लोकांत रमलेला व्रती पत्रकार

Anant-Dixit
Anant-Dixit

ज्येष्ठ पत्रकार व ‘सकाळ’चे माजी संपादक अनंत दीक्षित यांचे सोमवारी निधन झाले. सुहृदाने त्यांना वाहिलेली श्रद्धांजली.

‘ज्येष्ठ पत्रकार’ नि ‘संपादक’ या औपचारिक चौकटीत न मावणारे गृहस्थ म्हणजे अनंत दीक्षित. त्यांच्या पत्रकारितेतील मोठा टप्पा ‘सकाळ’मधील होता. किंबहुना ‘सकाळ’ आणि दीक्षित हे अद्वैत होतं. बार्शीसारख्या छोट्या गावातून पदवीधर होऊन स्वत:च्या पायावर उभं राहण्याच्या आकांक्षेने दीक्षित पत्रकारितेच्या क्षेत्रात आलेले. या क्षेत्रातील पदवी नसताना हा माणूस इतका यशस्वी कसा, याचा मी विचार करतो, तेव्हा लक्षात येतं की पत्रकारिता ही वृत्ती आहे. ती वृत्ती, चौकसपणा दीक्षितांमध्ये पुरेपूर होता. ते समाज संवेदी होते. संपादकाला आपल्या आवृत्तीचा नुसता भूगोल माहीत असून चालत नाही. इतिहास, परंपरा, स्थानिक बलस्थानं माहिती हवीत; तसेच नर्मबिंदूही, याची नेमकी जाण त्यांना असल्याचे कोल्हापूर ‘सकाळ’मधील त्यांची कारकीर्द जवळून पाहताना नेहेमी जाणवे. नंतर पुण्यातही तशाच समरसतेने त्यांनी 
काम केले.

सर्व थरांतल्या माणसांचं मोहोळ या माणसाचं आकर्षण केंद्र.  मराठी चित्रपटसृष्टीत सूर्यकांत नि चंद्रकांत म्हणजे खरेच सूर्य, चंद्र. चंद्रकांत मांडरे अभिनेते होते तसे चित्रकारही. त्यांनी आपलं सर्वस्व समाजाला समर्पित करायचं ठरलं तर दीक्षित त्या पालखीचे भोई होऊन ‘चंद्रकांत मांडरे कलादालन’ होईपर्यंत झटले. पुढे त्याचे विश्‍वस्तही झाले. कोल्हापूर कलापूर म्हणून ओळखण्याचा आज हा आरसाच बनला आहे.  

माणसाला लिहितं करणं हा दीक्षित यांचा छंद. ‘खाली जमीन, वर आकाश’, ‘चाकाची खुर्ची’, ‘प्रकाशरंग’ या आत्मचरित्रांनी मराठीतील वंचित साहित्यात मोलाची भर घातली, त्याचे श्रेय दीक्षितांनाच जाते. दीक्षितांच्या काळात ‘सकाळ’ वर्धापन दिन, ना. भि परुळेकर जयंती आदी निमित्तांनी गुलजार, नौशाद ऐकायला मिळाले. या उभयतांचा आणि दीक्षितांचा स्नेह अकृत्रिम. गुलजारांनी ‘धागे’ सदर दीक्षितांच्या आग्रहामुळे ‘सकाळ’साठी लिहिलं. ते हिंदीत लिहित. मी मराठीत भाषांतर करायचो.

वाचकांना वाटायचे, गुलजार मुंबईत येऊन मराठीपण लिहू लागले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘नाचा’ गणपत पाटील व्यक्‍तिगत जीवनात फार मोठं संघर्षशील व्यक्‍तिमत्त्व होतं, हे त्यांच्या लेखनातून मराठी माणसास कळालं. त्याचा पाठपुरावा दीक्षितांचा होता. शिल्पकार रवींद्र मिस्त्री, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, ढोलकी वादक यासीन म्हाब्री, बाटली आडवी करणाऱ्या पार्वती माळी, बत्तीवाले सासने, जमाल गोलंदाज, आर. बी. कांबळे असा साऱ्या सामान्य, असामान्यांचा फेर धरत दीक्षितांनी वाचकांशी नाळ जोडली. त्यांना अनाथ, अपंग, देवदासींचं जसं दु:ख कळायचं तसं गुऱ्हाळकरी, उद्योगपती, सूतगिरणीवाले, ऊसतोड कामगार सर्वांच्या व्यथा वेदनांचं त्यांना भान होतं. लोकप्रतिनिधी, मंडळे, उत्सव समिती, शासकीय अधिकारी यांच्यात दीक्षित जितके सहज असायचे तितकेच छत्रपती, मंत्री, मुख्यमंत्री यांच्याबरोबर.

दीक्षितांनी कुणाकडून कधी काही अपेक्षिलं नाही. उलटपक्षी या रुग्णास मदत हवी, अशी ते सार्वजनिक आवाहनं करत राहिले आणि आव्हानं पेलतही. १९८९च्या पुरात दीक्षितांची धावपळ पंचगंगा, वारणा, कोयना, वेदगंगा, दूधगंगा, कृष्णा पार करत राहायची.त्यांना जनामनावर गारुड करता आलं, ते लेखन व वक्‍तृत्वाच्या जोरावर. ललितमधुर व विचारप्रणवता यांचा सुरेख संगम त्यांच्या लेखणी आणि वाणीत असायचा. सर्वत्र व्याख्यानांसाठी त्यांना मागणी असे. त्यांनी देवानंदची घेतलेली मुलाखत हे मराठीतलं प्रसिद्ध गद्यकाव्य झालं. महिला, दलित, मजूर अशा उपेक्षितांचं अंतरंग जाणण्याचा एक उपजत संवेदी पाझर या पत्रकाराकडे होता. राजकारण नि समाजकारणाची समान जाण नि शांत, संयत तरी परखड असं त्यांच्या राजकीय विश्‍लेषणाचं स्वरूप असायचं. त्यांनी लिहिलेले अग्रलेख मोरपिसाची मलमल असायची शब्दांगांनी. विचाराच्या अंगांनी मानवी स्पर्श असायचा.

कन्येच्या लेखनाचा प्रकाशन समारंभ त्यांच्या आयुष्यातला शेवटचा सार्वजनिक समारंभ. मी नाही जाऊ शकलो. फोन आला. भेटून जा एकदा. गेल्यावर आपलं सारं लेखन माझ्या हवाली करत म्हणाले, हे अपूर्ण आहे... हातात किती वेळ आहे, माहीत नाही. तुम्ही याचं काय करायचं पहा. आम्हा सर्वांना नुकताच त्यांनी जीव पिळवटून टाकणारा निरोप पाठवला होता. `क्षीणता वाढली आहे. वाचन अशक्‍य झाले आहे. मेंदूला ओझे पेलत नाही. विचार करण्याची सवय असलेल्याला हे अडचणीचे खरे!

लोकांमधली उठबस संपल्याचे शल्य टोकदार आहे.’ सर्व पत्रकार, संपादक, लोकप्रतिनिधी... सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनी काय शिकायचं, तर लोकांचं असायचं आणि लोकांत रहायचं... लोकांचं व्हायचं आणि लोकांचं करायचं! ते न करता जगणं जिवंत मरण असतं खरं!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com