चीनचे दुटप्पी राजकारण

Chin
Chin

चीन हा कोणत्याही देशाचा मित्र नाही
लक्ष विचलित करण्यासाठी चीनचा आटापिटा
चीनसमोर सध्या असंख्य अडचणी

सक्षम शत्रूशी युद्ध करायचे असेल तर योग्य संधी साधली पाहिजे, हा युद्धाचा एक सिद्धांत आहे. याच सिद्धांतावर सध्या चीनची रणनीती सुरू आहे. चीनचा इतिहास आहे की, या देशाने आपल्या सीमेला लागून असलेल्या इतर देशांवर त्याच्या सोयीनुसार वेळ साधून आक्रमण केले आहे. आता चीनने हीच भूमिका भारताबरोबर घेतली आहे. चीनसमोर सध्या अनेक अडचणी आहेत. यातील पहिली समस्या म्हणजे अवतीभवती असलेल्या २२ देशांसमवेत चीनचे बिघडलेले संबंध. यातील केवळ उत्तर कोरिया आणि पाकिस्तानबरोबरच चीनचे संबंध ठीक आहेत. परंतु, चीनचा या दोन्ही देशांवर विश्वास नाही, तर उर्वरित राष्ट्रांबरोबर चीनचे नेहमीच वाकडे राहिले आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास या वाईट संबंधाचा परिणाम चीनवर होऊ शकतो.

दुसरी सर्वांत मोठी अडचण आहे, ती अमेरिकेचा चीनवरील अविश्वास. हाँगकाँग येथील युवावर्गाचा चीनच्या सत्तेविरोधात असलेला आक्रोश आणि तैवानला ताब्यात घेण्यासाठीच्या कारणांमुळे चीनवर सध्या दबाव निर्माण झाला आहे. चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात सत्तापरिवर्तनाची मागणी करण्यात आली. या सर्व दबावाचे लक्ष विचलित करण्यासाठी चीनने आता भारताबरोबरच्या सीमाविवादकडे मोर्चा वळविला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जगभरात कोरोनाने सहा लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेसारख्या देशात आत्तापर्यंत एक लाख वीस हजार नागरिकांचा बळी गेला आहे. याला एक प्रकारे जैविक युद्धच म्हणावे लागेल. हा संसर्ग जगभरात चीनमुळे पसरला असून, संपूर्ण जगाचा चीनवर दबाव निर्माण झाला आहे. हा दबाव कमी करण्यासाठी आज चीनने ही चाल खेळली आहे.

समोरचा देश कमकुवत असताना चीनने त्यांच्या देशाची सीमा निश्‍चित केल्याचा इतिहास आहे. भारत सध्या कोरोनाशी झुंजत आहे. यामुळे अर्थव्यवस्थेलाही फटका बसत आहे. हीच वेळ साधून चीनने भारतीय सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण केले आहे. या परिस्थितीत सीमेवरील जागा दुसऱ्या देशाकडे गेली, तर त्या देशातील नागरिकांचा सत्ताधारी पक्षाविरुद्ध आक्रोश वाढेल. त्यातून त्यांच्यावर दबाव निर्माण होईल. चीनच्या वर्तमान सत्ताधीशांवरही अशाच प्रकारचा दबाव निर्माण झाला आहे. एक असुरक्षित राजकीय नेतृत्वाद्वारे नेहमीच चुकीचे निर्णय घेतले जातात, हे चीनने सिद्ध केले आहे.

युद्ध टाळायचे असेल तर आधी युद्धासाठी तयार होणे गरजेचे असते. पण, जर तुम्ही युद्धासाठी सक्षम नसाल तर ते तुमच्यावर लादले जाईल. मग त्या वेळी युद्धाची जागा आणि वेळ दोन्ही तुमच्या सोयीची नसेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात आत्तापर्यंत १८ बैठका झाल्या होत्या. त्यामुळे दोन्ही देशांचे संबंध चांगले असल्याचे चित्र होते. पण, चीनकडून दुटप्पी राजकारणाचा खेळ खेळला जातोय आणि भारतासाठी हे धोक्‍याचे आहे. त्यामुळे भारताने आता आर्थिक तसेच संरक्षण यंत्रणा सक्षम केल्या पाहिजेत. तसेच, चीनभोवती असलेल्या देशांशी संपर्क साधून त्यांना आपल्याबरोबर घेण्याची नीती आखायला हवी. यामध्ये इंडोनेशिया, थायलंड, जपान, व्हिएतनामसारखे देश आहेत. तर, चीनमधील युवावर्गाच्या सरकारविरोधातील रागाचा वापर कसा करता येईल, यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. तसेच, जगातही चीनविरुद्ध मानसिकता तयार केली पाहिजे. 
(शब्दांकन - अक्षता पवार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com