उपेक्षित कष्टकरी अन असहाय्य भारत

Worker
Worker

लॉकडाउनच्या काळात जे लाखो गरीब घरवापसी करीत आहेत, त्यात भारताची महत्त्वाकांक्षी नवी पीढी, कष्टकरी वर्ग आहे. त्यांच्या भवितव्याचा विचार करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार अपयशी ठरले आहे. आपण कामकरी गटाचा विचार ‘पांढरपेशे’ आणि ‘श्रमजीवी’ अशा दोन गटात करतो. हे गट कामाच्या स्वरूपावरुन ठरविले जातात. पण सध्या देशातील महामार्गांवर जे वेदनादायी नाट्य दिसत आहे, त्यातून आपल्याला ज्या तिसऱ्या गटाच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आहे, तो आहे कष्टकरी वर्ग. त्याला आपण उपेक्षित कष्टकरी म्हणूयात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हा कष्टकरी वर्गाला उपेक्षित का म्हणायचे असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल तर तुम्हाला दररोज दिसणारे, तुमचे जीवन सुखकर, सुरक्षित बनविण्यात हातभार लावणाऱ्यांकडे पाहा. वीटभट्टीवर विटांचा भार उचलणारे, ट्रकमधून सिमेंट व अवजड पोलाद चढविणारे- उतरविणारे, बांधकामावर काम करणारे, आपल्या कपड्यांवर इस्त्री करुन देणारे, आपल्या बागेची मशागत करणारे, रिक्षा हाकत आपले ओझे वाहणारे, आपले केसांना कात्री लावून योग्य वळण योग्य देणारे, गल्लीतील हलवायाच्या दुकानात सामोसे आणि जिलबी तळणारे असे कितीतरी लोकांशी आपला रोज संपर्क येत असतो. शर्ट घालून काम करताना त्यांना तुम्ही कितीवेळा पाहिले आहे? त्यांच्या कामात शर्ट अडथळा ठरत असल्याने ते कायम बनियन किंवा फाटक्या टी शर्टवरच काम करताना कायम दिसतात. ते शर्टाविना असले म्हणून त्यांचे काम दुय्मम किंवा कमी महत्त्वाचे ठरत नाही.

अखेर दखल घेतली
या कष्टकऱ्यांशिवाय आपण काही करू शकत नाही. इस्त्रीवाला, माळी, रद्दीवाला या सर्वांची उणीव आपल्याला जाणवत आहे. तिसऱ्या टप्प्यातील हे कामकरी आत्तापर्यंत आपल्यासाठी जणू अदृश्‍यच होते. पण अन्य दोन गटांपेक्षा या गटातील कामकऱ्यांची संख्या सर्वांत जास्त आहे. आपण त्यांची दखल घेत नव्हतो कारण ते सुद्धा आपल्या आयुष्याशी समरस झाले आहेत.

आपण त्यांना गृहित धरले आहे आणि आणखी एक कारण म्हणजे ते मूकपणे त्यांचे काम करीत होते. पण ते आता बोलू लागले असून त्यांचे अस्तित्व दाखवून देत आहेत. हाच कष्टकरी वर्ग सध्या घराकडे परत निघाला आहे. अनेकांबरोबर मुलेबाळे आहेत. आग्र्याजवळ तर एक चिमुकला तर सुटकेला लटकलेला होता. काही जणांनी त्यांच्या वृद्ध मातापित्यांना खांद्यावर उचलले होते. काही महिलांची प्रसूति रस्त्यावरच झाली. काही मजूर अपघात व आजारी पडल्याने मरण पावले.  

ओळखण्यात चूक
हा हरविलेला भारतीय कष्टकरी वर्गाचा शोध लागल्यानंतर एक चांगली गोष्ट घडत आहे , ती म्हणजे त्यांनी मदत करण्याची आपल्याला इच्छा आहे. पण वाईट गोष्ट म्हणजे आपण अजूनही चूक करीत आहोत. ते कोण आहेत, हेच आपल्याला कळत नाही. हे खूप गरीब आहेत, असे आपण म्हणू. ते भुकेले, निराधार, बेरोजगार आहेत. कमाई नाही, पायात चपला नाही, अशा अवस्थेत अनवाणी चालणारी ती गरीब जनता आहे. ते कशाचाही विचार न करता, भीतीमुळे घराकडे पळ काढत आहेत. पण शहरात आपण सुरक्षित आहोत, हा विचार करणारेच शहाणे आहेत, अशी आपली धारणा असेल तर ती चुकीची आहे. त्यांना मदत करण्याची आपली पद्धतही वाईट आहे.

अन्नाची पाकिटे वाटणे, जुने कपडे देणे, त्यांच्याबद्दलचे दुःख सोशल मीडियावर शेअर करणे हेच आपण करीत आहोत. पण जर या कष्टकऱ्यांना थांबवून त्यांच्याशी बोलून ते शहरात काय करीत होते, त्यातून त्यांना किती पैसा मिळत होता, हे विचारले तर आपण चुकीचा विचार करीत असल्याचे लक्षात येईल. जे कामगार ट्रकमध्ये माल भरणे व उतरविण्यासारखी कामे करतात ते दिवसाला ५०० ते १००० रुपये कमावतात. मात्र कामाचे तास आठच असतील असे नाही. पण यासाठी तो किंवा ती शहरात आलेली नसते.

सामूहिक मानखंडना 
या कष्टकऱ्यांची वर्गवारी दुर्दैवाने ‘अकुशल कामगार’अशी केली जाते. कोणीही प्रशिक्षण अथवा कौशल्य आत्मसात केले तर टेलर, नाभिक, गवंडी आणि असे अनेक जण जास्त कमवतात. ते तशा अर्थाने कंगाल, भुकेले किंवा निराधार नाहीत. तीन वेळा जेवण मिळू शकेल, एवढे ते नक्कीच सुदैवी आहेत. त्यांच्यापैकी बहुतेक जण उपाशी आहेत, म्हणून गाव सोडत नाहीत तर चांगले आयुष्य जगण्याच्या आशेने ते शहरात येतात. पश्‍चिम बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, झारखंड आणि पश्‍चिम बंगालमधून येणारे स्थलांतरित केवळ भूक, वंचित आणि दारिद्र्य या पासून सुटका व्हावी म्हणून शहरात येत नाहीत. मग का येतात या प्रश्‍नावर ‘माझ्या कुटुंबाचे, मुलांचे आणि माझे जीवनमान उंचावण्यासाठी’, ‘कमाईतील बचत साठवून घरी पाठवण्यासाठी जेणे करून मुले चांगल्या शाळेत जाऊ शकतील,’ अशी उत्तरे मिळतील. हे जे लाखो जण घराकडे जात आहेत, ते भिक्षेकरी नाहीत. ती महत्त्वाकांक्षी  नवी पिढी आहे, भारतातील कामकरी वर्ग आहे, ज्यांच्या अभिमान आणि स्वाभिमान सध्या चिरडण्याचे काम केले जात आहे. गेल्या अनेक दशकांतील भारतातील ही सर्वांत मोठी सामूहिक मानखंडना आहे.

मोदी सरकारला इशारा
नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकारकारसाठी हे नुकसानकारक आहे. चेंडू आपल्या हातातून निसटला आहे, याची कल्पना त्यांना आहे. देशातील सर्व कानाकोपऱ्यातून विशेषतः सरकारची मतपेढी असलेल्या हिंदी ‘हार्टलँड’मधून त्यांच्यविरोधात प्रतिमा उभी राहत आहे, बोलले जात आहे. या कष्टकऱ्यांना बँक खात्यात थोडसे पैसे अन तातडीची मदत हवी आहे, असा ग्रह सरकारचा झाला. पण तडकाफडकी, धक्कादायक आणि आश्‍चर्यकारकरित्या जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे या लाखो लोकांचे जीवन उदध्वस्त होईल, याकडे सरकारने लक्ष दिले नाही. त्यांच्या भवितव्याचा विचार करण्यात सरकार अपयशी ठरले. या लॉकडाउनचा जो खेळ ‘लुटन्स’मधील नोकरशाहीने खेळला त्यात हे उपेक्षित कष्टकरी लिंबूटिंबू ठरले.
(अनुवाद - मंजूषा कुलकर्णी) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com