ऊसासाठी लक्ष्य : एकरी २०० टन

ऊस शेती फायदेशीर व्हायची असेल तर या पिकाचे दर एकरी उत्पादन वाढले पाहिजे. सर्वसामान्य ऊस उत्पादकाची सरासरी खूपच कमी, ३०-३५ टन प्रतिएकरी आहे.
sugarcane
sugarcaneSakal
Summary

ऊस शेती फायदेशीर व्हायची असेल तर या पिकाचे दर एकरी उत्पादन वाढले पाहिजे. सर्वसामान्य ऊस उत्पादकाची सरासरी खूपच कमी, ३०-३५ टन प्रतिएकरी आहे.

ऊस संजीवनी ग्रुपने अत्याधुनिक साधने, प्रयोगशिलता यांच्या बळावर एकरी ऊस उत्पादन वाढवण्यात बाजी मारली आहे. यातून जमिनी क्षारपड होत नाहीत, ही सगळ्यांत जमेची बाजू आहे. या प्रयोगाविषयी.

ऊस शेती फायदेशीर व्हायची असेल तर या पिकाचे दर एकरी उत्पादन वाढले पाहिजे. सर्वसामान्य ऊस उत्पादकाची सरासरी खूपच कमी, ३०-३५ टन प्रतिएकरी आहे. अशा परिस्थितीत ऊस शेती परवडणारी नाही. म्हणून एकरी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी पंचवीस वर्षापूर्वी ऊस संजीवनी ग्रुपची स्थापना झाली. संजीव माने यांनी १९९४ मध्ये स्थापलेल्या शिंदेमळा शेतकरी विकास मंचचे काम सुरू झाले होते. त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी ऊस संजीवनी ग्रुपची स्थापना केली. या ग्रुपच्या पंचविसाव्या वर्धापनानिमित्त इस्लामपूर येथे झालेल्या मेळाव्यात बरीच माहिती मिळाली. शेतकऱ्यांचे अनुभवही ऐकता आले.

या गटामुळे शेतकऱ्यांना तज्ज्ञ शास्त्रज्ञांची व्याख्याने आणि मार्गदर्शन मिळून, त्याआधारे पीक सतत चांगले येऊ लागले. अनेक शेतकरी, अधिकारी आणि शास्त्रज्ञ शेतावर येऊन माहिती विचारत. अशा प्रकारे गटाचे काम आजूबाजूच्या राज्यांतही पसरले. तोवर ऊस उत्पादनात वाढ होऊन ते एकरी ६०-६५ टनांपर्यंत होत होते. पण तेवढ्याने कुणाचेच समाधान होत नव्हते. माने यांच्याबरोबर वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, मृदा शास्त्रज्ञ प्रा. अरुण मराठे आणि कृषी

विद्यावेत्ता डॉ. भीमराव पाटील हे उत्साहाने या उपक्रमात सामील झाले. चर्चेनंतर एकरी १०० टन ऊस घेणे शक्य आहे, असे दिसल्याने तेच उद्दिष्ट ठरवण्यात आले. त्या दिशेने प्रगती होत गेली. सदस्यांचा उत्साह वाढला.

केवळ जास्त खते देऊन उत्पादन ठराविक पातळीपलीकडे जात नाही, हे शेतकऱ्यांना समजावून देण्यात आले. यासाठी पाणी व माती परीक्षणावरून खताच्या शिफारशी, जमिनीचे आरोग्य आणि सेंद्रीय कर्ब व्यवस्थापनाचे महत्त्व मराठे यांनी सांगितले. मातीपरीक्षणानंतरच कोणत्या बाबींची आवश्यकता पिकाला आहे, हे नक्की करता येते. जमिनी-जमिनीत फरक असतो म्हणून एखादे मोठे शेत असेल तर विविध भागातील मातीपरीक्षण आवश्यक असते, असेही पटवून दिले. पाण्याच्या योग्य वापराची गरज आणि पाण्यापेक्षा वाफसा महत्त्वाचा हे सांगितले. डॉ. जमदग्नी यांनी उसाच्या विक्रमी पिकासाठी संजीवक-पोषण-संरक्षण त्रिसूत्रीवर आधारित ‘ऊस-संजीवनी’ आणि ‘सुपरकेन नर्सरी’ तंत्र विकसित केले. डॉ. पाटील यांनी हवामानाच्या बदलाचा ऊस पिकावर होणाऱ्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणामांनी मोठे नुकसान होते व त्यासाठी काय उपाय करावेत, हे सांगितले. यासाठी वेगवेगळ्या हवामानाला तोंड देणाऱ्या जाती तयार करण्याची गरज आहे, हेही त्यांनी दाखवून दिले.

आधुनिक तंत्रज्ञानाची जोड

कृषीरत्न संजीव माने यांनी आपल्या ऊसशेतीच्या अनुभवाचे बोल तर सांगितलेच पण गटासाठी ऊस संजीवनी फवारणी किट, ब्लॅक बॉक्स किट, फवारणीसाठी इन्स्टोमॅक्स, ऊसाची उत्कृष्ट रोपे व बियाणे यांची निर्मिती केली. ती माफक दरात गरजूंपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात १०-३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. स्प्रिंकलर्स, ठिबक सिंचन यांचा वापर केल्याने उत्पादन आणखी वाढून कसा फायदा झाला ते सांगितले. खोडव्याचे उत्पादनही कसे वाढते, हे दाखवून दिले. त्यांचे पुत्र अजिंक्य हे आधुनिक तंत्राने गटासाठी ऑनलाइन व्याख्याने आणि व्हॉटसअ‍ॅपवर सर्वांशी संपर्क राखण्याची जबाबदारी पार पाडतात.

प्रयोगातून समृद्धी

आता अन्य राज्यांतील शेतकरीही मोठ्या संख्येने गटामध्ये सामील झाले आहेत. उंच वाढलेल्या उसावर फवारणीसाठी त्यांनी ड्रोनचा यशस्वी वापर करून दाखवल्याने गटाला चैतन्यच प्राप्त झाले. यामुळे अनेक सदस्यांचे एकरी उत्पादन १०० टनांपेक्षाही अधिक होऊ लागले. कोणी एकरी १५० टनावर उत्पादन घेतले. वाळव्याच्या अशोक खोत यांनी २०१४-१५ मध्येच १५० टनांची मजल गाठली होती. आता तर जागतिक विक्रमच केला. त्यासाठी २०१७ पासूनच त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. वरील तज्ज्ञांच्या सल्ल्याने सेंद्रीय कर्बवाढीला प्राधान्य दिले. ऊस-संजीवनीच्या ६-७ फवारण्या, आळवण्या आणि आर्द्रता राखण्याचे प्रयोग केले. लागणीपूर्वी हिरवळीचे खत, शेणखत, कंपोस्ट, कोंबडी खत, कारखान्याची राख, समृद्धीखत दिले.

या प्रयोगासाठी सहाय्य म्हणून जैन कंपनीने ठिबक संच बसवला. जगात प्रथमच मोड्युलर स्प्रिंकलरचा वापर केला. या साऱ्याचा फायदा होऊन त्यांना एकरी १६८ टन असे विक्रमी उत्पादन मिळाले. या प्रयोगाला महाराष्ट्रातील सहा हजार शेतकऱ्यांनी भेट दिली. कृषी शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास सहली आयोजित केल्या. खोडवा उत्पादनातही त्यांनी एकरी १२३ टन उत्पादन मिळवून विक्रम नोंदला आहे. आता त्यांचे व गटाचे लक्ष्यही एकरी २०० टन असे आहे. जमदग्नी यांनी तर त्याहीपुढे उत्पादन देण्याची या पिकाची क्षमता आहे, असे सांगितल्याने सदस्यांचा जोम वाढला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com