सारे काही ठीक होईल...

Recep_Erdogan
Recep_Erdogan

इस्तंबूलच्या महापौरपदासाठी सरकारविरोधी आघाडीचे इक्रेम इमामोलू प्रचार करीत असताना एक छोटा मुलगा धावत आला. त्याने मोठ्याने आवाज दिला, 'मोठ्या भावा, सारे काही ठीक होईल.' त्यावर इक्रेम यांनी 'होय खरेच,' असे उत्तर दिले. हेच त्यांच्या प्रचाराचे घोषवाक्‍य ठरले. 'सारे काही ठीक होईल' ही घोषणा खरी ठरवत त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या बलाढ्य उमेदवाराला धूळ चारत तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगान यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. 

तुर्कस्तानात गेल्या काही वर्षांत मोठी उलथापालथ झाली आहे. दहशतवादी हल्ले, राजकीय बंडाचा प्रयत्न, सीरियातील युद्धाचे चटके, स्थलांतरितांचे लोंढे यामुळे अध्यक्ष रेसीप तय्यीप एर्दोगान यांच्या बाजूने आणि विरोधात जनमताचे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झाले आहे. 'सारे काही ठीक होईल,' ही विरोधकांच्या हाती आलेली घोषणा त्यांच्या हाती आली आणि ती आता नवा इतिहास घडवत आहे. फारसे परिचित नसलेले रिपब्लिकन पीपल्स पार्टीचे (सीएचपी) इमामोलू हे इस्तंबूल जिल्ह्यातील बेयलीकाड्‌जूचे महापौर होते. इस्तंबूलच्या महापौरपदाच्या रिंगणात उतरून त्यांनी सरकारविरोधी आवाजाला जागा करून दिली. मात्र, त्यांच्यासमोर आव्हान होते माजी पंतप्रधान आणि सत्ताधारी जस्टिस अँड डेव्हलपमेंट पार्टी (एकेपी)चे बलाढ्य नेते बिनाली यिल्ड्रीम यांचे.

यिल्ड्रीम यांच्या पाठीशी सरकारचे पाठबळ होते अन्‌ सरकारच्या मुठीत असलेली प्रसारमाध्यमेही त्यांचेच गुणगान गात होती. या परिस्थितीवर मात करीत इमामोलू केवळ तरले नाहीत, तर 13 हजार मतांनी विजयीही झाले. त्यानंतर नेमका उलटा प्रकार सुरू झाला. या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याची ओरड सरकारनेच सुरू केली. याच दिवशी सत्ताधारी "एकेपी'ने जिल्ह्यातील इतर ठिकाणी महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत विजय मिळविला आणि योगायोगाची बाब म्हणजे ही निवडणूक त्याच अधिकाऱ्यांनी घेतली होती. अध्यक्ष एर्दोगान यांच्या दबावानंतर शहराच्या महापौरपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची घोषणा अखेर उच्च निवडणूक मंडळाने केली.

देशातील या मोठ्या शहरांमध्ये तीन महिन्यांत दुसऱ्यांदा निवडणूक झाली. यात पुन्हा इमामोलू तब्बल पावणेआठ लाख मतांनी जिंकले. त्यांच्या विजयाने सत्ताधारी पक्षाला पुन्हा दणका बसला आहे. याचबरोबर सत्ताधारी पक्षाची 25 वर्षांची शहरावरील सत्ता संपुष्टात आली आहे. इमामोलू यांच्या विजयानंतर रस्त्यांवर उतरून जल्लोष करणारी तरुणाई पाहून सरकारविरोधी भावना वाढीस लागल्याचे चित्र आहे. तुर्कस्तानची लोकसंख्या आठ कोटी आणि इस्तंबूल शहराची लोकसंख्या दीड कोटी. देशाचे हे व्यावसायिक केंद्र असून, एर्दोगान 1994 त 98मध्ये या शहराचे महापौर होते. देशाच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नात शहराचा वाटा जवळपास एकतृतीयांश आहे. देशाचे आर्थिक सत्ताकेंद्र ताब्यात ठेवणे सरकारसाठी आवश्‍यक होते. मात्र, त्यावरील सरकारची पकड आता सुटली आहे. 

इस्तंबूल जिंकणारा, तुर्कस्तान जिंकतो 
एर्दोगान मूळचे इस्तंबूल शहरातील आहेत. ते सहजासहजी देशाचे आर्थिक सत्ताकेंद्र सोडणार नव्हते. कारण शहराच्या महापौरपदासाठी उभे असताना त्यांनीच 'इस्तंबूल जिंकणारा, तुर्कस्तान जिंकतो,' अशी घोषणा करून राष्ट्रीय राजकारणाकडे वाटचाल केली होती. तिथपासून सुरू झालेला एर्दोगान यांचा राजकीय प्रवास देशाच्या अध्यक्षपदापर्यंत पोचला आहे. आता हीच घोषणा त्यांच्यावर उलटल्याचे दिसते.

एर्दोगान यांचे 2003 पासून देशावर नियंत्रण आहे. सुरवातीला पंतप्रधान आणि नंतर अध्यक्ष म्हणून ते एकाधिकारशाहीकडे वाटचाल करीत आहेत. आधुनिक तुर्कस्तानचे संस्थापक मुस्तफा केमाल अतातुर्क यांच्यानंतरचे ते सर्वाधिक शक्तिशाली नेते बनले आहेत. त्यांच्या विरोधात आता विरोधक एकवटू लागले आहेत. इस्तंबूलमधील राजकीय घडामोडींमुळे देशात नवे राजकीय वारे वाहत असल्याची नांदी झाली. इस्तंबूल, इझमीर आणि अंकारा ही मोठी शहरे विरोधकांच्या ताब्यात आली आहेत. विरोधकांना मिळत असलेला जनाधार पाहता इमामोलू हे 2023च्या अध्यक्षीय निवडणुकीत एर्दोगान यांच्याविरोधात उमेदवार असल्यास आश्‍चर्य वाटायला नको. एर्दोगान यांच्या राजवटीला सुरुंग लागण्याची ही सुरवात झाली, असेच मानावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com