सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग आणि स्टार्टअपसाठीचे व्यवस्थापन मंत्र

दत्तात्रय आंबुलकर
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

सूक्ष्म-लघू व मध्यम उद्योग आणि 'स्टार्टअप'साठी 'बिझनेस स्कोअर कार्ड' या व्यवस्थापकीय कार्यपद्धतीचा विचार केला जाऊ शकतो. हे उद्योग आणि उद्योजकांना आपापल्या क्षेत्रात यशस्वी होणे आवश्‍यक असते.

सूक्ष्म-लघू व मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि 'स्टार्टअप' या क्षेत्रासाठी विविध योजना, तरतुदींची आखणी केल्याने या क्षेत्राचे आर्थिक-औद्योगिक महत्त्व अधोरेखित झाले आहे. हे महत्त्व उद्योगांप्रमाणेच रोजगारपूरकही असल्याने सूक्ष्म-लघू उद्योग हे सध्या चर्चेत आहेत. व्यापक व प्रगत स्वरूपातील लघू-मध्यम उद्योग आणि 'स्टार्टअप' यांना आर्थिक पाठबळ, शासकीय योजना, विविध स्तरांवर तंत्रज्ञानाची मदत आदी मुद्दे चर्चेत असले आणि विभिन्न स्वरूपात त्यांचा उपयोगही होत असला, तरी या महत्त्वपूर्ण उद्योग व्यवस्थेसाठी या क्षेत्रानुरुप व्यवस्थापन पद्धती प्रस्थापित करणे गरजेचे आहे.

या पार्श्‍वभूमीवर सूक्ष्म-लघू व मध्यम उद्योग आणि 'स्टार्टअप'साठी 'बिझनेस स्कोअर कार्ड' या व्यवस्थापकीय कार्यपद्धतीचा विचार केला जाऊ शकतो. हे उद्योग आणि उद्योजकांना आपापल्या क्षेत्रात यशस्वी होणे आवश्‍यक असते. कारण त्यांच्या या प्रयत्नांत आर्थिक गुंतवणूक, प्रयत्न, तंत्रज्ञान आणि मुख्य म्हणजे आयुष्यातील उमेदीची वर्षे, ऊर्जा पणाला लागलेले असते. त्यामुळे या उद्योजकांना आपल्या गरजा व आव्हानांनुरुप व्यावसायिक रचना करावी लागते.

'बिझनेस स्कोअर कार्ड'मुळे संबंधितांना त्यांच्या उद्योग-व्यवसायाशी संबंधित धोरणात्मक कार्यपद्धती निश्‍चित करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी चालना मिळते. याचा फायदा पुढच्या टप्प्यात उद्योग-कामकाजाचे नियोजन व अंमलबजावणीसाठी करता येतो. शिवाय या व्यवसाय मंत्राचा वापर केल्यास लघू उद्योजकांना कालबद्ध व निश्‍चित स्वरूपाचे मार्गदर्शन होऊन यशस्वी होता येते. 

या क्षेत्राच्या व्यावसायिक वैशिष्ट्यांमध्ये संपूर्ण उद्योग-व्यवसाय क्षेत्राच्या तुलनेत त्यांचे छोटेखानी स्वरूप, मर्यादित स्वरूपातील, पण महत्त्वपूर्ण व्यावसायिक योगदान, नेमक्‍या स्वरूपातील अर्थरचना, वैशिष्ट्यपूर्ण ग्राहक-सेवा, संबंधित उद्योजकांचे दैनंदिन कामातील योगदान व मर्यादित कर्मचारी संख्या आदी बाबी लक्षात घेता पुढील मुद्दे महत्त्वपूर्ण ठरतात. 

आर्थिक पाठबळ व व्यावसायिक उत्पन्न
सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग व 'स्टार्टअप' यांचे स्वरूप आणि कार्यक्षेत्र याचा पडताळा घेतल्यास असे लक्षात येते, की संबंधित उद्योजक व्यावसायिक निकड व आर्थिक स्थिती लक्षात घेऊन स्वतः व वैयक्तिक स्वरूपात गुंतवणूक करतात. अशा प्रकारच्या नेमक्‍या व मर्यादित गुंतवणुकीचे फायदे असतात. मात्र बदलत्या शासकीय ध्येयधोरणांनुसार 'मुद्रा' योजनेपासून विद्यापीठ स्तरापर्यंत लघू-नवउद्योजक व 'स्टार्टअप' उपक्रमांसाठी ज्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत, त्यांचा लाभ घेणे महत्त्वाचे ठरते. 

व्यावसायिक संकल्पना व स्वरूप
प्रत्येक उद्योग- व्यवसायाचे स्वतःचे असे व्यावसायिक स्वरूप- प्रारुप असते. या प्रारुपाची सांगड संबंधित उद्योगाशी घालणे आवश्‍यक असते. त्यातही विशेषतः लघू उद्योग हे व्यापक स्वरूपात व त्यांचे स्वरूप, उत्पादन, सेवा इत्यादीच्या दृष्टीने अन्य उद्योग- सेवांवर अवलंबून असल्याने असा पुढाकार घेणाऱ्या उद्यमींनी उद्योगाची सुरवात करताना त्याचा अंतिम उपयोग कुणाला, कसा आणि कशासाठी होणार त्याचा पडताळा घेणे आवश्‍यक आहे. 

उद्देश व मूल्यवर्धन
लघू-उद्योग व त्यातही 'स्टार्टअप'सारखे उपक्रम हे व्यावसायिक संदर्भात नावीन्यपूर्ण, व्यवसायपूरक व म्हणून व्यावसायिक मूल्यवर्धन करणारे असणे आवश्‍यक असते. या उपक्रमांची यशस्वी वाटचाल या साऱ्या बाबींवर असल्याने या क्षेत्रातील नवागतांनी ठोस धारणा ठेवून त्याची पूर्तता करणे अत्यावश्‍यक ठरते. 

ग्राहक प्रतिसाद  
सूक्ष्म व लघू उद्योगांच्या रचनेत व कार्यवाहीत ग्राहककेंद्रित व ग्राहक सेवाभिमुख असणे जरुरीचे असते. याचे कारण म्हणजे या व्यवसाय क्षेत्राचे यशापयश याच बाबीवर अवलंबून असते. 

देशांतर्गत सूक्ष्म- लघू व मध्यम उद्योगांचे वाढते महत्त्व सूक्ष्म-लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी 'एमएसएमई'विषयक आंतरराष्ट्रीय संमेलनात अलीकडेच विशद केले. आज देशात सुमारे सहा कोटी 'एमएसएमई' असून, त्याद्वारे सुमारे 11 कोटी रोजगार उपलब्ध आहेत. रोजगारांची ही संख्या 15 कोटींवर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेतील 'जीडीपी'मध्ये 'एमएसएमई'चा वाटा सध्याच्या 29 टक्‍क्‍यांवरून पाच वर्षांत 50 टक्‍क्‍यांवर नेण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम गडकरी आणि त्यांच्या मंत्रालयाने हाती घेतला आहे, ही बाब उत्साहवर्धक आहे. 

थोडक्‍यात, आर्थिक-औद्योगिकसंदर्भात 'एमएसएमई' व स्टार्टअप' क्षेत्राला पूर्वी कधी नव्हे एवढे पूरक आणि प्रेरक वातावरण असल्याने या क्षेत्रातील उद्योजकांनी आपल्या व्यवसाय संकल्पनेला व्यवसायानुरुप 'बिझनेस स्कोअर कार्ड' कार्यपद्धतीची जोड दिली पाहिजे. उद्योग-व्यवसायाला आर्थिक-व्यावसायिक स्थिरता, व्यवसाय-सेवेच्या संदर्भात जबाबदारीची जाणीव, सक्षम व समर्पित कर्मचारी-कार्यपद्धती आणि ग्राहककेंद्रित सेवेतील सातत्य या कार्यपद्धतीची जोड देणे ही काळाची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about Management Mantra for Small and Start up Businesses written by Dattatray Ambulkar