अहिंसक क्रांतीची ‘नई तालीम’

Mahatma-Gandhi
Mahatma-Gandhi

समाजातील सर्व प्रकारच्या विषमतेला मूठमाती देत प्रत्येकाला सर्वांगीण विकासाची समान संधी देणाऱ्या, लोकहितैषी शिक्षणावर महात्मा गांधींनी भर दिला. महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शिक्षणविचारांचा मागोवा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गांधीजींच्या शिक्षणविचारांबद्दल चर्चा करायची ती यासाठी, की ज्या प्रकारचा समाज आपण घडवू इच्छितो त्यानुरूप शिक्षणाची रचना करावी लागते. १९३७मध्ये वर्धा शिक्षण परिषदेत गांधीजींनी बुनियादी शिक्षणाचा विचार देशासमोर मांडला. ज्यात डॉ. झाकीर हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली बुनियादी तालीमचा पाठ्यक्रम बनवण्यासाठी समिती स्थापली. गांधीजींची ‘नई तालीम’ शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीचे ध्येय बाळगणारी आहे.  मन, बुद्धी, शरीर यांच्या संतुलित आणि सुसंवादित्व साधणारी जीवनकेंद्री शिक्षणपद्धती आहे. सद्गुणांचा सर्वोत्तम विकास व जबाबदार नागरिकत्वाची जडणघडण यावर भर देते. बालकांच्या नैसर्गिक कृतीशील प्रेरणांचा विचार करते. जीवनोपयोगी हस्तोद्योगास केंद्रस्थानी ठेवत विविध विषयांच्या क्षमतांचा समवाय साधत शिकणे यात अभिप्रेत आहे. 

मातृभाषेतून शिक्षण
दक्षिण आफ्रिकेतील प्रयोगांच्या आधारे गांधीजींना हस्तोद्योग हे शिकण्याचे उत्तम माध्यम होऊ शकेल, हे ध्यानात आले होते. शारीरिक काम आणि कौशल्ये यांचा शास्त्रीय ज्ञानाशी समन्वय घडवून परिश्रम व परिश्रमी दोघांनाही ज्ञानव्यवस्थेत सन्मानाचे स्थान गांधीजी देऊ इच्छित होते. ज्या देशात बहुसंख्य शेतकरी व श्रमिक आहेत, अशा देशात श्रमविन्मुख शिक्षण त्यांना स्वावलंबी जगण्यापासूनच नव्हे, तर त्यांच्या नैसर्गिक संसाधानांवरील नियंत्रणापासूनही दूर नेते; आत्मसन्मानाने जगण्यापासून दूर नेते. त्यामुळे असे जीवन व शिक्षण दोन्हीही नाकारले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. ज्ञानग्रहणाच्या निसर्ग, समाज आणि उद्योग या माध्यमांचा अध्ययन करीत विचारशील, चिकित्सक, नैतिक, निर्भय, परिश्रमी, सहयोगी, सहिष्णू, संयमी अशा व्यक्तित्वाची जडणघडण होणे ‘नई तालीम’मध्ये अपेक्षित आहे. कला, संगीत, खेळ, व्यायाम यांना यात स्थान आहे. मातृभाषेत शिक्षण हा मुलांचा अधिकार आहे ही त्यामागची तात्त्विक भूमिका आहे.

स्वच्छतेचा संस्कार
सर्वांना सक्तीचे व समान दर्जाचे शिक्षण मिळावे, हस्तोद्योग हा वैज्ञानिक दृष्टीकोनातून शिकवला/शिकला जावा या हेतूने विज्ञानासोबतच गणित, भूगोल, इतिहास, सामाजिक शास्त्रे इत्यादी विषय शिकवण्याची व्यवस्था या पाठ्यक्रमात केली गेली. स्वच्छताकार्य हा तर ‘नई तालीम’चा अनिवार्य भाग. तसेच धर्म, जात, लिंग, वर्ण, वंशनिरपेक्ष पद्धतीने कार्य येथे अपेक्षित आहे.

धर्मशिक्षणास यात जाणीवपूर्वक स्थान नाही. स्वकर्तव्यांची जाणीव हाच खरा धर्म आहे, असे ‘नई तालीम’मध्ये धर्मशिक्षणाबाबतचे मत विचारले असता गांधीजींनी स्पष्टपणे मांडले होते. शिक्षणावर सरकारऐवजी लोकांचे नियंत्रण असावे, हे म्हणत असताना सरकार सत्तेचा दुरूपयोग करून लोकांच्या स्वातंत्र्याचा संकोच करू शकते. ही त्यांची अनुभवाधारित भूमिका होती. धंदा म्हणून चालविलेल्या खासगी शाळा हा अर्थ गांधीजींना अजिबात अभिप्रेत नव्हता. किंबहुना अशा दबावातून मुक्त, आत्मभानाचे शिक्षण ‘नयी तालीम’च्या विद्यालयातून मिळावे, अशी त्यांची भूमिका होती. ‘नई तालीम’चे शास्त्र व विचार आचार्य विनोबांनी पुढे नेला, त्यावर प्रयोग केले. मार्गदर्शक लेखन केले. शिक्षकांनी समतेसाठी सदैव जागरूक व कर्तव्यदक्ष असावे, यासाठी आचार्यकुलाची स्थापना केली. 

स्वप्न नवसमाजाचे
स्वतंत्र भारताचे संविधान बनले. मात्र ज्या संविधानिक मूल्यांच्या आधारे समाज घडविण्यासाठी बद्ध आहोत, त्यासाठी आवश्‍यक संवेदनशील समाजमन घडले आहे काय? गरीब श्रीमंत यातील दरी अधिकाधिक वाढवणारी, बालकांवर अमानुष स्पर्धा लादणारी, विशिष्ट वर्गाच्या व विशिष्ट प्रकारच्या ज्ञानाला अग्रक्रम देणारी अशी आत्यंतिक स्तरीय रचना निर्माण करून आपण लोकशाही समाजवादी रचनेकडे कसे जाणार आहोत? यासाठी समाज व सरकार दोघांनाही कटिबद्ध व्हावे लागेल. आज डिजिटल तंत्रज्ञानाशिवाय सर्वांना उत्तम शिक्षण अशक्‍यच अशी भूमिका बळकट होताना दिसते. 

विविध पर्यायांचा विचार
अनेक जण विविध क्षेत्रात पर्याय शोधत आहेत. शेती, पाणी, उर्जा, स्वास्थ्य, वस्त्र, शिक्षण, पर्यावरण, जंगल व्यवस्थापन, लोकतांत्रिक कार्यपद्धती यासारख्या विभिन्न क्षेत्रात आधुनिक ज्ञानविज्ञानाची सांगड घालत पर्याय उभे करीत आहेत. मोठी धरणे, मोठे रस्ते, मोठे कारखाने काही प्रमाणात गरजेचे असतीलही. पण दैनंदिन गरजांची पूर्तता छोट्या आणि कुटीर उद्योगातून विकेंद्रित पद्धतीने होऊ शकेल, हा विश्वास अनेक प्रयोगांनी दिलाय. येता काळ लोकांना बळ देणारे, त्यांना रोजगारापासून वंचित न करताही त्यांचे कष्ट कमी करणारे, सृजनात्मकता वाढवणारे, विकेंद्रित, भौगोलिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या समुचित तंत्रज्ञान कसे असेल, या दिशेने संशोधनावर भर देणारा असावा. माणसाची कल्पनाशक्ती आणि संविधानिक मूल्यावर आधारित सर्वांच्या कल्याणाची तीव्र सामाजिक आस यातून नव्या रचना आपण उभ्या करू शकतो. एकेकट्याने प्रश्नांची सोडवणूक न करता समुहाने, सहकार्याने रचनात्मक प्रयोग व्हावेत. समतेची आस बाळगणारी नवी पिढी परंपरेतील जातीय व धार्मिक संकुचिततेच्या वर उठून वैज्ञानिक वृत्ती व विवेक जोपासत पर्यावरणीय आणि विषमतेच्या आव्हानाला भिडेल, स्वत:चे भविष्य सुरक्षित करीत नवसमाजाचे स्वप्न बघू शकेल, अशी आशा वाटते.

शिक्षकांच्या स्वायत्ततेचा सन्मान
तंत्रज्ञानाच्या वापरावरील नियंत्रणाचा, मुलांच्या बौद्धिक व भावनिक स्वातंत्र्याचा, स्वास्थ्याचा विचार करून तंत्रज्ञान आपण स्वीकारत आहोत ना, याची खात्री केली पाहिजे.हे तंत्र सर्वांना समन्यायी पद्धतीने मिळते का? यात शिक्षकांची स्वायत्तता, प्रतिभा यांचा सन्मान आहे का? आभासी शिक्षण व प्रत्यक्ष जमिनी स्तरावर बदल करण्याची क्षमता निर्माण करणारे जीवनशिक्षण यातील फरकही आपल्याला नेमका करता यायला हवा. 

(लेखिका सेवाग्राम येथे ‘नई तालिम समिती’च्या ‘आनंद निकेतन’ या शिक्षणसंस्थेच्या संचालक व प्राचार्य आहेत.)  

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com