‘मिलेनिअल्स’ म्हणजे काय रे भाऊ?

अशोक जावळे
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

देशातील आर्थिक मंदीला मिलेनिअल्सचा माइंडसेट कारणीभूत आहे, असा दावा काही दिवसांपूर्वी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्यानंतर त्यावरून एकच काहूर उठले होते. या विषयावर सोशल मीडियात एवढी चर्चा झाली की #Millennials, #BoycottMillennials असे अनेक हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडमध्ये होते. मिलेनिअल्सच्या बाजूने आणि विरोधात ट्‌विट्‌स, जोक्‍स आणि मिम्सचा पाऊस पडत असताना दुसरीकडे मिलेनिअल्स हा शब्दप्रयोग अनेकांच्या ‘डोक्‍यावरून’ जात होता. त्यामुळे मिलेनिअल्स म्हणजे नक्की काय भानगड आहे, हे समजून घेण्यासाठी हा खटाटोप...

वेगवेगळ्या काळातील पिढ्यांना नावे देण्याची पाश्‍चिमात्य जगात पद्धत आहे. प्रत्येक पिढीवर त्या काळातील विशिष्ट आर्थिक, सामाजिक व राजकीय बाबींचा प्रभाव असतो. त्या वेळच्या आव्हानांचा, संकटांचा आणि नव्या संधींचा सामना करताना त्या त्या काळातील पिढीची स्वतःची काही स्वभाववैशिष्ट्ये तयार होत गेली. याच वैशिष्ट्यांच्या आधारे पिढ्यांचे नामकरण करण्याची पद्धत साधारणपणे विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात सुरू झाली. मग त्यातूनच बेबी बूमर, जनरेशन एक्‍स, मिलेनिअल्स असे पिढ्यांचे नामकरण झाले.

अशी ओळखा पिढी... 
कुठल्याही गोष्टीचा खोलात जाऊन अभ्यास करण्याचा पाश्‍चिमात्यांचा आवडता छंद आहे. त्यातूनच मागील वर्षी अमेरिकेतील एका संशोधन संस्थेने कोण कुठल्या पिढीचा सदस्य आहे, हे चटकन ध्यानात यावे म्हणून एक ठोकताळा प्रसिद्ध केला होता. त्याचा सार थोडक्‍यात असा...

तुम्ही नक्की कुठल्या पिढीतले? 
लॉस्ट जनरेशन

१८८३ ते १९०० या काळात जन्मलेल्या पिढीला लॉस्ट जनरेशन म्हटले जाते. पहिले महायुद्ध आणि त्याचे परिणाम भोगायला लागलेल्या या पिढीतील कोणी व्यक्ती सध्या जिवंत असण्याची शक्‍यता कमीच आहे.

ग्रेटेस्ट जनरेशन
१९०१ ते १९२७ या काळात जन्मलेल्या पिढीला ग्रेटेस्ट जनरेशन म्हटले जाते. हे दुसऱ्या महायुद्धाचे साक्षीदार. काही महत्त्वाचे वैज्ञानिक शोध या पिढीच्या काळात लागले आहेत.

सायलेंट जनरेशन 
१९२८ ते १९४५ या काळात जन्मलेल्या पिढीचे नामकरण सायलेंट जनरेशन असे करण्यात आले. त्यांना दुसरे महायुद्ध आणि आर्थिक मंदीचे चटके सहन करावे लागले. त्याचबरोबर या पिढीने ५० आणि ६० च्या दशकातील उत्कर्षाचा काळही अनुभवला.

बेबी बूमर्स 
आधीच्या पिढीच्या तुलनेत मुलांना जन्म देण्याचे प्रमाण या पिढीत वाढलेले होते. त्यामुळेच १९४६ ते १९६४ या काळात जन्मलेल्यांना बेबी बूमर्स संबोधले जाते. थोडक्‍यात काय तर, सध्याच्या मिलेनिअल्सच्या आजी-आजोबांच्या वयाची पिढी यात मोडते.

जनरेशन एक्‍स 
साधारणपणे १९६५ ते १९८०च्या दरम्यान जन्मलेल्या पिढीला जनरेशन एक्‍स म्हटले जाते. सध्याच्या मिलेनिअल्सच्या मम्मी-पप्पांची अर्थात थिएटरमध्ये जाऊन ‘शोले’ पिक्‍चर पाहून आलेल्यांची ही पिढी. 

मिलेनिअल्स 
जनरेशन-वाय म्हणूनही या पिढीला ओळखले जाते. १९८१ ते १९९६ या काळात जन्मलेल्यांना बिनधास्तपणे मिलेनिअल्स म्हणा, त्यांना आनंद वाटेल. फेसबुकपासून यू-ट्यूबपर्यंत अनेक गोष्टींचा बिनधास्त वापर करणारी ही पिढी. इंटरनेटच्या युगाचे हे खऱ्या अर्थाने लाभार्थी म्हणावे लागतील. 

पोस्ट-मिलेनिअल्स 
१९९७ ते २०१२च्या दरम्यान जन्मलेली ही ‘बाळं’ तशी सर्वच अर्थाने नशिबवान ठरली. त्यांना जनरेशन-झेड असेही म्हटले जाते. यांच्या हातात थेट स्मार्टफोन आला, फास्ट इंटनेट आले. थोडक्‍यात, उठता-बसता टिकटॉक वापरणाऱ्यांची ही पिढी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article ashok jawale on millennials