अर्थ लावायला हवा आणि त्या दिशेने संशोधन वळतही आहे.

संशोधनाच्या पातळीवरचे हे काम प्रत्यक्ष उपचाराच्या पातळीवर यायला काही काळ जावा लागेल. माणसाच्या स्वभावात एक जडत्व असते, ते वैज्ञानिकांतही असते आणि वैद्यकीय व्यावसायिकांमधेही. त्यामुळे कुठलाही मूलभूत बदल स्वीकारायला वेळ लागतो. पण माहिती क्रांतीच्या युगात नवे संशोधन सर्वसामान्य माणसापासून फार काळ लांब राहू शकत नाही आणि मग माहितीच्या स्वातंत्र्याच्या दबावाने वैद्यकशास्त्रालाही लवकर बदलावे लागेल हे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com