राष्ट्रीय युवक दिन : विवेकानंदांनी शिकवलेले रुग्णसेवेतील अध्यात्म

swami vivekananda
swami vivekananda

स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय युवक दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. यावरूनच आपल्या लक्षात येते, की राष्ट्रनिर्माणात युवकांचे महत्त्व स्वामी विवेकानंदांना माहीत होते. स्वामी विवेकानंदांनी आपली सारी व्याख्याने युवकांना उद्देशून दिली आहेत. स्वामीजी अमेरिकेत गेले तेव्हा त्यांनी तिथली भौतिक प्रगती पाहिली. तेथील लोकांना भौतिक सुविधा मिळाल्या असल्या, तरी मानसिक शांतता नसल्याचे लक्षात आले. त्यांना अशी शांतता मिळावी म्हणून स्वामीजींनी त्यांना ‘अध्यात्म वेदान्त’ दिला. भौतिक गोष्टींनी सर्व साध्य होत नसल्याचे त्यांनी सांगितले. स्वामीजी अमेरिकेतून भारतात परतले त्या वेळी त्यांच्या असे लक्षात आले, की या ठिकाणी ‘अध्यात्म वेदान्त’ सांगणे उचित नाही. कारण, उपाशीपोटी तो समजू शकणार नाही. भारतीयांसाठी भौतिक गरजा पूर्ण करणे आवश्‍यक आहे. भारतात धोरण बदलले पाहिजे. यातूनच त्यांनी ‘रामकृष्ण सेवा मठा’चे कार्य आरंभिले.

सेवाकार्य म्हणजे कर्मयोग
रामकृष्ण सेवा मठाचे कार्य म्हणजे कर्मयोगच असल्याचे त्यांनी सांगितले. लोकमान्य टिळकांनी गीतारहस्यात कर्मयोगच सांगितला आहे. देश झोपलेला असून, त्याला जागे करण्यासाठी कर्मयोगाची आवश्‍यकता असून, तो रजोगुण वाढविल्याशिवाय देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही, असे स्वामीजींनी सांगितले. 

सेवा ही ईश्‍वरी पूजा असल्याचे वेदान्त सांगतो. ‘शिवभावे जीवसेवा’ आवश्‍यकच असल्याचे त्यांनी सांगितले. मंदिरांप्रमाणे जनसेवा करण्याचे धोरण त्यांनी चतुःसूत्रीच्या माध्यमातून दिले. त्या प्रेरणेतूनच रुग्णसेवेचे कार्य रामकृष्ण मठातर्फे मोठ्या प्रमाणात केले जाते. गरिबांसाठी आज नितांत आवश्‍यकता आहे, ती दर्जेदार आणि वाजवी खर्चातील आरोग्यसेवेची. ती मिळाली तर जगण्याचा या लोकांचा संघर्ष कितीतरी सुसह्य होऊ शकतो. त्यामुळेच मठातर्फे सेवाभावी वृत्तीने डॉक्टर रुग्णांवर उपचार करतात. स्वामीजींनी सांगितलेली चतुःसूत्री अशी...

१) अन्न, वस्त्र, निवारा ः गरजूंना अन्नदान करणे आवश्‍यक आहे. पोटाचा प्रश्‍न सुटल्याशिवाय त्यांना अन्य काहीही सांगितले, तर ते पचनी पडणार नाही. यासाठी सुयोग्य पद्धतीने हा मार्ग निवडला पाहिजे. नैसर्गिक आपत्तीत मदत करताना अन्य आपत्तीकाळातही मदतीची भावना ठेवली पाहिजे

२) प्राणदान ः सामान्य व्यक्तीला कोणत्याही आजारापासून वाचविणे हे योगी नारायणाचे काम असल्याचे स्वामीजींनी सांगितले आहे. यासाठी स्वतः स्वामीजींनी पुढाकार घेतला. त्यांनी कृष्णानंदजी यांना हरिद्वार येथे पाठवून आरोग्य सेवा उभारणी करण्याबाबत सांगितले. त्यांच्या पुढाकारातून हरिद्वार येथे आरोग्य सेवा सुरू झाली. त्या ठिकाणी आज दोनशे खाटांचे रुग्णालय सुरू आहे. त्याच धर्तीवर वाराणसी येथे चारशे मठांच्या माध्यमातून चारशे खाटांचे रुग्णालय सुरू आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रुग्णसेवा करणे हे परमेश्‍वराचे कार्य आहे. ते करताना कोणत्याही अपेक्षा बाळगू नका, असे स्वामीजींनी स्पष्टपणे सांगितलेले आहे. निष्काम भावाने सेवा केल्यास त्याचे चांगल्या कर्मात रुपांतर होते, ही स्वामीजींची प्रेरणा आहे. महाराष्ट्रात पुणे, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथे ‘बाह्य रुग्ण विभाग’ चालविला जातो. माफक दरात गरीब, गरजू रुग्णांना सेवा दिली जाते. यासाठी त्या-त्या व्याधींच्या तज्ज्ञ डॉक्‍टरांची टीम आहे. त्यापैकी अनेक डॉक्‍टर निःशुल्क सेवा देतात. कोल्हापूर जिल्ह्यात मठाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेतले जाते. आतापर्यंत सुमारे दहा हजार शस्त्रक्रिया केल्या आहेत. कोरोना काळात मठाच्या वतीने गरजूंना अन्नधान्य वितरण करण्यात आले. डॉक्‍टरांना पीपीई किट, तसेच दहा हजार मास्कचे वितरण करण्यात आले.

३) शिक्षणाचा पाया ः शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे स्वामीजींनी सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी कलकत्ता येथे भगिनी निवेदिता यांना शाळा सुरू करण्यास सांगितले.त्या प्रेरणेतून मठाच्यावतीने ठिकठिकाणी महाविद्यालये, शाळा बालसंस्कार केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांतून नेहमीच्या अभ्यासक्रमाबरोबरच  संस्कारक्षम शिक्षण दिले जाते. चारित्र्यनिर्माण हा या शिक्षणामागचा मुख्य उद्देश. संस्कारित व्यक्ती निर्माण करणे, सेवाभाव जपणारी चारित्र्यसंपन्न व्यक्ती निर्माणाचे कार्य सुरू आहे. पारंपरिक शिक्षणाला संस्कारित शिक्षणाची जोड दिल्यास व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळेल. लहान वयापासून प्रयत्न केल्यास संस्कारक्षम पिढी निर्माण होईल. त्याचा समाजाला आणि देशाला फायदा होईल, असे स्वामीजी म्हणत. मठाच्या माध्यमातून वीस-पंचवीस वर्षांपासून संस्कारशाळा सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील उदगीर येथे दहावीपर्यंतची शाळा चालविली जाते. 

४) अध्यात्म ज्ञान ः भौतिक सुखात अध्यात्माचा विसर पडतो. यासाठी स्वामीजींनी लोकांमध्ये आध्यात्मिक जागरुकता करण्याबाबत सांगितले आहे. आता प्रत्येक जण सुखामागे धावत आहे. परंतु त्याला समाधान मिळत नाही. लोभ वाढला असून त्यावर अधात्म हाच उपाय आहे. भक्ती निर्माण होईल, या पद्धतीने कार्य करण्याच्या प्रेरणेतून ‘रामकृष्ण मठा’चे कार्य सुरू आहे.

‘विवेकानंद ज्ञानपीठ’
पुणे येथील मठात आता ‘विवेकानंद ज्ञानपीठा’ची उभारणी सुरू आहे. या प्रकल्पात अध्यात्माच्या ज्ञानाबरोबर जगातील सर्व भाषांचे ज्ञान दिले जाणार आहे. सुमारे तीन एकरांत हा प्रकल्प असून, यामध्ये ‘भगिनी निवेदिता भाषा विद्यालय‘, ‘विवेकानंद ह्युमन एक्‍सलन्स विद्यालय’ आणि ‘विवेकानंद स्कूल ऑफ कल्चर’ सुरू होणार आहे. यामध्ये भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान, संस्कृत भाषा, योग, ध्यानधारणा, वेदान्त, संगीत, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण विकास, संवाद कौशल्य आदी विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

शब्दांकन : आशिष तागडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com