सारांश : सात पेपरचा गृहपाठ अन्‌ शत प्रतिशत यश

श्रीमंत माने
Friday, 24 May 2019

प्रांतनिहाय रूचणारे मुद्दे, त्याद्वारे मतदारांच्या मानसिकतेला हात घालत मुद्दांची मांडणी यावर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी भर दिला. त्यासाठी त्यांनी खूप बारकाईने तयारी केली, मुद्दे पुढे करणे आणि त्याद्वारे मते वळवण्यावर त्यांचा भर होता. 

सतराव्या लोकसभेसाठी मतदानाचे सात टप्पे हे जणू परीक्षेचे सात वेगवेगळे पेपर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पाच वर्षे मन लावून अभ्यास केलाच; पण परीक्षेवेळीही प्रत्येक प्रश्‍नपत्रिकेचा गृहपाठही रात्र-रात्र जागून केला. कोणत्या टप्प्यावर प्रचारात काय बोलायचे, कोणते मुद्दे चर्चेत आणायचे, कुणाला लक्ष्य करायचे याचे नियोजन केले. वेगवेगळ्या टापूशी संबंधित मुद्दे ठरवले. ही डावपेचाची पोतडीद्वारे विरोधकांवर हल्ले चढवले. साडेतीनशे जागा हे त्या गृहपाठाचे यशच. 

लोकसभा निवडणुकीची गाडी ईशान्य आणि दक्षिण दिशेने उत्तरेकडे निघाली. पूर्व, पश्‍चिम कवेत घेत ती हिंदीभाषिक पट्ट्यांकडे सरकताना प्रचाराचे मुद्दे, टीकेचा रोख बदलले. प्रचाराचा प्रारंभ झाला. 14 फेब्रुवारीचा पुलवामा येथील दहशतवादी हल्ला, प्रत्युत्तरादाखल हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये एअरस्ट्राईक केला. त्यानंतर पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय वैमानिकाची सुटका आणि सुरू झालेली "घुस के मारा'ची भाषा. सातही टप्प्यांमध्ये ती ऐकायला मिळाली. पण, त्या ध्वनीची तीव्रता कमीअधिक होत राहिली. त्याची जागा नव्या मुद्यांनीही घेतली. 

मोदी-शहांच्या प्रचारधोरणाचे दोन ठळक टप्पे होते. पहिला साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरना उमेदवारीचा आणि दुसरा राजीव गांधींचा मुद्दा प्रचारात आणण्याचा. भोपाळ मतदारसंघात दहशतवादाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञासिंहांची उमेदवारी जाहीर करण्यासाठी तिसऱ्या टप्प्यानंतरचा मुहूर्त शोधला. कारण, तोपर्यंत कट्टर हिंदुत्ववादाला थारा नसलेल्या दक्षिण भारतातील मतदान जवळजवळ संपले होते. तमिळनाडूच्या सर्व जागांसाठी (39) 18 एप्रिलच्या दुसऱ्या टप्प्यात तर कर्नाटकमधील अठ्ठावीसपैकी प्रत्येकी चौदा जागांचे दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांमध्ये मतदान झाले. केरळच्या सर्व जागांवर तिसऱ्या टप्प्यात मतदान झाले. 

सहावा, सातवा टप्पा शिल्लक असताना अचानक राजीव गांधी भ्रष्टाचारी नंबर वन ठरले. दोन दिवसांनी त्यांनी सोनिया-राहुल-प्रियांका आणि अन्य आप्तेष्ट, मित्रांसह नौदलाच्या युद्धनौकेवर पार्टी केल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. स्वाभाविकपणे 1984 मधील शिख नरसंहार आणि त्यासाठीचा राजीव गांधींवर ठपका आला. राजीव अचानक प्रचारात अवतरण्याचे खरे कारण होते, दिल्ली, हरयाणा, पंजाब वगैरे शिखबहुल प्रांतांमधील मतदान. 

उत्तर प्रदेशचा पूर्व भाग किंवा बिहारमध्ये जातीपातींची गणिते प्रभावी आहेत. मागास जातीसमुदाय सजग आहेत. तेथे मोदींच्या भाषणात आपण कसे मागास आहोत, तरीही त्याची पर्वा करीत नाही, सगळ्यांनाच पुढे घेऊन जाण्याची कशी इच्छा आहे, वगैरे मुद्दे प्राधान्याने आले. महाराष्ट्रात 11 ते 29 एप्रिल असे चार टप्प्यांमध्ये मतदान झाले. महाराष्ट्रातील प्रचारातही मोदींची भाषणे त्या भागाच्या परिस्थितीला अनुसरून होती. वर्धा व लातूरच्या सभेत त्यांनी शरद पवारांवर टीका केली.

काका-पुतण्यामधील कथित वाद भाषणात आला. साहजिकच अजित आणि शरद पवार यांच्याकडून प्रत्युत्तर आले. पश्‍चिम व उत्तर महाराष्ट्रात पवारांचा प्रभाव अधिक आहे. तेथे अशी टीका बुमरॅंग होण्याची शक्‍यता दिसताच नंतरच्या प्रचारसभांमध्ये मोदींनी पवारांवरील टीका आवरती घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article on Loksabha Result Seven Papers Home Work