esakal | निवासाला ‘अर्थ’ देणारी प्रेरक कहाणी

बोलून बातमी शोधा

Airbnb}

एअरबीएनबी ही ‘शेअर्ड सर्व्हिस’ अर्थव्यवस्थेमधली सध्याची प्रेरक कहाणी आहे. संस्थापक वाईट स्थितीत असताना निर्माण झालेल्या गरजेतून त्यांनी कशी संधी साधली आणि पर्यटकांना ‘होम स्टे’चे पर्याय देऊन साखळी कशी तयार केली त्याचीही ही कहाणी आहे.

निवासाला ‘अर्थ’ देणारी प्रेरक कहाणी
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

एअरबीएनबी ही ‘शेअर्ड सर्व्हिस’ अर्थव्यवस्थेमधली सध्याची प्रेरक कहाणी आहे. संस्थापक वाईट स्थितीत असताना निर्माण झालेल्या गरजेतून त्यांनी कशी संधी साधली आणि पर्यटकांना ‘होम स्टे’चे पर्याय देऊन साखळी कशी तयार केली त्याचीही ही कहाणी आहे. संस्थापक स्वतःवर ठाम कसे राहिले आणि मोठे गुंतवणूकदार पाठीशी नसतानाही तगून राहण्यासाठी मार्ग कसे शोधत राहिले त्याचीही ही कहाणी आहे.  

नुसती कल्पना करून बघा. तुम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि वेगवेगळ्या घरांमध्ये राहत आहात आणि तुम्हाला अजिबात न ओळखणारे संबंधित यजमान तुमची सरबराई करत आहेत. विचित्र किंवा अशक्य वाटतंय ना? ब्रायन चेस्की हे जेव्हा त्यांच्या स्टार्टअपसाठी निधी मिळवण्यासाठी त्यांची ही कल्पना गुंतवणूकदारांना सांगायचे तेव्हा त्या गुंतवणूकदारांनाही तेच वाटायचं. मात्र, हीच कंपनी भविष्यात तब्बल शंभर अब्ज डॉलरचं मूल्य असलेली कंपनी होणार आहे याची त्यांना कल्पनासुद्धा नव्हती. एअरबीएनबी ही आज घरं भाड्यानं देणं-घेणं यात अग्रगण्य असलेली कंपनी असून, ब्रायन चेस्की आणि जो गेबिया यांनी तिची स्थापना केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चेस्की लहान होते, तेव्हा त्यांच्या पालकांनी पैसे मिळवून देणारं आणि आरोग्यविषयक सुविधा देणारं करिअर करण्याचं बिंबवलं होतं. त्यामुळे उद्योजक बनण्यापेक्षा आरोग्यविषयक सुविधा देणारी नोकरी खूप चांगली ही गोष्ट त्यांच्या मनावर अगदी बिंबली गेली होती. त्यामुळे डिझाईन स्कूलमधून पदवी मिळाल्यानंतर लगेच त्यांनी इंडस्ट्रिअल डिझायनर म्हणून काम करायला सुरुवात केली, कारण त्यात आरोग्य विमा मिळणार होता. (अर्थात हा आरोग्य विमाही आपल्या पालकांच्या अपेक्षेपेक्षा कमीच होता, असं त्यांनी नंतर एका मुलाखतीत सांगितलं.)  

मात्र, आपण अधिक काही तरी करू शकतो असं त्यांना इंडस्ट्रिअल डिझायनर म्हणून काम करताना वाटलं, तसंच स्वतःचा काही तरी उद्योग सुरू केला पाहिजे असंही वाटलं. त्यांच्या मित्रानं सॅनफ्रान्सिस्कोमध्ये बरोबर काही तरी करण्यासाठी बोलावलं, तेव्हा चेस्की यांनी नोकरीचा राजीनामा देऊन टाकला. नक्की काय करायचं, याची कोणतीही योजना तेव्हा त्यांच्याकडे तयार नव्हती; पण तरीही त्यांनी हे पाऊल उचललं.    

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कल्पना मुळात आली कुठून?
एअरबीएनबीच्या संदर्भात ‘गरज ही शोधाची जननी आहे’ ही उक्ती शब्दशः खरी आहे. एक वेळ अशी आली, की चेस्की यांना घराचं भाडं देणं परवडेना. त्यांच्या बँक खात्यात फक्त एक हजार डॉलर होते आणि भाडं होतं १,१५० डॉलर. त्यामुळे त्यांनी जलद पैसे कसे मिळवता येतील याबाबत विचार करायला सुरुवात केली. त्याच आठवड्याच्या अखेरीला सॅनफ्रान्सिस्कोमध्ये एक इंटरनॅशनल डिझाईन कॉन्फरन्स होती आणि त्या कॉन्फरन्सच्या वेबसाइटवर गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं, की तिथं दाखवलेली सगळी हॉटेल्स ‘सोल्ड आऊट’ दाखवत होती. यातून त्याच्या डोक्यात एक ट्युब पेटली आणि ही गरज आपण भरून काढू शकतो असं लक्षात आलं. चेस्की आणि एअर इंडियाचे सहसंस्थापक जो गेबिया यांच्या असं लक्षात आलं, की य कॉन्फरन्सला येणाऱ्यांना राहण्यासाठी जागा लागेल आणि सगळी हॉटेल्स बुक असल्यामुळे ते त्यांच्यासाठी बेड उपलब्ध करून देतील आणि त्यासाठी भाडं आकारतील. जो गेबिया यांना कॅपिंगचा छंद होता आणि त्यासाठी त्यांच्याकडे तीन एअर बेड्स होते. 

आता या दोघांनी अशी कल्पना मांडली, की ते प्रत्येक ग्राहकाला एअर बेडबरोबर ब्रेकफास्टसुद्धा उपलब्ध करून देतील. याच कल्पनेतून एअरबीएनबीच्या नावाचाही जन्म झाला....‘एअर बेड अँड ब्रेकफास्ट!’ पाहुण्यांना झोपण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यायची आणि सकाळी ब्रेकफास्ट द्यायचा एवढीच त्यांची कल्पना. त्यासाठी त्यांनी प्रत्येक रात्रीसाठी ८० डॉलरचं भाडं आकारलं. त्यांची कल्पना यशस्वी झाली. गंमत म्हणजे पहिल्या पाहुण्यांमध्ये होता भारतातला एक तीस वर्षाचा तरुण, बोस्टनमधली ३५ वर्षांची एक महिला आणि उटाहमधले एक ४५ वर्षांचे गृहस्थ.

योग्य सहसंस्थापकांना बरोबर घेणं
ब्रायन आणि जो हे डिझायनर्स असल्यानं त्यांना बुकिंग सहजपणे शक्य व्हावं यासाठी तंत्रज्ञानाची कौशल्यं बाळगून असलेला कोणीतरी सहकारी हवा होता. त्यांनी हार्वर्डचा पदवीधर नाथन ब्लेचारझीक याला बरोबर घेतलं आणि ‘एअर बीएनबी’च्या प्रवासात तिसरा सहकारी मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून सामील झाला. 

उत्पादन आणि ग्राहकहिताकडे लक्ष

  • ग्राहकांना योग्य सेवा मिळावी यासाठी चेस्की यांनी बुकिंग केवळ तीन क्लिक्समध्ये होईल याची काळजी घेतली. स्टिव्ह जॉब्ज जेव्हा आयपॉड बनवत होते, तेव्हा त्यांनी जो विचार केला होता, त्यावरून चेस्की यांना ही प्रेरणा मिळाली होती. 
  • त्यांनी पहिली वेबसाइट ऑगस्ट २००८मध्ये सुरू झाली, तेव्हा त्यांना वेबसाइटकडे खूप लक्ष द्यावं लागेल हे त्यांच्या लक्षात आलं-कारण पहिल्यांदा केवळ दोन युजर्सनी लॉगिन केलं होतं आणि त्यातले एक चेस्की स्वतःच होते. त्यांनी वेबसाइट बदलली आणि कंपनी नव्यानं लॉंच करण्यात आली. हळूहळू गोष्टी सुधारत गेल्या. 

आव्हानांचा रस्ता

  • कंपनीचा विस्तार होत होता, तेव्हा चेस्की यांनी निधीच्या उभारणीसाठी सुमारे १५ गुंतवणूकदारांशी संपर्क साधला, मात्र त्यापैकी केवळ निम्म्या लोकांनी त्यांची दखल घेतली. कंपनीचं मूल्यांकन त्यावेळी सुमारे पंधरा लाख डॉलर इतकं होतं आणि त्यांना एक ते दीड लाख डॉलर निधी हवा होता. मात्र, गुंतवणूकदारांकडून निधी उभारण्यात अयशस्वी ठरल्यानं त्यांनी त्यांच्या व्हिसा कार्डद्वारे पैसे उभारण्याचं ठरवलं, त्यामुळे त्यांच्यावर तीस हजार डॉलरचं कर्ज झालं.   
  • वेबसाइट लॉंच झाल्यानंतर लगेच मागणी आणि पुरवठा यांचा मेळ घालणं त्यांना अवघड होऊन बसलं होतं. वेबसाइटवर होणारी लिस्टिंग्ज आणि बुकिंग्ज यांच्यात सुविहितपणा राहण्यासाठी तांत्रिक समस्या होत्या. त्यातच खेळत्या भांडवलाची चणचण असल्यामुळे ते त्यांच्य उत्पादनांची टीव्हीवर किंवा इतर माध्यमांत जाहिरात करू शकत नव्हते, त्यामुळे त्यांनी ब्लॉगिंगच्या दिशेनं जायचा निर्णय घेतला. त्यांनी ब्लॉगर्सना त्यांच्याविषयी लिहायचं आवाहन केलं. त्यामुळे एअर बीएनपी चर्चेत राहील, असा त्यांचा होरा होता. गंमत म्हणजे त्यानुसार ते अगदी राष्ट्रीय बातम्यांमध्येसुद्धा आले, मात्र त्यातून त्यांना युजर्स मिळाले नाहीत. त्या काळात त्यांना मिळालेली युजर्सची संख्या होती केवळ ८०. 
  • निधीसाठी त्यांनी मग निवडणूक-आधारित सिरिअल्स (तृणधान्यांवर आधारित न्याहारीसाठीचा पदार्थ) बॉक्सेस विकायला सुरुवात केली. त्यांनी Obama O''s आणि Cap''n McCains सिरिअल बॉक्सेस विकून तब्बल तीस हजार डॉलर मिळवले. या सगळ्या बॉक्सेसना त्यांनी स्वतः कव्हर्स घातली होती. ऱ्होड्सच्या माजी विद्यार्थ्यांकडून रॉयल्टीच्या बदल्यात एक हजार बॉक्सेस त्यांना विनामूल्य मिळाले होते. ही एक वेगळीच कल्पना त्यांनी मांडल्यामुळे ते स्वतःला cereal entrepreneur असं म्हणवून घेऊन लागले होते. नेत्यांच्या नावाने असे बॉक्सेस विकण्याची त्यांची कल्पना यशस्वी ठरली. त्यांनी या बॉक्सेसना ‘लिमिटेड एडिशन प्रॉडक्ट’ असं नाव दिलं आणि चार डॉलरचे बॉक्सेस चाळीस डॉलरना विकले. 
  • सन २००९मध्ये एअरबीएनबीला पॉल ग्रॅहम यांच्या वाय-कॉंबिनेटर या स्टार्टअपला गुंतवणूक निधी मिळवून देणाऱ्या संस्थेमध्ये सामावून घेण्यात आलं आणि त्यांना वीस हजार डॉलरची पहिली गुंतवणूक मिळाली.  
  • रॅमेन प्रॉफिटेबल झाल्यावर (साधारण खर्चाइतके पैसे मिळवणारी व्यक्ती किंवा कंपनी) त्यांना दर आठवड्याला दोनशे डॉलर मिळत असले, तरी वाढ फारशी होत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. हे असं का होतंय याचा त्यांनी शोध घेतला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की त्यांच्या वेबसाइटवर ज्या घरांची लिस्टिंग्ज होत होती, त्यांची छायाचित्रं चांगली नसल्यानं कुणी या प्लॅटफॉर्मवर रूम्स बुक करायला उत्सुक नाहीत. त्यामुळे चेस्की यांनी अक्षरशः घरोघरी जाऊन लिस्टिंग होणाऱ्या घरांची छायाचित्रं काढून घेतली. त्यामुळे त्यांना विकासाचा फॉर्म्युला गवसला आणि त्यांना दर आठवड्याला चारशेपेक्षा जास्त डॉलर मिळायला लागले.

वाटचालीतली महत्त्वाची वळणं
एक एप्रिल, २००९मध्ये त्यांनी सिकोइया कॅपिटलकडून साठ हजार डॉलरची गुंतवणूक मिळवली. इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी मिळाल्यानं त्यांची मोठी वाटचाल खऱ्या अर्थानं सुरू झाली. नोव्हेंबर २०१०मध्ये त्यांनी ७२ लाख डॉलरची आणि जुलै २०११मध्ये ११ कोटी वीस लाख डॉलरची गुंतवणूक मिळवली. ॲश्टन कुचर यांनीही त्यांच्या कंपनीत गुंतवणूक केली होती.

एअरबीएनबी खऱ्या अर्थानं नफ्यात आली ती २०१६च्या दुसऱ्या सहामाहीत. संस्थापकांनी स्वतःच्या घरातले एअरबेड्स भाड्यानं द्यायला सुरुवात केल्यानंतर जवळजवळ सहा वर्षांनी. सन २०१५ ते २०१६ या काळात एअरबीएनबीचं उत्पन्न तब्बल ऐंशी टक्क्यांनी वाढलं आणि २०१८मध्ये त्यांना वीस कोटी डॉलरचा नफा झाला. मात्र, त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांना ३२.२० कोटी डॉलरचा तोटाही झाला.

एअरबीएनबीची आजची स्थिती
कोरोना साथीमुळे पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला. त्यांच्या बुकिंग्जमध्ये ४१ ते ९६ टक्के घट झाली. त्यामुळे त्यांनी १९०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकायचा (अमेरिकेतल्या एकूण कर्मचारी संख्येच्या २५ टक्के) निर्णय घेतला. त्यांनी आपल्या अंतर्गत मूल्यांकनातही ३१ अब्ज डॉलरवरून २६ अब्ज डॉलरपर्यंत घट करायचा निर्णय घेतला आणि प्राथमिक समभागविक्रीची (आयपीओ) योजनाही लांबणीवर टाकली. 

नोव्हेंबर २०२०मध्ये कंपनीनं प्राथमिक समभागविक्रीची घोषणा केली. आयपीओमुळे कंपनीचं मूल्यांकन तब्बल शंभर अब्ज डॉलर झालं आणि हा आयपीओ सर्वांत मोठ्या आयपीओंपैकी एक ठरला.

Edited By - Prashant Patil