इतिहासाविण कुणी करावा यांचा सन्मान!

श्रुती भातखंडे
Friday, 27 November 2020

आपल्याकडच्या प्रबोधनात महत्त्वाचा वाटा उचलणारे एक क्षेत्र म्हणजे इतिहास संशोधनाचे. या वाटचालीत ज्येष्ठ इतिहासकार ‘रावबहादूर’ पारसनीस यांच्या कार्याची दखल घ्यायला हवी. ते इतिहास संशोधकांचे खऱ्या अर्थाने मित्र आणि आधारस्तंभ होते. दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा परिचय.

आपल्याकडच्या प्रबोधनात महत्त्वाचा वाटा उचलणारे एक क्षेत्र म्हणजे इतिहास संशोधनाचे. या वाटचालीत ज्येष्ठ इतिहासकार ‘रावबहादूर’ पारसनीस यांच्या कार्याची दखल घ्यायला हवी. ते इतिहास संशोधकांचे खऱ्या अर्थाने मित्र आणि आधारस्तंभ होते. दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा परिचय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मराठ्यांच्या इतिहासाच्या कागदपत्रांचा संग्रह, संपादन आणि प्रकाशन करून, जिज्ञासू, अभ्यासू, व संशोधक अशा सर्वांना मूळ, अस्सल कागदपत्रे उपलब्ध करून ठेवणारे म्हणून ‘रावबहादूर’ द. ब. पारसनीस यांच्या कार्याचा गौरव करावा लागेल. इतिहास लेखन ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे, कारण इतिहास संशोधनासाठी मूळ अस्सल कागदपत्रे, दस्तऐवज लागतात, ते विखुरलेल्या स्वरूपात असतात. ते एकत्रित करून, संग्रह करून, जतन करून त्याचे वर्गीकरण करणे ही संशोधनाची पहिली पायरी असते. या कार्यात पारसनीसांचे कार्य मोलाचे ठरते. त्यांचा कागदपत्रे जमविणयाचा ध्यास अनेक संशोधक व अभ्यासकांना उपयुक्त दिशा दाखविणारा आहे.

‘निबंधमाले’तून प्रेरणा
 इतिहासकार का. ना. साने, वासुदेवशास्त्री खरे व इतिहासाचार्य वि. का. राजवाडे या दिग्गजांच्या समकालीन असणारे पारसनीस हे इतिहास संग्राहक होते. आधी मराठ्यांचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न कॉस्मो - द - गार्द, राबर्ट ऑर्म, थेवोनॉ, ग्रॅंट डफ, एलफिन्स्टन इ. अनेक ब्रिटिशांनी व युरोपियन लोकांनी केला. त्यामुळे परकी राज्यकर्त्यांनी मांडलेला इतिहास हा पूर्वग्रहदूषित असल्याचे लक्षात येताच स्वकीयांनी इतिहास लेखनाचे प्रयत्न करावेत, हे प्रथम विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना जाणवले. त्यांनी आपल्या ‘निबंधामालेतून’ इतिहास या विषयावर तात्त्विक विवेचन केले. त्यांच्या लिखाणावरून स्फूर्ती घेऊन का. ना. साने, वा. वा. खरे, आणि वि. का. राजवाडे यांनी इतिहास कार्यासाठी आपले आयुष्य वेचले. त्याच परंपरेतील पारसनीस होते.

संशोधकांचा मोठा आधार
१७व्या वर्षी त्यांनी ‘महाराष्ट्र कोकीळ’ हे मासिक सुरू केले. १८९४ मध्ये त्यांनी आपला पहिला ग्रंथ- ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे चरित्र’ हा लिहिला. लो. टिळक यांनी त्याचा गौरव केला. ‘भारतवर्ष’ हे ह. ना. आपटे यांच्याबरोबर नियतकालिक सुरू केले. त्यात बखरी, दस्तऐवज व वंशावळी, कैफियती प्रसिद्ध केल्या. पारसनीसांचा लोकसंपर्क मोठा असल्याने ऐतिहासिक ठेवा वाढवता कसा येईल, हा त्यांचा सतत प्रयत्न असे. कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्याबरोबर ते इंग्लंडला गेले. इंग्रज अधिकाऱ्यांकडून पेशवे दफ्तरात काम करण्याचे शिफारसपत्र प्राप्त केले व अस्सल, मूळ कागदपत्रे मिळविण्यात यश मिळवले. १८००मध्ये नाना फडणीसांच्या मृत्यूनंतर मेणवली येथील त्यांचे पूर्ण दफ्तर पारसनीसांनी मिळवले व सुरक्षित ठेवले, ते इतिहास संग्रहातून क्रमशः प्रसिद्ध केले.

सातारा राज्य खालसा झाल्यावर ती कागदपत्रे मिळविली व त्याचे जतन व्हावे या उद्देशाने पु. वि. मावजी या धनिक व्यक्तीची मदत घेऊन तो मौलिक साठा जतन केला. सरकारी सेवेत असलेले ब्रिटिश सनदी अधिकारी चार्ल्स किंकेड यांना ग्रॅंट डफ यांनी लिहिलेला इतिहास मान्य नव्हता. तो परत लिहिण्याच्या कामात त्यांनी पारसनीसांची मदत घेतली. राजवाडे यांचे मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १६, १७, १८, १९ हे पारसनीसांनी प्रसिद्ध केले.

इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांनी पारसनीसांच्या कार्याची योग्य दखल घेत प्रशंसा केली. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘मराठ्यांच्या इतिहासाचे उपकारकर्ते’ असे त्यांनी वर्णन केले. त्यांच्याविषयी बोलण्यासाठी गदिमांच्या शब्दांचा आधार घ्यावासा वाटतो. ...इतिहासाविण कुणी करावा, यांचा सन्मान!

कार्याची झलक

  • अस्सल कागदपत्रे मिळविण्यासाठी परिश्रम
  • महादजी शिंदे यांचा पत्रव्यवहार मिळवून तो पाच खंडांत प्रसिद्ध.
  • राणी लक्ष्मीबाईंचे चरित्रलेखन.
  • ‘इतिहास संग्रह’ नियतकालिक चालविले.
  • ऐतिहासिक कागदपत्रांचे जतन
  • दिग्गज इतिहास संशोधकांना साहाय्य.

(लेखिका इतिहासाच्या अभ्यासक आहेत.)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article write shruti bhatkhande on raobahadur parasnis