स्तन्य, अन्य आणि तारतम्य

Baby-and-mother
Baby-and-mother

आरोग्य एक ऑगस्टपासून पाळण्यात येणाऱ्या स्तन्यपान सप्ताहानिमित्त याविषयाच्या एका दुर्लक्षित; पण महत्त्वाच्या पैलूवर टाकलेला दृष्टिक्षेप.

आईचे दूध हे बाळासाठी अमृत असते! ‘माँ का दूध’ प्यायलेल्या मुलाचे उत्तम भरणपोषण होत असते, यात शंका नाही. पूर्वतयारी, शिक्षण, सकारात्मक दृष्टिकोन, वेळ,  डॉक्‍टरी आणि सरकारी धोरणे अशी सगळी गुंतवणूक केली, तर त्यावर मिळणारा घसघशीत लाभांश म्हणजे यशस्वी स्तन्यपान.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्तन्यपान सर्वोत्तमच. ‘हिरकणी कक्ष’ हवेतच. पण त्यालाही काही सन्मान्य अपवाद आपण मान्य करायला हवेत. सर्वच्या सर्व आयांनी, सर्वच्या सर्व बाळांना, किमान सहा महिने फक्त आणि फक्त अंगावरचे दूध द्यायला हवे; या सामान्यज्ञानाला काही अटी-शर्ती लागू करण्याची वेळ आली आहे. मुळात असा सरसकट सल्ला देताना त्या आईचे मत नि कुवत (शारीरिक आणि आर्थिक) लक्षात घेतली जात नाही. कित्येक आयांना परिस्थितीमुळे पुन्हा नोकरी/शिक्षण सुरू ठेवणे भाग असतं. स्तन्यपानाची महती सांगताना स्तनपान न देऊ शकणाऱ्या स्त्रियांच्या मनात अपराधगंड निर्माण होतो. बाळाला सुविहित आहार देणे, ही जबाबदारी सर्वांची असते. काही कारणांनी बाळाला स्तन्य पाजणे शक्‍य नसेल, तर अन्य काही पाजण्यास मुभा आहे, हा संदेश ठळक करायला हवा. मुलाला अंगावर न पाजणे हादेखील वैयक्तिक निर्णय असू शकतो. अशा निर्णयाला कोणतीही मूल्यपट्टी लावायला नको. 

...नाहीतर उपाशी!
जन्मतः कमी वजन असलेली बाळे,  कमी दिवसांची बाळे, एका वेळी खूप कमी दूध घेऊ शकतात. भोकाडसुद्धा पसरण्याची ताकद नसते त्यांची. नीट लुचून ओढण्याची शक्ती नसते. त्यांना तासा- दोन तासाला पाजावे लागते.  तीन ते चार महिने असे करावे लागते. हे दमवणूक करणारे काम आहे. इथे स्तन्य आणि ते शक्‍य न झाल्यास डॉक्‍टरी सल्ल्याने अन्य हे पर्याय आहेत. ‘पाजीन तर छातीशी, नाहीतर उपाशी’ हे धोरण योग्य नाही. बाळ तृप्त असणे महत्त्वाचे; मग त्याला पावडरचे दूध द्यावे लागले तरी बेहत्तर.

सांगणे सोपे, करणे अवघड 
जी गोष्ट कमी वजनाच्या बाळांची तीच पैलवान बाळांची. आईला मधुमेह असेल तर प्रश्न आणखी बिकट होतो. अशा बाळांना सतत कडकडून भूक लागते आणि वेळेत भूक नाही भागवली तर यांची साखर अचानक कमी होते. अशा बाळांना आवश्‍यक तेव्हा वरचे दूध द्यायला हवे. दुग्धचक्र सुरू होईपर्यंत तर नक्कीच द्यायला हवे. अगदी नॉर्मल वजनाच्या बाळांनासुद्धा जन्मतः भूक तर लागते, दुधाची तर गरज असतेच, मात्र ते पुरेशा प्रमाणात येत मात्र नाही; हा नेहमीचा अनुभव. यावर आम्हा डॉक्‍टरांचे पढीक उत्तर, ‘जेवढे येतंय तेवढं पुरतंय!!’ पुरेसे दुध येण्यासाठी वेळ लागतो. बाळाने सतत अंगावर लुचत राहणे हा दूध येण्यासाठीचा सर्वात स्ट्राँग स्टिमुलस आहे. पण ‘दर दोन तासांनी बाळाला पाजा’, असे सांगणे सोपे आहे, करणे अवघड. मुळातच थकलेली ती नवप्रसवा जागरण करून रडकुंडीला येते. नीट जमत नाहीये, असे वाटून निराश होते. न्यूनगंड वाटायला लागतो. त्यामुळे उलट दूध आटते. इतरही सामाजिक किंवा वैद्यकीय कारणांनी आया कावलेल्या असतात. त्यात दूध न मिळाल्याने बाळाला काही व्हायला लागले की प्रश्न आणखी बिकट होतात. जंगी पूर्वतयारी करूनही बऱ्याच आयांना सुरवातीला नाही येत पुरेसे दूध. यात त्यांचा काय दोष? त्यांच्या बाळांचा काय दोष?

निव्वळ स्तन्यपानाच्या हट्टापायी बाळ कळत-नकळत उपाशीही ठेवले जाते. उपाशी, अतृप्त बाळाला काय काय व्हायला लागते. ते मलूल होते.  त्याच्या रक्तातली साखर उतरते, सोडियम वाढते, झटके येतात. मेंदूवर दुष्परिणाम होतात. स्तन्यपानाचा अनाठायी आग्रह दुराग्रह ठरु शकतो तो असा. स्तन्यपानालाच सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवेच ; पण ‘पावडरचे दूध’ का (अचानक रक्तातली साखर कमी झाल्यामुळे बाळाला) ‘शिरेवाटे ग्लुकोज’?; अशी दुविधा असेल, तर पावडरचे दूध द्यायला काय हरकत आहे?

दुग्धपेढ्यांचा पर्याय
सुरुवातीच्या या अडचणींची, मातांच्या कष्टाची जाणीव आपल्या परंपरेला आहे. ‘ओली दाई’, गाई-म्हशीचे दुध असे पर्याय परंपरेत आहेत. गाई-म्हशीच्या दुधापेक्षा पावडरचे दूध हे आईच्या दुधाशी मिळतेजुळते असते. त्यातील घटक तोलूनमापून, पारखून, निर्जंतुक करून घातलेले असतात. त्यामुळे आईच्या दुधानंतर याचा नंबर लागतो. बाळाला पावडरचे दूध दिल्याने त्रास होतो तो दूध पावडरपेक्षा; पावडर-पाण्याच्या चुकीच्या प्रमाणामुळे आणि अशुद्ध पाण्यामुळे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याबाबत आपण बरीच प्रगती केली आहे, तेव्हा योग्य प्रमाणात आणि कडक स्वच्छता पाळून बनवलेलं पावडरचं दूध हा चांगला पर्याय आहे. जिथे असतील तिथे दुग्धपेढ्या हाही एक पर्याय आहे.

सुष्टचक्र
दूध निर्माण होणे, पान्हा फुटणे वगैरे क्रिया नैसर्गिक असल्या, तरी हे चक्र सुरू व्हायला वेळ लागू शकतो आणि अशावेळी बाळाला उपाशी ठेवणे धोक्‍याचेच. एकदा हे चक्र सुरू झाले, की हे सुष्टचक्र फिरते ठेवणे खूप सोपे असते. एकदा हे झाले की वरचे दूध बंद करायला हवे. याविषयी आधीपासून आईचे, कुटुंबाचे शिक्षण, शंकानिवारण महत्त्वाचे ठरते. पावडरच्या दुधाची जाहिरातबाजी करणारी बाजारधार्जिणी धोरणे वाईटच; पण ‘आईचे दूध अमृत आहे, म्हणजे पावडरचे दूध विष’, हे समीकरण बरोबर नाही. प्रसंगोपात ‘अमृततुल्य’ आहे असं म्हणू आपण. प्रत्येक स्त्रीच्या, कुटुंबाच्या इच्छेनुसार, कुवतीनुसार आणि बाळाच्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा. प्रयत्नपूर्वक स्तन्य; डॉक्‍टरी सल्ल्यानेच, आपत्काली अन्य; अशी दोन्हीची तारतम्याने सांगड घालण्यात साऱ्यांचे सौख्य सामावले आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com