अनुभव ‘वंदे भारत मिशन’चा

Vande-Matram-Mission
Vande-Matram-Mission

लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेल्या हजारो भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारने ‘वंदे भारत मिशन’ हाती घेतले. त्यानुसार भारतीय वकिलातीतील आणि ‘एअर इंडिया’चे कर्मचारी, डॉक्‍टर, पोलिस यंत्रणा, सरकारी अधिकारी, विमानतळावरील कर्मचारी अशा अनेकांनी केलेले अथक प्रयत्न पाहून मन भरून आले. अमेरिका ते मुंबई प्रवासाचा हा अनुभव.

मी अमेरिकेत तीन मार्चला पोहोचले आणि चार मार्चला ‘कोरोना’ प्रकरणाला तेथे सुरुवात झाली. माझे परतीचे तिकीट सात मेचे होते, परंतु भारतात २५ मार्चपासूनच लॉकडाउन चालू झाला. ते संपण्याची लक्षणे दिसेनात. त्यामुळे माझे सात तारखेचे तिकीटही रद्द झाले. सर्वच अनिश्‍चित होते. आता भारतात परत कशी जाणार याची काळजी पडली. तशी मला राहण्याची काळजी नव्हती. कारण मी मुलीकडे होते. पण तिचा व्हिसा संपत आला होता.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्यामुळे काय करावे असा विचार आणि चिंता करत होते. तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘वंदे भारत मिशन’ जाहीर केले. या योजनेअंतर्गत परदेशांत अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणणार, अशी बातमी वाचली. त्यामुळे आशेचा एक किरण दिसला. वकिलातीमार्फत फॉर्म भरला आणि त्यांचे त्वरित उत्तर आले. तरीपण धडधड होतीच, कारण ड्रॉ पद्धतीने नंबर काढणार होते. पण नशिबाने साथ दिली. 

सात मे रोजी वकिलातीमधून फोन आला की भारतात जाण्याच्या यादीत तुमचे नाव आहे. तुमची यायची तयारी आहे ना? पण तेव्हा हे माहित नव्हते की किती तारखेला जावे लागेल. त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता मेल आला की नऊ मे रोजी रात्री अकरा वाजता सॅनफ्रान्सिस्को-इंडिया असे विमान आहे आणि येणार असाल तर सात वाजेपर्यंत कळवा. त्यावेळी मी सिएटलमध्ये राहत होते. तेथून सॅनफ्रॅन्सिस्कोला आम्ही दुपारी बारा वाजता पोचलो. सर्व विमानतळ रिकामा होता. संध्याकाळी सहानंतर अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागांतून सुमारे तीनशे लोक विमानतळावर आले. ‘एअर इंडिया’च्या कर्मचाऱ्यांनी सहा वाजल्यापासून प्रवाशांचे थर्मल चेकिंग करायला सुरुवात केली. विमानात तीनशे प्रवासी होते. प्रत्येकाची काहीतरी अडचण होती. काहीजणांचे सहा महिने संपले होते, तरी लॉकडाउनमुळे परत जाता आले नव्हते. काही जणी गर्भवती होत्या. बरेच विद्यार्थी होते. तर काही आया माझ्यासारख्या! सर्वजण घरी जाण्यासाठी उत्सुक, पण त्यामुळे विमानात सोशल डिस्टन्सिंग ठेवणे अवघड होते. त्यामुळे सर्वजण मास्क आणि हॅन्ड ग्लोव्हज घालून स्वतःची काळजी घेत होते. विमानात बोर्डिंग करताना परत प्रत्येक प्रवाशाचे थर्मल चेकिंग झाले. ‘एअर इंडिया’ने आधीच सांगितल्याप्रमाणे जेवण आणि स्नॅक्‍स असे कोरडे पदार्थ जे दोन वेळा जेवणासाठी वापरता येतील, असे पॅकेट प्रत्येक सीटवर ठेवले होते.

त्याचप्रमाणे मास्क, सॅनिटायझरची बाटली आणि पाण्याच्या दोन बाटल्या होत्या. थोडी गैरसोय होणार होती, तरी प्रत्येक जण आपल्या देशात जायला मिळणार या आनंदात होता. वकिलातीमधील सर्व कर्मचारी, डॉक्‍टर, ‘एअर इंडिया’चे कर्मचारी, पोलिस यंत्रणा, सरकारी अधिकारी एकाच ध्येयाने प्रेरित होऊन काम करत होते. आपली माणसे घरी कशी नेता येतील यासाठी झटत होते.

सुमारे १८ तासांचा प्रवास करून आम्ही मुंबईत उतरलो. आता पुढील दिव्य- प्रत्येकाला विलगीकरणात राहायला लागणार होते. प्रत्येक जण पुढे काय होणार या विचारात होता. मुंबईत उतरल्यावर तेथे पंधरा दिवस राहायला लागणार आणि मग आपापल्या गावी जायला मिळणार आणि तेही जाता येईल काय? सर्व रस्ते बंद असतील तर कसे जाणार? असे प्रश्नांचे डोंगर होते. इमिग्रेशनचे शिक्के पासपोर्टवर मारून बाहेर आलो आणि आश्‍चर्याचा सुखद धक्का बसला. तेथे पहाटे पाच वाजता पोलिस स्वागताला उभे होते.

परत तेथे सर्वांचे थर्मल चेकिंग झाले आणि ‘आरोग्य सेतू’ ॲप प्रत्येक प्रवाशाने डाउनलोड केले आहे की नाही याची तपासणी झाली. इमारतीबाहेर पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, अमरावती, जळगाव, सोलापूर, सांगली, सातारा अशा वेगवेगळ्या शहरांची नावे घातलेले फलक घेऊन आणि त्याठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची यादी घेऊन पोलिस उभे होते. या गावांना जाणाऱ्या प्रवाशांसाठी बसची सोय केली होती. त्यामुळे आमच्या अडचणी दूर झाल्या.

बसची सुविधा नसती तर प्रत्येकाला आपल्या गावी जायची सोय स्वतःच करावी लागली असती. प्रत्येकाला आपल्या गावी जाऊन विलगीकरणात राहायचे आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे सर्वांनाच आनंदाचा धक्का बसला. आपापल्या गावी जाऊन विलगीकरणात राहणे म्हणजे टेन्शनच गेले. तेथेही विलगीकरण करण्यासाठी सर्व सुविधांनी युक्त अशा हॉटेलची निवड केली होती. अशा तऱ्हेने आमचा प्रवास सुखद झाला. या सर्व मोहिमेसाठी लागलेले मदतीचे हात होते. मग ते म्हणजे ‘एअर इंडिया’चे कर्मचारी असोत, विमानतळावरील कर्मचारी असोत, आपल्या वकिलातीमधील लोक असोत, पोलिस असोत, आम्हाला घेऊन जाणारे एसटीचे कर्मचारी असोत, सरकारी अधिकारी असोत, वा डॉक्‍टर असोत. या सर्वांच्या सहकार्यामुळे आम्हाला कोणताही त्रास झाला नाही. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. 

‘वंदे भारत मिशन’द्वारे इतर परदेशस्थ लोकांनाही आपापल्या घरी यायला मिळो ही सदिच्छा. परदेशात अडकलेल्या आपल्या देशातील लोकांना मायदेशी परत आणण्याची ही तळमळ, त्यासाठी केलेले अथक प्रयत्न पाहून मन भरून आले आणि भारतीय असल्याचा सार्थ अभिमान वाटला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com