रामकथा देशोदेशीची...

रवि आमले
गुरुवार, 2 एप्रिल 2020

रामायणाचा वारसा हा भारतीयांप्रमाणेच भारताबाहेरील काही देशांनाही लाभलेला आहे. तेथेदेखील हजारो वर्षे रामकथा गायली जात आहे. या देशांमध्ये प्रामुख्याने श्रीलंका, थायलंड, तिबेट, इंडोनेशिया, मलाया यांचा समावेश होतो. आजच्या (ता. २ एप्रिल) रामनवमीच्या निमित्ताने ही देशोदेशीची रामकथा...

रामायणाचा वारसा हा भारतीयांप्रमाणेच भारताबाहेरील काही देशांनाही लाभलेला आहे. तेथेदेखील हजारो वर्षे रामकथा गायली जात आहे. या देशांमध्ये प्रामुख्याने श्रीलंका, थायलंड, तिबेट, इंडोनेशिया, मलाया यांचा समावेश होतो. आजच्या (ता. २ एप्रिल) रामनवमीच्या निमित्ताने ही देशोदेशीची रामकथा...

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यंदाच्या रामनवमीला वेगळे परिमाण लाभलेले आहे, ते म्हणजे अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीचे, त्याबाबतच्या निर्णयाचे. तेथे होणाऱ्या भव्य मंदिरात रामलल्ला विराजमान होणार आहेत. हे प्रभू रामचंद्रांचे बालरूप. भारतीय मानसावर मोहिनी आहे ती मर्यादापुरुषोत्तम रामचंद्रांची. राम हा येथल्या संस्कृतीचा पाया बनून उभा आहे आणि तोच या संस्कृतीचे शिखरही आहे. हिंदुस्थानीच नव्हे, तर पश्‍चिम आशियातील संस्कृतीवर या ना त्या रूपाने या देवत्वास प्राप्त झालेल्या पुरुषोत्तमाने आपली छाप उमटविलेली आहे. पाच-सहा हजार वर्षांपासून ही कथा देशोदेशी, मनामनांत रुजली आहे. 

रघुवंशातील चौतीसावे राजे जे प्रभू रामचंद्र त्यांच्या चौसष्ट वर्षांच्या जीवनकालाच्या अद्भूतरम्य कहाणीतून व्यक्ती व समाज या दोन्हींपुढे आदर्श प्रस्थापण्याचा प्रयत्न करणारा सर्वांत महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे वाल्मिकी रामायण. हे मूळ रामायण मानले जाते. काही अभ्यासकांच्या मते, येथील प्राचीन समाजात रामकथा आधीपासूनच होती. अगदी ऋग्वेदातही राम, सीता, दशरथ यांचे उल्लेख आहेत. तेथे सीता ही पृथ्वीची देवता आहे. पारशांचा झेंद अवेस्ता हा धर्मग्रंथ इ.स.पू. दोन हजार वर्षांचा असून, त्यात राम हवस्त्र (रामस्तोत्र) आहे. ही रामकथा लोकमानसात होतीच. या लोककथेला वाल्मिकींसारख्या महाकवीचा परिसस्पर्श झाला व तिचे रूपांतर महाकाव्यात झाले, असे मानले जाते. 

भारताबाहेरील रामायणे
रामायणाचा वारसा हा भारतीयांप्रमाणेच भारताबाहेरील काही देशांनाही आहे. तेथेही हजारो वर्षे रामकथा गायली जात आहे. या देशांमध्ये प्रामुख्याने श्रीलंका, थायलंड, तिबेट, इंडोनेशिया, मलाया यांचा समावेश होतो. 

इंडोनेशिया - मुस्लिम बहुसंख्य (८७ टक्के) व हिंदूंचे प्रमाण दोन टक्के असलेल्या या देशातील जावा बेटात ९ व्या शतकात रामकथेवर आधारित रामायण ‘काकावीन’ हे लिहिले गेले. त्याचे रचनाकार योगीश्वर असल्याचे मानले जाते. त्याची भाषा कावी असून, ‘काकावीन’चा अर्थ महाकाव्य होतो. त्यातील महाराज दशरथ हे शैव मताचे आहेत. इंडोनेशियातील बाली बेटावरही संस्कृतमधील ५० श्‍लोकांची संक्षिप्त रामकथा सांगितली जाते. 

थायलंड - या देशात तेराव्या शतकापासून रामकथा सांगितली जाते; मात्र रामकथेवर आधारित साहित्य तेथे आढळते ते अठराव्या शतकापासून. येथील राजाने थाई भाषेत छंदोबद्ध रामायण - रामकियेन - लिहून घेतले. ते चार खंडांत आहे. यानंतर १७८२-१८०९ या कालखंडात तेथील सम्राट राम प्रथम यांनी आणखी एका रामायणाचे लेखन करवून घेतले. त्यात १४,३०० श्‍लोक आहेत. हे विशाल रामायण रामलीलेसम नाटक सादर करण्यास उपयुक्त नसल्याने त्याच्यानंतर आलेल्या राम द्वितीय याने संक्षिप्त रामायण लिहून घेतले. त्यानंतर राम चतुर्थ या सम्राटाने स्वतः पद्यमय रामायणाची निर्मिती केली. 

कांपुचिया - या देशातील रामायण ख्मेर भाषेत असून, रामकेर्ति वा रिआमकेर या नावाने ते ओळखले जाते. या रामायणातील राम हा नारायणाचा अवतार असून, त्याला बोधिसत्व उपाधी दिलेली आहे. यात रामाच्या पुत्रांचे नाव राम, लक्ष्मण आणि जप लक्ष्मण असे आहे. 

लाओस - या देशातील लाओ जातीचे लोक स्वतःस भारतीय वंशाचे मानतात. येथे अनेक रामायणे लिहिलेली असून, त्यातील फ्रलक-फ्रलाम, ख्वाय थोरफी, पोम्मचक या रामकथा उल्लेखनीय आहेत. फ्रलक-फ्रलाम हे रामजातक असून, त्याचा अर्थ ‘प्रिय लक्ष्मण प्रिय राम’ असा होतो. हे रामजातक दोन भागांचे असून, त्यातील एकात दशरथकन्या चंदा आणि दुसऱ्यात सीता यांच्या अपहरणाची कथा आहे. यात रावण हा सीतेचा पिता असल्याचे म्हटले आहे. 

म्यानमार - रामवत्थु, राम सा-ख्यान, सीता रा-कान, राम रा-कान, पुंटो राम प्रजात अशी विविध रामायणे येथे लोकप्रिय आहेत. रामवत्थु हे त्यातील सर्वांत जुने व लोकप्रिय रामायण. त्याची कथा बौद्ध धर्माच्या धारणांना अनुकूल अशी मांडण्यात आली आहे. मात्र त्यातील सर्व पात्रांचे चरित्र वाल्मीकींना अनुसरून करण्यात आले आहे. यात शूर्पणखेचे नाव गांबी, तिची मुले खर व दूषण यांची नावे सरू आणि तुशीन, सुग्रीवाचे नाव थुगइक अशी देण्यात आली आहेत. मायावी मृगाचे रूप शूर्पणखेनेच घेतले होते, असे या रामायणाचे म्हणणे आहे. 

तिबेट - तिबेटी लोकांना प्राचीन काळापासून वाल्मीकी रामायण माहीत आहे. त्याच्या आधारेच येथील ‘किंरस-पुंस-पा की’ ही रामकथा रचण्यात आलेली आहे. यात सीता ही रावणाची कन्या मानलेली आहे. 

चीन - या देशात स्वतंत्र असे रामायण लिहिले गेलेले नसले, तरी तेथील त्रिपिटक या बौद्ध धर्मग्रंथाच्या चिनी आवृत्तीत रामकथेशी संबंधित ‘अनामकं जातकम’ आणि ‘दशरथ कथानम’ या दोन रचना आढळतात. यातील अनामकं जातकम्‌मध्ये रामायणातील पात्रांचा थेट नामोल्लेख नाही. दशरथ कथानम्‌मध्ये रामाचे नाव लोमो आणि लक्ष्मणाचे लो-मन असे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article ravi amale on shriram story