नाममुद्रा : साहाय्यक ते सूत्रधार

प्रसाद  इनामदार
Saturday, 19 September 2020

ॲबे यांचे खंदे समर्थक सुगा यांची संसदेच्या कनिष्ठ सभागृहात मतदान घेऊन पंतप्रधानपदी अधिकृतपणे निवड झाली आणि कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसलेल्या सुगांनी  जगाचे लक्ष वेधले.

गात्रं थकली तरी सत्ता सोडायची नाही... हेच आत्तापर्यंत आपण पाहत आलो. अशा वेळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे ‘आपण पदाला योग्य न्याय देऊ शकत नाही’ असे सांगत पंतप्रधानपद त्यागणं हे विरळाच उदाहरण. जपानचे पंतप्रधान शिंजो ॲबे पायउतार झाले आणि त्यांच्याच मंत्रिमंडळात मुख्य सचिव योशिहिदे सुगा त्यांचे उत्तराधिकारी बनल्याचे जगाने पाहिले. कोरोनाचा वाढता कहर आणि जगाच्या अर्थव्यवस्थेला बसलेल्या तडाख्याने अवघं जग ढवळून निघालेले असतानाच श्रमजीवी जपानमध्ये हे स्थित्यंतर घडलं.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ॲबे यांचे खंदे समर्थक सुगा यांची संसदेच्या कनिष्ठ सभागृहात मतदान घेऊन पंतप्रधानपदी अधिकृतपणे निवड झाली आणि कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसलेल्या सुगांनी  जगाचे लक्ष वेधले. जपानमधील अकिता या छोट्या गावात स्ट्रॉबेरीची शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या पोटी ६ डिसेंबर १९४८ मध्ये जन्मलेले सुगा संवादप्रिय आहेत. गावातच प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी टोकियो गाठले. तेथे विविध कामे करत कायद्यातील पदवी पूर्ण केली. नोकरीत मन न रमल्याने लिबरल डेमोक्रॅटीक पक्षासोबत काम सुरू केले. योकोहामा शहरातील पालिकेची निवडणूक लढवून जिंकली. हळूहळू राष्ट्रीय राजकारणात जागा बनवत शिंजो ॲबे यांचे विश्‍वासू सहकारी बनले. गेल्या काही वर्षांत ॲबे यांच्या प्रत्येक निर्णयात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आता पंतप्रधान म्हणून स्वतंत्रपणे काम करताना स्वतःचा ठसा उमटवत देशालाही प्रगतीच्या मार्गावर न्यायची कसरत त्यांना साधावी लागणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या संकटावर मात करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. शिंजो ॲबे यांच्या तालमीत तयार झालेले सुगा यांनीही सूत्री हाती घेताच, कठोर परिश्रमाची गरज व्यक्त केली व अर्थव्यवस्था बळकट करण्यास आपण प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. ज्याप्रमाणे शिंजो ॲबे भारतासाठी महत्त्वाचे ठरले, त्याचप्रमाणे सुगाही पुढील काळात ठरतील. विशेषतः चीनसोबत संबंध ताणले असताना आशियामध्ये जपानसारख्या बलाढ्य मित्राची भारताला नितांत आवश्‍यकता आहे. सुगा यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about Prime Minister of Japan yoshihide suga