श्रीलंकेतील शांततेला तडा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

श्रीलंकेतील परिस्थिती सामान्य होण्याविषयीच्या आशेला आणि विश्‍वासाला दहशतवादी हल्ल्याने तडा दिला आहे. दहशतवादाच्या संकटाचा एकत्रित मुकाबला परिणामकारक होण्याची गरज प्रकर्षाने समोर आली आहे. 

श्रीलंकेतील परिस्थिती सामान्य होण्याविषयीच्या आशेला आणि विश्‍वासाला दहशतवादी हल्ल्याने तडा दिला आहे. दहशतवादाच्या संकटाचा एकत्रित मुकाबला परिणामकारक होण्याची गरज प्रकर्षाने समोर आली आहे. 

जगभरातील ख्रिश्‍चन 'ईस्टर संडे'चा सोहळा आनंदाने साजरा करत असताना श्रीलंका बॉम्बस्फोटांनी हादरून गेली. राजधानी कोलंबोतील चर्च, तसेच काही अलिशान हॉटेलांत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत दोनशेहून अधिक निरपराध व्यक्ती हकनाक प्राणास मुकल्या. हे बॉम्बस्फोट इतके भीषण होते, की त्यामुळे एका प्राचीन चर्चचे छप्परच उडून गेले, तर अनेक मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत बघायची वेळ या चर्चमध्ये "ईस्टर संडे'चा मास सांगणाऱ्या धर्मगुरूंवर ओढविली. खरे तर "ईस्टर संडे' हा ख्रिश्‍चनांसाठी पवित्र दिवस असतो. "गुड फ्रायडे'च्या दिवशी क्रुसावर चढवलेल्या येशू ख्रिस्तांचा या दिवशी पुनर्जन्म झाला, असे मानले जाते. मात्र, हाच दिवस कोलंबोतील चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जमलेल्या लोकांसाठी घातवार ठरला. अमूर्त उद्दिष्टांसाठी निरपराध आणि बेसावध असलेल्या माणसांच्या जिवावर उठण्याचा दहशतवादाचा क्रूर चेहेरा या घटनेने पुन्हा जगासमोर आला. 

या हल्ल्याचा दिवस, हल्लेखोरांनी निवडलेले स्थळ आणि त्याची एकंदर व्याप्ती पाहता त्याचे नियोजन पद्धतशीररीत्या करण्यात आले असणार. ते एखाद-दुसऱ्या दिवसाचे काम नाही. अनेक दिवस चालू असणार. तरीही गुप्तचर यंत्रणांना त्याची कुणकुण लागू शकली नाही, हे मोठे अपयश आहे. हल्लेखोरांचे हेतू काय, कोणती संघटना-गट यामागे आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी ख्रिश्‍चन समुदायाला लक्ष्य करण्यात आले, हे उघड आहे. खरे तर अशा प्रकारच्या हल्ल्यानंतर त्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी दहशतवादी संघटना पुढे येतात, असा अनुभव आहे. मात्र, या साखळी बॉम्बस्फोटांनंतर त्याची जबाबदारी स्वीकारण्यास अद्याप एखादी संघटना पुढे आलेली नाही. त्यामुळे त्यांचे इरादे काय असावेत, याविषयी सखोल तपासानंतरच कल्पना येईल. मात्र, एक नक्की, की श्रीलंकाच नव्हे, तर जागतिक समुदायापुढे उभे ठाकलेले हे संकट आहे.
 
तमीळ व सिंहली यांच्यातील वांशिक संघर्षाच्या आवर्तात सापडलेल्या या देशात गेले दशकभर शांतता होती. त्याचे पर्यवसान पर्यटन उद्योगाच्या भरभराटीत झाले. पर्यटन हा श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेचा काश्‍मीरप्रमाणेच कणा आहे. त्यावरही घाव घालण्याचा हा प्रयत्न आहे, असे दिसते. याचे कारण त्या शांततेला, परिस्थिती सामान्य होण्याविषयीच्या आशेला आणि विश्‍वासालाच या हल्ल्याने तडा दिला आहे. हल्लेखोरांचा तोच हेतू असणार, हे उघड आहे. 

श्रीलंकेत 2014च्या अखेरीस झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मैत्रीपाल सिरीसेना अध्यक्षपदी निवडून आले होते आणि पदरी आलेल्या पराभवामुळे महेन्द्र राजपक्षे यांच्यासारखा बडा नेता कमालीचा अस्वस्थ आहे. आता काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीत अध्यक्षपद मिळवण्यासाठी राजपक्षे हे कमालीचे उत्सुक आहेत. या पार्श्‍वभूमीवर घडवून आणलेल्या या बॉम्बस्फोटांमुळे तेथील विद्यमान राजवट अस्थिर करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, असा प्रश्‍न चर्चेत आला आहे.
 
एकविसाव्या शतकाचा हा काळ. तो पुढे जात आहे; पण मूलतत्त्ववाद कमी होण्याऐवजी त्याचा अंधार अधिकाधिक गडद होत असताना दिसतो. हे केवळ आशिया-आफ्रिकेत नाही, तर युरोपातही घडते आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी न्यूझीलंडमध्ये ख्राईस्टचर्च येथे दोन मशिदींमध्ये शुक्रवारी मुस्लिमांच्या प्रार्थनादिनी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराने जवळपास 50 जण मृत्युमुखी पडले होते. श्रीलंकेत "ईस्टर संडे'च्या दिवशी झालेल्या या भीषण बॉम्बस्फोटांमागे "इसिस' ही संघटना असल्याचे वृत्त आधी पसरले; पण त्याला दुजोरा मिळाला नाही. नंतर अन्य एका संघटनेवर संशय असल्याचे सांगण्यात आले. परंतु या विषयी तर्कवितर्क करणे आणि त्या आधारे घाईने निष्कर्ष काढणे धोक्‍याचे आहे. एकूण परिस्थिती पाहता वांशिक वा धार्मिक संघर्षाचा नवा वणवा पेटू नये, हे पाहिले पाहिजे. तो धोका लक्षात घेऊनच पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी जनतेला कोणत्याही अफवांवर, तसेच सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या विखारी प्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. 

या बॉम्बस्फोटात कोलंबोतील भारतीय वकिलातीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत असून, ही वकिलात दहशतवाद्यांचे लक्ष्य असल्याची माहिती गुप्तचरांनी श्रीलंका सरकारला दहा दिवसांपूर्वी दिल्याचे कळते. एकूणच दहशतवादाच्या संकटाबाबत जराही गाफील राहणे भारतालादेखील परवडणारे नाही. बॉम्बस्फोट नेमके कोणी घडवून आणले, त्याचा तातडीने छडा लावायला हवा. दहशतवादाविरोधात जगभरातील शांतताप्रिय देशांनी एकत्र यायला हवे. जागतिक दहशतवादविरोधी लढ्याला एकसंध, परिणामकारक स्वरूप येणे किती गरजेचे आहे, याची प्रखर जाणीव या हल्ल्याने करून दिली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article write about terrorist attacks in Sri Lanka