विषाणूने पाडलेली फूट

CoronaVirus
CoronaVirus

कोरोनाच्या साथीवरील सर्व चर्चेची विभागणी आता विविध विचारसरणींत झाली आहे. या संकटाचाही भाजप नेते संकुचित राजकीय स्वार्थ साधण्यासाठी उपयोग करीत आहेत. सध्या तरी यावर कोणाचे नियंत्रण नाही.

विषाणूला धर्म असतो का? त्याला विचारसरणी असते का? हायड्रोक्सिक्लोरोक्विनला राजकीय महत्त्वाकांक्षा असेल काय? दुर्दैवाने या सर्व प्रश्नांना ‘हो’ असे उत्तर आहे. यातून आपल्या दृष्टिकोनातच विष असल्याचे अधोरेखित होत आहे. संपूर्ण जगभरात आणि आता भारतातही कोरोनाविरुद्धच्या लढाईत विस्कळीतपणा का आहे, याचे उत्तर हेच आहे. पहिल्या लॉकडाउनची अंमलबजावणी एकभावनेने झाल्यानंतर नंतरच्या इतर लॉकडाउनची विभागणी सत्ताधारी आणि विरोधक, केंद्र आणि बिगर भाजपशासित राज्ये यांच्यात झाली. सध्या संकटाशी सामना करण्यावर सर्व लक्ष केंद्रित करणे गरजेचे असतानाही आंधळेपणाने किंवा इतर भावनेने राजकीय कुरघोडींना प्राधान्य दिले जावे, हे निराशाजनक आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संसर्गाचा संबंध तबलिगी जमातीशी जोडल्यावर आपल्याकडे विषाणूला धर्म मिळाला. परिस्थिती हाताळणीत अपयशी ठरलेल्या गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनीही राज्यात संसर्ग पसरण्याचा संबंध तबलिगी जमातीशी जोडला होता. आता तबलिगी परिषदेला तीन महिने उलटून गेले असून, संसर्ग वीसपटींनी पसरला आहे. आता कोणी तबलिगी समाजाचे नावही घेत नाही. अर्थात, नांदेडहून पंजाबात परतलेल्या शीख भाविकांमध्ये बाधित आढळल्यावर विषाणूला धर्म नव्हे, तर धार्मिक परिषदा आवडतात, असे सिद्ध झाले.

जागतिक साथीच्या अनुषंगाने लॉकडाउन ते वैद्यकीय चाचण्या, संसर्ग ते मृत्युसंख्या अशा वादविवादांमधील चर्चा विचारसरणींमध्ये विभागली गेली होती. तुम्ही नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प, बोरिस जॉन्सन यांचे चाहते असाल, या नेत्यांनी काहीही चूक केलेली नाही. या नेत्यांचे तुम्ही विरोधक असाल, तर हे नेते शेकडो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत आहेत. साथ लवकरच निघून जाईल, या तज्ज्ञांच्या अंदाजावर चाहत्यांचा विश्वास असतो. तर, भारतासह जगभरात लाखो लोक मरतील, या भाकितावर विरोधक बोट ठेवतात. 

मला ‘हिंदू’च्या अग्रलेखातील एक वाक्य पुरेपूर पटले. ‘कोरोनानंतरच्या जगावर संभ्रमाचे आधिपत्य असून, यापासून कोणतीही संस्था अथवा प्रक्रिया अस्पर्शित राहिलेली नाही. त्यामुळे याबाबतचे कोणतेही संशोधन हे राजकारणापासून अलिप्त आहे, असे म्हणण्याचे धाडस कोणी करू नये,’ असे त्यात म्हटले होते. याचा अर्थ काय काढायचा? सगळ्याच गोष्टींचे राजकारण झाले आहे का? ही साथ कशी पसरली? याला उत्तर द्यायचे तर प्रतिप्रश्न करावा लागेल. राजकारण कधीही संपणारे नाही. मात्र, तुम्ही पक्षीय निष्ठा बाजूला ठेवून काही गोष्टी तज्ज्ञांच्या आणि सैनिकांच्या भरवशावर सोडून द्यायला हव्यात.

सरकारी पत्रकार परिषदेत जनतेला आवश्यक तेवढी माहिती दिली जात नाही. मी याबाबत तक्रारही केली आहे. पण, तरीही त्यांच्यावर सतत टीका करणेही उपयुक्त नाही. ही पत्रकार परिषद घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळे पाहा, तुम्हाला त्यांच्यावरच्या जबाबदारीची जाणीव होईल. 

सध्याची परिस्थिती अशी आहे, की जरासे दुर्लक्ष घातक ठरू शकते. मोदी सरकारला प्रश्न विचारू नका, असे मी सांगत असल्याचा माझ्यावर आरोप होण्याआधीच मी काही सांगतो. अमित शहा यांच्यासह इतर भाजपनेते ज्या वेळी कोरोना संकटाचा उपयोग विरोधकांना डिवचण्यासाठी, सत्ताबदल करण्यासाठी करतील, त्या वेळी ते राजकीय स्वार्थ साधत असल्याचे स्पष्ट आहे. राजकारण करण्याचा परिणाम समोर आहे. सध्यातरी हे संकट कोणाच्याही नियंत्रणात नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विषाणूचाही केलाय फुटबॉल
मलेरियाविरोधात वापरल्या जात असलेल्या आणि तरीही प्रकाशझोतापासून दूर असलेल्या हायड्रोक्सिक्लोरोक्विनबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे. पण, ट्रम्प या औषधाची मात्रा सांगतात काय आणि नरेंद्र मोदी त्याचे वाटप करतात काय, या औषधाचा पार राजकीय फुटबॉल झाला आहे. याचाच परिणाम म्हणून एचसीक्यू हे नजीकच्या काळात सर्वाधिक संशोधन केले गेलेले औषध ठरले. हे सर्व संशोधन घाईघाईने होत असून, त्याचा उद्देश अनेकदा चालू राजकारणाला पाठबळ देण्याइतपत राहिला आहे. या राजकारणाला ‘लँसेन्ट’सारखे नियतकालिकही बळी पडले.

(अनुवाद : सारंग खानापूरकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com