नाममुद्रा : बुमरा नावाचे अस्त्र

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी भारताने अफगाणिस्तान संघाचा 11 धावांनी पराभव केला. क्रिकेट विक्रमांच्या पुस्तकात याची दखल घेतली जाईल; पण त्यासाठी झालेली झुंज, गोलंदाजांनी केलेली शिकस्त लक्षात घेतली जाणारी.

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी भारताने अफगाणिस्तान संघाचा 11 धावांनी पराभव केला. क्रिकेट विक्रमांच्या पुस्तकात याची दखल घेतली जाईल; पण त्यासाठी झालेली झुंज, गोलंदाजांनी केलेली शिकस्त लक्षात घेतली जाणारी. सामना भारताने जिंकला असला, तरी त्यासाठी अफगाणिस्तानने त्यांना झुंजवले. युद्धातील खऱ्याखुऱ्या बॉंबवर क्रिकेटचे धडे गिरवल्याचे अफगाणिस्तानच्या या कालच्या कामगिरीवरून सिद्ध होते. त्यांनी विजय मिळविताना भारतीय संघाच्या तोंडाला फेस आणला होता. त्या वेळी भारतीय संघ हरला, असेच वाटू लागले होते; पण भारतीय क्रिकेट संघाच्या मदतीला धावून आला तो जसप्रित बुमरा. त्याने आपल्या भात्यातील यॉर्कर या अस्त्राचा सुदर्शन चक्रासारखा वापर केला. त्याने अफगाणिस्तान फलंदाजांवर निर्णायक क्षणी यॉर्करचा असा काही मारा केला, की त्यात अफगाणिस्तानची धडपड संपुष्टात आली.

पर्याय असलेले गोलंदाज अपयशी झाले की कुठलाही कर्णधार हतबल होतो; पण कोहलीचे तसे होत नाही. तो अभिमानाने सांगतो माझ्याकडे बुमरा आहे की ! अफगाणिस्तानचा संघ जेव्हा धावांसाठी उतावीळ होता, तेव्हा भारतीय संघ विकेटसाठी. त्याचवेळी कोहलीने बुमरा नावाचे अस्त्र बाहेर काढले. त्याच्या गोलंदाजीवर पायचीतचे अपीलही झाले; पण ते फेटाळले गेले. बुमरा डगमगला नाही. त्याने यॉर्करमागून यॉर्कर अफगाणिस्तान संघावर सोडायला सुरवात केली. त्याचा परिणाम हवा तोच झाला. प्रथम रहमत शाह गेला, दोन चेंडूंनतर शाहिदी देकील गेला. तेव्हा कोहलीच नाही, तर तमाम भारतीय चाहते एकसुरात ओरडले असतील, की आमच्याकडे बुमरा आहे ना. अफगाणिस्तानचे फलंदाज फिरकी गोलंदाजी सहज खेळून गेले; पण बुमराचा सामना करताना त्यांनादेखील दिवसा तारे दिसले असतील.

भारताच्या विजयाच्या आड उभा असलेल्या महंमद नाबीने एक हूक मारल्यावर बुमरादेखील चवताळून उठला. त्यानंतर त्याने केलेले यॉर्करचे प्रात्यक्षिक हे प्रत्येक संघाने आपल्या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात दाखवावे असेच होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सध्या तीनशे धावा काहीच नाहीत. अशावेळी सव्वादोनशे धावांचा बचाव करताना बुमराने केलेली गोलंदाजी नक्कीच एकदिवसीय क्रिकेटमधील एक लक्षणीय उदाहरण ठरली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article on Cricketer Jasprit Bumrah