डॉ. आंबेडकरांचे खास पत्र

Babasaheb-Ambedkar
Babasaheb-Ambedkar

डॉ. आंबेडकरांनी ‘जनता’साठी १६ पत्रे लिहिली. त्यापैकी एक खास पत्र आहे. हे पत्र भाषा, संवाद, विचार, वर्णन, उद्बोधन, प्रबोधनाच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा दस्तावेज ठरते. या पत्रव्यवहारातून समृद्ध कवी, लेखक, विश्लेषक, पत्रकार,  संपादक असे विविध पैलू असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व पुढे येते.

डॉ.  आंबेडकरांनी दलित, अस्पृश्यांसाठी वृत्तपत्र असावे म्हणून मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता आणि प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्रे काढली. सूज्ञ वाचक निर्माण व्हावा एवढीच त्यामागील त्यांची भूमिका होती. ही सर्व वृत्तपत्रे, पाक्षिकांमधून दलित, अस्पृश्य, शोषित पिडीतांच्या मनातील भावना व्यक्त करणारे लेख, स्फुटलेख, अग्रलेख, विविध वृत्त आणि विशेषतः संपादकीय इत्यादी माध्यमातून स्वतः बाबासाहेब सूर्यबिंब होऊन प्रकट झाले. मूकनायक, बहिष्कृत भारत बंद झाल्यानंतर समता संघ गठित करून त्यांनी ’समता’ पाक्षिक प्रकाशित केले. अल्पावधीतच ‘जनता’ हे नियतकालिकही सुरू केले. पुढे अनेकदा कोंडीत सापडले असताना ‘जनता’ला जगवण्यासाठी बाबासाहेबांसह अनेक सहकाऱ्यांनी गाजावाजा न करता अर्थसाहाय्य दिले. १९२० ते १९३० दरम्यान डॉ. आंबेडकरांनी सभा, संमेलने, सत्याग्रहातून सामाजिक चळवळी उभ्या करून समाजाला नवी ऊर्जा पुरवली. सामाजिक, राजकीय हक्कासाठी लढणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना १९३१ च्या पहिल्या गोलमेज परिषदेचे निमंत्रण इंग्रजांना द्यावे लागले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

१९३१ च्या गोलमेज परिषदेसाठी लंडनला रवाना झाल्यामुळे ‘जनता’ पाक्षिकाच्या संपादनाची जबाबदारी स्वतःकडे न ठेवता त्यांनी देवराव नाईक यांच्याकडे सोपवली. गोलमेज परिषदेचा इत्थंभूत वृत्तांत, खास बातम्या ‘जनता’मध्ये प्रकाशित केल्या तर तळागाळातील जनतेचे, कार्यकर्त्यांचे प्रबोधन होईल म्हणून डॉ. आंबेडकरांनी त्यासाठी खास पत्रे लिहिली. आपण स्वतः ‘जनता’साठी खास पत्रव्यवहार करेन, अशी हमी त्यांनी रवाना होण्यापूर्वी दिली होती. १९३१-३२ च्या दरम्यान विलायतेवरून डॉ. आंबेडकरांनी ‘जनता’साठी १६ पत्रे लिहिली. त्यापैकी एक खास पत्र आहे. हे पत्र भाषा, संवाद, विचार, वर्णन, उद्बोधन, प्रबोधनाच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा  दस्तावेज ठरते. 

या पत्रातून डॉ. आंबेडकरांनी केवळ विचार व्यक्त केले नाहीत तर दिशादर्शनही केले. चौकस वृत्ती, जिज्ञासा, निरीक्षण, ध्येय असा बहुश्रुतपणा त्यात प्रतित होतो. गोलमेज परिषदेला गेले असताना ‘जनता’साठी २१.१.१९३१ रोजी पाठवलेल्या पत्रात ‘आता रात्रीचा एक वाजत आहे. एवढे गजबजलेले लंडन शहर झोपेने पेंगल्यासारखे दिसत असून सर्वत्र सामसूम झालेली आहे’ अशा शब्दात लंडन शहराचे वर्णन केले आहे. ‘मी विलायतेला का जावे?’ अशा प्रश्न  मित्रमंडळींच्या खासगी चर्चेत उपस्थित झाला असता उत्तर दिले की, हवाबदल होईल व थोडी विश्रांती मिळेल. पण मित्रमंडळींच्या चर्चेला विराम मिळाला आणि विरुद्ध घडले. गोलमेज परिषदेत अस्पृश्यसाठीचा मसुदा तयार करण्यात आला असून त्याची एक प्रत पत्रासोबत पाठवण्यात आली. या मसुद्याचे सुबोध मराठी भाषांतर करून ते सर्वाना मिळेल असे कर. विश्रांतीची मी कधीही अपेक्षा केली नाही, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

आपले इतर हेतू कितपत सिद्धीस गेले याचा थोडासा अंदाज तुम्हाला व इतर स्नेही मंडळींना वेळोवेळी पाठविलेल्या पत्रांवरून तुम्हा सर्वांना झालेला असेल. या बाबतीत आणखी सविस्तर सांगायचे आहे. प्रत्यक्ष भेटीअंती सांगेन. अमेरिकेला जाण्याचा पूर्वीचा बेत आता रद्द केला आहे. यामुळे तुम्हा सर्वांची भेट लवकरच होईल, अशी इच्छा त्यांनी या पत्रात व्यक्त केली आहे. आता दोन वाजतील आणि ज्याकरिता एवढ्या अपरात्री हे पत्र मी लिहीत बसलो आहे. त्याचा अद्याप उल्लेखही केलेला नाही. आतापर्यंत चार अंक माझ्या वाचण्यात आले. यापूर्वी मी तुमचे अभिनंदन करावयाला व तुमच्या या कामगिरीबद्दल तुम्हाला धन्यवाद द्यायला हवे होते. वास्तविक या गोष्टीची तुम्ही कोणीच माझ्याकडून अपेक्षा केली नाही. हे मी जाणून आहे. पण नुकताच हाती आलेला अंक वाचून तुम्हाला व श्री. कद्रेकर, प्रधान वगैरे माझ्या सहकारी मित्रांना धन्यवाद दिल्यावाचून माझ्याने राहवत नाही. 

डॉ. आंबेडकरांनी समता आणि बहिष्कृत भारत बंद झाल्यानंतर ‘जनता’साठी सर्व अस्पृश्य जनतेला आवाहन करतात. मला आशा आहे, की जनतेला आश्रय देण्यात माझे अस्पृश्य बंधू कुचराई करणार नाहीत. स्पृश्यवर्गीय उदारमतवादी बंधूनीही जनतेच्या मताचा आपापल्या समाजात प्रसार करण्याचे श्रेय घ्यावे. कारण यापुढे त्या मतांचा विजय होणे अपरिहार्य व इष्टही आहे. ही गोष्ट त्यांनीही दृष्टीआड करू नये. आणखी बरेच लिहायचे होते, परंतु आता मी फारच थकून गेल्यामुळे येथेच हे पत्र पुरे करतो, असे त्यांनी म्हटले आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com