यात्रेचा ‘महाराष्ट्राध्याय’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

यात्रेचा ‘महाराष्ट्राध्याय’

रा हुल गांधी यांच्या बहुचर्चित ‘भारत जोडो!’ यात्रेचा आज पंच्याहत्तरावा दिवस असून रविवारी रात्री या यात्रेने महाराष्ट्राची सीमा ओलांडून मध्य प्रदेशात बुऱ्हाणपूर येथे आपला पडाव टाकला आहे. यात्रा आता दोन दिवसांचा विराम घेणार असताना, महाराष्ट्रात या यात्रेला जो काही प्रतिसाद मिळाला त्यावर एक नजर टाकणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात या यात्रेत विविध वैचारिक तसेच सामाजिक स्तरांतील जनांचा इतका मोठा प्रवाहो सामील होईल, याची कोणालाच म्हणजे काँग्रेसच्या बड्या नेत्यांनाही कल्पना नसणार.

लालकृष्ण अडवाणी यांनी १९९०मध्ये सोमनाथाहून अयोध्येच्या दिशेने काढलेल्या यात्रेलाही असाच मोठा प्रतिसाद देणारा मराठी माणूस या ‘नफरत छोडो...’ भूमिकेसाठी काढलेल्या यात्रेत उदंड उत्साहाने सामील झाला, हे कुणाला आश्चर्य वाटेलही. पण हा प्रतिसाद हे तर वास्तव आहे. देशात एकीकडे भारतीय जनता पक्ष ध्रुवीकरणाच्या प्रक्रियेला वेग देत असतानाच, राहुल गांधी यांनी लोकांचे लक्ष महागाई, देशात पडत असलेली फूट, तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न याकडे वळवण्यात मोठे यश मिळवले आहे.

शेगाव येथील त्यांच्या सभेला झालेली अभूतपूर्व गर्दी या यशाची साक्ष देत आहे. कोणत्याही नेत्याच्या यशाची पहिली पायरी ही आपल्याबद्दल जनतेच्या मनात मोठ्या अपेक्षा निर्माण करण्यात तो किती यशस्वी होतो, यावर अवलंबून असते. हा विचार केला तर या उपक्रमाला बरेच यश मिळाले, हे मान्य करावे लागेल. जनतेचा उत्स्फूर्त सहभाग; तसेच खुद्द राहुल गांधी यांची याच ७५ दिवसांत बदललेली देहबोली, त्यांच्यात दिसलेला आत्मविश्वास या बाबी नोंद घेण्याजोग्या आहेत,हे निःसंशय. राहुल गांधींच्याबद्दल लोकांच्या मनात मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत, हे यात्रेच्या निमित्ताने दिसून आले.

अवघ्या अडीच-तीन दशकांपूर्वीपर्यंत काँग्रसचे पारंपरिक विरोधक असलेले डावे तसेच समाजवादी कार्यकर्ते यांचा सहभागही लक्ष वेधून घेणारा होता. यात्रा भारताच्या दक्षिण टोकापासून सुरू झाली, तेव्हा भाजप नेतेमंडळी तसेच त्यांचे पाठीराखे यात्रेची खिल्ली उडवण्यात मश्गूल होते. राहुल गांधी हे विवेकानंद स्मारकास्थळी गेलेच नाहीत, अशी आवई उठवण्यापासून ते यात्रेमुळे वाहतुकीची कोंडी होईल, म्हणून यात्रा रोखण्याची मागणी न्यायालयात करण्यापर्यंत भाजप समर्थकांनी मजल गाठली होती. प्रत्यक्षात यात्रा आपल्या गतीने सुरू राहिली. यात्रेला महाराष्ट्रात मिळालेला प्रतिसाद दक्षिणेतील राज्यांपेक्षाही मोठा होता आणि त्यामुळेच राज्यातील सुस्तावलेल्या काँग्रेस नेत्यांनाही खडबडून जाग आल्याचे दिसत आहे. प्रदेश पातळीवरील काँग्रेस नेत्यांचा नाही म्हटले तरी सर्वसामान्य जनतेशी असलेला धागा गेल्या काही वर्षांत निसटला होता.

यात्रेमुळे तो पुन्हा जोडण्याचे काम होऊ शकते. मात्र त्यामुळेच या महाराष्ट्रातील नेतेमंडळींवरील जबाबदारी वाढली आहे. त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे ते राज्यात निर्माण झालेले वातावरण पुढच्या दोन-अडीच वर्षांत होणाऱ्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकवण्याचे. ते कठीण असले तरी काँग्रेस नेते झडझडून कामास लागल्यास आणि महाविकास आघाडी एकसंघ राहिल्यास ते तितकेसे अवघड नाही. वाचाळपणा न करता संघटनात्मक काम करीत राहिल्यास त्याचा फायदा निश्चित होतो. उलट अनावश्यक वादांमुळे राजकारणातील उद्दिष्टाला तडे जाऊ शकतात. राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी ओढवून घेतलेला वाद हे त्याचे ठळक उदाहरण. त्यापासून राहुल आणि अन्य कॉंग्रेस नेत्यांनी बोध घेतला असेलच.

अर्थात ही बाब सोडली तर राहुल गांधी यांची या यात्रेत बरीच प्रगल्भ वागणूक राहिली, हेही खरे. मध्य प्रदेशात पडाव टाकलेल्या या यात्रेचा पुढचा प्रवास हा भाजपचे प्राबल्य असलेल्या राज्यांतून होणार आहे. तेथे या यात्रेला कसा प्रतिसाद मिळतो त्याची पहिली कसोटी ही मध्य प्रदेशातच आहे. तेथे सामना किमान अनिर्णित ठेवण्यात जरी राहुल गांधी यांना यश मिळाले, तरी त्यांनी बाजी मारल्यासारखे होईल. अर्थात, या यात्रेपुढले नसले तरी काँग्रेसपुढील आणखी एक आव्हान हे गुजरात विधानसभा निवडणुका हेच आहे. तेथे भाजपला यश मिळणार, असे किमान आजचे वातावरण आहे. त्यानंतर या यात्रेची खिल्ली उडवण्यात भाजप समर्थक या दोन बाबींचा परस्पर संबंध जोडून जोमाने पुढे येतील. मात्र, आता काँग्रेसचा ‘आयटी सेल’ही आठ-दहा वर्षांनी का होईना मैदानात उतरला आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील हल्ले परतवून सहज लावता येतील, असे म्हणता येते.

शिवाय, २०१४ आणि १९ मध्ये केवळ काँग्रेस नको म्हणून भाजपला लोकांच्या एका मोठ्या समुहाने मतदान केले होते. त्यांच्यापैकी बरेच लोक या यात्रेत सहभागी झाले आहेत. योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण ही त्यातील दोन ठळक नावे आहेत. मतदारांचा हा समूह जरी या यात्रेने उभ्या केलेल्या विविध प्रश्नांमुळे पुनश्च एकवार काँग्रेसकडे परतला तरी त्याचा फटका अखेरीस भाजपलाच बसणार, हे उघड आहे. एक मात्र खरे. भाजपने उभी केलेली ‘पप्पू’ ही प्रतिमा पुसून टाकण्यात, राहुल यांनी या यात्रेच्या माध्यमातून मोठे यश संपादन केले आहे. अर्थात, हे फलित काँग्रेससाठी मोठे असले तरी प्रत्यक्षात निवडणुकीतील जनाधार वाढवण्यासाठी काँग्रेसजन किती मेहेनत घेतात, यावरच या यात्रेसंबंधातील निष्कर्ष काढला जाईल. तूर्त वातावरणनिर्मिती तर झाली आहे!

सर्वांच्या कार्याचा मेळ साधणे आणि त्या प्रयत्नांना एका उद्दिष्टाच्या दिशेने नेणे हे सर्वात आव्हानात्मक काम असते;मग क्षेत्र कोणतेही असो.

- वॉल्ट डिस्ने