

"आसाममध्ये कोणाचं 'पर्व' येणार?" चहाच्या मळ्यांपासून ब्रह्मपुत्रेच्या काठापर्यंत राजकीय धुराळा; भाजपची शक्ती की काँग्रेसची युक्ती?
Sakal
गेल्या काही वर्षांत राज्यात विकासाच्या अनेक योजना राबवण्यात आल्या असल्या तरी बेरोजगारी, पूरस्थिती, महागाई आणि स्थलांतर यांसारख्या मूलभूत समस्या कायम आहेत. आसाममधील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत विकास, पायाभूत सुविधा आणि स्थैर्य या मुद्द्यांना मुख्य अजेंडा बनवले आहे. आसाममधील नागरिकांना दरवर्षी महापुराचा सामना करावा लागतो. अनेक वर्षांपासून ही समस्या कायम आहे. दहा वर्षे सत्तेत असलेल्या भाजपने जनतेतील प्रस्थापितविरोधी भावना दूर करण्यासाठी पूर नियंत्रणासाठी मोठ्या प्रकल्पांची घोषणा केली असून, ब्रह्मपुत्रेमुळे दरवर्षी होणाऱ्या नुकसानीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच रोजगारनिर्मिती, नवीन उद्योगधंदे उभारणे, रस्ते, रेल्वे आणि विमानतळ यांसारख्या पायाभूत सुविधांचा विस्तार, महिला सशक्तीकरण आणि शेतकरी कल्याण योजना राबवणे हे मुद्देही पक्षाच्या प्रचाराचा केंद्रबिंदू आहेत. समान नागरी कायदा लागू करण्याचा मुद्दा पक्षाने मांडला असून त्यातून सामाजिक समानता निर्माण होईल, असा दावा केला आहे. पुढील काही वर्षांत आसामसह ईशान्य भारतामध्ये विकासाचे पर्व आणण्याचे उद्दिष्ट भाजपने जाहीर केले आहे.