पत्रकधारी योद्धा 

सारंग खानापूरकर 
शनिवार, 27 जून 2020

अर्ध्या शतकाहून अधिक काळापासून एकमेकांविरोधात सीमेवर युद्धसज्ज असलेले उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या देशांमधील सध्या वाढलेल्या तणावास पार्क यांची पत्रकबाजीही काही प्रमाणात कारणीभूत आहे.

जगापासून फटकून राहणाऱ्या उत्तर कोरियाला सध्या त्यांच्याच एका फरारी नागरिकाने हैराण केले आहे. पार्क सॅंग-हक असे या धाडसी व्यक्तीचे नाव असून, आपल्या मातृभूमीतील जनतेला किम जोंग उन या हुकूमशहाच्या पकडीतून मुक्त करण्यासाठी ते झटत आहेत. त्यासाठी ते जनजागृती करणारी पत्रके ते आपल्या देशबांधवांना फुग्यांद्वारे पाठवत आहेत. रात्रीच्या अंधारात येणाऱ्या या लाखो फुग्यांना रोखायचे कसे, हा उत्तर कोरियापुढे प्रश्न निर्माण झाला आहे. 

पार्क यांचा जन्म 1968 मध्ये उत्तर कोरियात एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला. महाविद्यालयात शिक्षण घेईपर्यंत उत्तर कोरिया सरकार दाखविल तेच विश्व त्यांना माहीत होते. मात्र, नंतर बाहेरील देशांमधून आलेल्यांकडून तेथील वर्णन ऐकून ते अस्वस्थ झाले. आपल्या देशात जनतेवर होणाऱ्या अन्यायाचीही त्यांना जाणीव झाली. स्वत:ला असलेला धोका ओळखून ते कुटुंबासह गुप्तपणे चीनमार्गे दक्षिण कोरियात आले. याची शिक्षा म्हणून उत्तर कोरिया सरकारने पार्क यांची होणारी पत्नी आणि इतर सर्व नातेवाइकांची संपत्ती जप्त करून त्यांना अक्षरश: भिकेला लावले. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

2003 मध्ये दक्षिण कोरियात आल्यापासून पार्क हे उत्तर कोरिया सरकारविरोधात चळवळ करत आहेत. सध्या ते "फायटर्स फॉर अ फ्री नॉर्थ कोरिया' या संघटनेचे प्रमुख असून, या संघटनेच्या माध्यमातूनच ते उत्तर कोरियात पत्रके पाठवत आहेत. या फुग्यांद्वारे पार्क हे मानवी हक्कांची माहिती देणारी, बाह्य जगाचे वर्णन करणारी पत्रके, पुस्तके, डीव्हीडी, पेन ड्राइव्ह, रेडिओ अशा गोष्टी उत्तर कोरियात सोडतात. हजारोंच्या संख्येने असलेले हे फुगे उत्तर कोरियाच्या विविध गावांमध्ये नागरिकांच्या हाती पडतात. पार्क यांची बहीणही रिकाम्या बाटल्यांमध्ये पत्रके टाकून त्या समुद्रात सोडत आहे. उत्तर कोरियाबाहेरील जगाची काहीही माहिती जनतेपर्यंत पोहोचू दिली जात नसल्याने ही पत्रके जनतेला वास्तवाचे भान आणून देतात. किम जोंग उन यांनी पार्क यांना मारण्यासाठी विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता. अर्ध्या शतकाहून अधिक काळापासून एकमेकांविरोधात सीमेवर युद्धसज्ज असलेले उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या देशांमधील सध्या वाढलेल्या तणावास पार्क यांची पत्रकबाजीही काही प्रमाणात कारणीभूत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about Park Sang-hak is a North Korean democracy activist