ही तर बेरोजगारांसाठी संधी!

Worker
Worker

‘कोरोना’मुळे स्थलांतरित कामगार आपापल्या राज्यांत परत गेल्याने ते करत असलेली वेगवेगळी गृहोपयोगी कामे कोण करणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा वेळी आपल्याकडील बेरोजगार तरुणांनी आवश्‍यक कौशल्ये शिकून घेऊन ही कामे सुरू केल्यास अनेक प्रश्‍न सुटू शकतील.

गेल्या दोन महिन्यांत ‘कोरोना’ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. भारतात लॉकडाउनची घोषणा झाल्यावर ‘कोरोना’पेक्षा जास्त चर्चा स्थलांतरित कामगारांच्या प्रश्नांवर होत आहे. हे स्थलांतरित कामगार आता आपल्या दूरदूरच्या राज्यांतील घरी परत जायच्या मार्गावर आहेत. आता खरा प्रश्न भेडसावत आहे की त्यांची कामे कोण करणार? आमच्या नवीन घरात काम करणारे सुतार उत्तर प्रदेशाचे, प्लंबर ओडिशाचे, तर रंगारी बिहारमधील आहेत. ( ‘होते’ असे म्हणावे लागेल. कारण लॉकडाउनची घोषणा होण्याआधीच निघून गेले होते.) काम फक्त ४-५ दिवसांचे उरले आहे. पण लॉकडाउनमुळे तसेही ठप्प झाले आहे. आता आमच्यापुढे प्रश्र आहे, की हे काम कधी व कसे पूर्ण होईल? आम्ही नवीन घरात गुढी पाडव्याच्या  मुहूर्तावर राहायला जाणार होतो, पण आता दसराच उजाडेल असे दिसते.

हे स्थलांतरित कामगार परत येईपर्यंत आपल्या बऱ्याच कामांत अडथळे उद्भवणार आहेत. आमचे उदाहरण फारच गौण आहे. पूर्वी माझ्या लहानपणी (१९६०-७०) रंगारी, प्लंबर, वायरमन, सुतार, तसेच ड्रायव्हर, भाजीवाले, घरगडी वगैरे कामांसाठी आमच्या, किंबहुना सर्वांच्याच घरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चरितार्थासाठी आलेली मराठी कामगार मंडळी असत.

हळूहळू लक्षातही आले नाही, पण आमची पिढी मोठी होताना इतर राज्यांतून आलेल्या स्थलांतरित कामगारांनी ही कामे करायला सुरुवात केली होती. मराठी माणूस हळूहळू अशा कामांतून बाहेर पडला. मराठी माणसाची नवीन पिढी सरकारी नोकरीच्या आमिषाने ही कामे विसरली. किंबहुना ही कामे परप्रांतीयांकडे सोपवून इतर नोकऱ्यांची वाट पाहात, असलेला कामधंदा न शिकता / करता, बेरोजगार म्हणून ही पिढी नाक्‍यांवर उभी राहताना दिसते. परप्रांतीयांना ‘मराठी माणसाची कामे हिरावून घेऊन वर आले’, वगैरे टोमणे मारताना ती दिसते.

आता स्थलांतरित कामगार परत गेले, तर त्यांच्या जागी मराठी बेरोजगार माणसांना त्यांची सुतारकाम, वायरमन, प्लंबर, घरबांधकाम मजूर, गवंडीकाम, अगदी स्वयंपाकी, शिवणकाम, बागकाम, केशकर्तनालय वगैरे कामे दुसरा कोणताही अपेक्षित नोकरी-धंदा मिळेपर्यंत किंवा कायमस्वरूपीही करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. यातील काही उद्योगांसाठी विशेष कौशल्याचा सराव गरजेचा आहे. त्यामुळे लगेच नाही, पण सुरुवातीला शिकून, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सराव करून कालांतराने ते ही कामे करू शकतील. तसेच यापैकी कित्येक जण व्यवसाय उद्योजक म्हणून स्वतः नेटवर्किंग समूहाची सुरुवात करू शकतील. नेटवर्किंग समूहाची ताकद ओळखून त्यानुसार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरांतच नव्हे, तर इतरत्रही निर्माण झालेल्या त्रुटी अशा विविध कुशल कामगारांचा पुरवठा करून भरून काढता येतील. वाढत्या बेरोजगारीवर हा एक तोडगा आहे.

शालेय अभ्यासक्रमात ‘जीवनावश्‍यक कामे’, तसेच ‘आयटीआय’सारखे व्यावसायिक प्रशिक्षण हा विषय सक्तीचा केला, तर लहानपणापासून विद्यार्थी नकळत घरातील नळाचा वॉशर बदलणे, खिळे ठोकणे, दिवे बदलणे, फ्युज बदलणे, रंग लावणे, शिवणकाम करणे, स्वयंपाक करणे वगैरे जीवनावश्‍यक कामे करू शकतात. कोरियातील माझ्या सधन उच्चशिक्षित मित्र-मैत्रिणी अशी घरातील बेसिक कामे त्यांच्याकडील वेगवेगळ्या साधनांच्या पेटीचा वापर करून करताना पाहिले होते. अगदी खूपच गंभीर गोष्टीसाठी त्यातील तज्ज्ञ माणसाला ते बोलवतात.

लॉकडाउनच्या काळात अनेक मित्र-मैत्रिणींशी फोनवर बोलताना आपल्याला अशी गृहोपयोगी कामे येत नसल्याने व ती करणारी माणसे येऊ शकत नसल्याने किती त्रास होतो आहे, असा सूर आढळला. ‘कोरोना’मुळे सर्वांना बसलेले असे विविध धक्के हे नंतर काय बदलू शकू? असा विचार करायला प्रवृत्त करतात.

अशा वेळी मराठी माणसाला विविध क्षेत्रांतील प्रशिक्षण घेऊन स्थलांतरित कामगारांची कामे करून बेरोजगारीवर मात करता येईल. इतर देशांत प्रामुख्याने आढळणारी तरुणांनी करायची सक्तीची सैनिकीसेवा भारतात नाही, पण त्याऐवजी ‘आयटीआय’सारखी बेसिक व्यावसायिक गृहोपयोगी शैक्षणिक सेवा सक्तीची केल्यास स्वावलंबी समाज तयार होऊन कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी सिद्ध राहील. ‘कोरोना’ने दिलेली ही जीवन सुधारणा करण्याची ही सुवर्णसंधी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com