गड-किल्ल्यांवर गरज आहे लक्ष देण्याची!

Fort
Fort

गड आणि किल्ले ही महाराष्ट्राची एक मोठी ऐतिहासिक ठेव आहे; पण तेथील साधनसामग्री, महत्त्वाची ठिकाणे दुर्लक्षित राहिली आहेत. युद्धशास्त्र, युद्धाचा इतिहास यादृष्टीने त्यांवर नीट प्रकाश टाकण्याची गरज आहे.

भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय  इतिहासात गड आणि किल्ल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. राजघराण्यातील संघर्ष आणि सत्तांतर यांमधील घटनांत गड आणि किल्ले यांचा संदर्भ महत्त्वाचा असतो. ते इतिहासाच्या नोंदींतूनही आपल्याला प्रत्ययास येते. काळाच्या ओघात गड, किल्ले, जलाशय, विहिरी, बुरूज, खंदक, स्तंभ, दगडी तोफा, ढाल-तलवारी, हत्ती, घोडे, रथ, अंबाऱ्यांची उपयुक्तता कमी झाली किंवा पूर्णपणे संपुष्टात आली. त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याने ते आपली ऐतिहासिकता गमावून बसण्याचा धोका आहे.

वास्तविक गड किंवा किल्ले हे सैन्याचे अविभाज्य घटक होते. परंतु सध्या सर्व किल्ले, गड, त्यावरील शस्त्रसंभार यांचा आणि सैन्यदलांचा संबंध तुटल्यासारखा झाला आहे. वास्तविक युद्धशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी आजही हे गड-किल्ले व तेथील साधनसामग्री अत्यंत महत्त्वाची आहे. तेथे जाणाऱ्या  पर्यटकांना मौजमजा करताना अनेक ऐतिहासिक वास्तूंची हेळसांड होते आहे, याची जाणीव नसते.

पर्यटकांना इतिहासातील घटना, तसेच गड किंवा वास्तूंची ओळख करून देणारे फलक कुठे कुठे असतात, पण ते वाचायला फार लोक जाताना दिसत नाहीत. सध्या गड आणि अन्य स्थळे ‘पिकनिक’ची ठिकाणे झाली आहेत. म्हणून त्यांचे खऱ्याखुऱ्या ऐतिहासिक पर्यटनस्थळांत रूपांतर करण्यासाठी आपणास काय करता येईल? या सर्वांवर मात करण्यासाठी काही उपाय आहेत का?

चित्रफितींमधून इतिहास सांगावा
मला जे मुद्दे महत्त्वाचे वाटतात, ते असे :  
१) गड आणि किल्ले हे सैनिकी पर्यटनस्थळे म्हणून विकसित करायला हवीत. पडलेले बुरुज किंवा तटबंद्या दुरुस्त करून पुन्हा त्याच दिमाखात बनवून वास्तूंची शान राखता येईल; परंतु सध्याच्या पुरातत्त्व विभागातील कार्यपद्धती आणि त्यांच्याकडील तुटपुंज्या आर्थिक तरतुदी व मनुष्यबळ वगैरे बाबी लक्षात घेऊन असे बांधकाम शक्‍य होईल असे नाही; त्यामुळे संगणकाच्या मदतीने या वास्तूंची त्रिमितीय पद्धतीने काल्पनिक निर्मिती करायला हवी. ती माहिती मिळाल्याने त्या संबधित वास्तूत घडलेल्या घटनांचा इतिहास जिवंत होईल. वास्तूपाशी इतिहासातील एक एक घटना जिवंत करून त्या त्या गड किंवा किल्ल्यांची महती गाता येईल.

२) गड-किल्ल्यांवर अनेक ठिकाणी तोफा काही तोफगोळे, इतस्ततः पडलेले दिसतात; पण ती शस्त्रे कशी वापरायची किंवा युद्धात वापरली जात होती, याचे प्रात्यक्षिक द्यायला लागणारी यंत्रणा व साधनसामग्री उपलब्ध नसते.  जर या साधनांचा वापर करून त्यांच्या उपयुक्ततेची चाचणी सैनिकी तळांवर केली गेली आणि त्याच्या चित्रफिती तयार करून पर्यटकांना माफक दरात दाखवायची व्यवस्था केली तर इतिहास खऱ्या अर्थाने जिवंत होईल.

३) ज्या वेळी या वास्तू ऐतिहासिक काळातील माणसांनी, गरजेच्या वस्तूंमुळे गजबजलेल्या असतील, तेव्हा तिथल्या लोकांना पाणीपुरवठा योजना, धान्य साठवण, मलनिस्सारण व्यवस्था कशी करण्यात येत असे? याचे वर्णन व प्रात्यक्षिक सैन्यदलातील सध्याच्या परिस्थितीत कसे होते, ते कसे बदलत गेले, यांच्या चित्रफिती तयार करण्यात याव्यात.

४) युद्ध साहित्य मुख्यतः तोफा, दारूगोळा व हातघाईवर कामाला येणाऱ्यात तलवारी-ढाली, अन्य धारदार शस्त्रे कुठे बनवली जात? समजा त्या काळात खडे १० लाख सैन्य होते, तर त्यांना प्रत्येकी कमीत कमी ४-५ तलवारी लागतात असे धरून ५० लाख तलवारी व ढाली यांचे कारखाने कुठे कुठे होते. त्याला लागणाऱ्या धातूच्या खाणी कुठे होत्या? आहेत? त्यांवर नियंत्रण करायला लढाया झाल्या का? ही सर्व माहिती उपलब्ध व्हायला हवी.

५) तंबू, तात्पुरते बांधकाम व सैनिकी शस्त्रे, त्यांच्या दिमतीचे हत्ती, घोडे, उंट व अन्य जनावरे यांचे त्या वेळी अनन्यसाधारण महत्त्व होते. त्याची नीट कल्पना अभ्यासकांना, पर्यटकांना आणि सर्वसामान्य जिज्ञासूंना करून द्यायला हवी.

६) टपाल आणि निरोप घेण्या-देण्याची व्यवस्था, लेखी करार पत्रव्यवहार, शेतसारा भरायची व त्यांच्या नोंदणीची सोय या सर्व विविध संकल्पनांवर अनेक छोट्या-छोट्या शॉर्ट फिल्म काढायला हव्यात. त्या माफक दरात दाखवाव्यात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com